औरंगाबादेत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; उच्च शिक्षित म्होरक्यासह टोळी गजाआड

औरंगाबाद: बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला असून या नोटा छापणाऱ्या टोळीच्या उच्च शिक्षित म्होरक्यासह या टोळीला गजाआड केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून ५००, १०० व ५० रुपयांच्या सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे कॉम्प्यूटर, ऑल इन वन प्रिंटर, कटर स्केल, कागद असे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. तयार केलेल्या बनावट नोटांची वाहतूक करण्यासाठी वापरलेली महिंद्रा लोगन कार आणि संपर्कासाठी वापरण्यात येत असलेले पाच मोबाईल असा ३ लाख १० हजार ३९० रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

काही जण पुंडलिकनगर रोडवरील सुपर वाईन शॉपमध्ये बनावट नोटा देऊन दारू खरेदी करत आहेत, अशी माहिती पुंडलिकनगर पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक एस. के. खटाने यांनी यांनी सापळा रचला. या सापळ्यानुसार मंगळवारी सायंकाळी ७ वाजता रघुनाथ ढवळपुरे यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विचारपूस केली असता समरान उर्फ लक्की रशीद शेख हा त्याचा साथीदार नितीन चौधरी याच्या मदतीने मुकुंदवाडीत किरायाने घेतलेल्या रूममध्ये बनावट नोटा तयार करून त्या नोटा अक्षय अण्णासाहेब पडूळ आणि दादाराव पोपटराव गावडे यांच्या मार्फत बाजारात चालवण्यासाठी विक्री करत असल्याचे समोर आले.

समरान हा पुंडलिकनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो कलम ४८९ (अ), ४८९ (ब), ४८९ (क), ४८९(ड), ४२० ३४ असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर आहे. रघुनाथने दिलेल्या माहितीवरून  खटाणे आणि त्यांच्या पथकाने  छापा मारून समरान उर्फ लक्की रशीद शेख (वय ३०, जसवंतपुरा, नेहरूनगर, औरंगाबाद), नितीन कल्याणराव चौधरी (वय २५, मुकुंदवाडी), अक्षय अण्णासाहेब पडूळ (वय २८, गजानन नगर, गल्ली नंबर १), दादाराव पोपटराव गावंडे (वय ४२, गजानन नगर गल्ली नं.१) रघुनाथ चैनदास ढवळपुरे (वय ४९, धंदाः मिस्त्री, गजानन नगर) यांना अटक केली आहे.

असे करायच्या बनावट नोटा तयार:
आरोपी समरान उर्फ लक्की रशीद शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत उच्चशिक्षित गुन्हेगार आहे. तो चलनात असणाऱ्या नोटा स्टॅण्डर्ड कागदावर प्रिंटरद्वारे स्कॅन करून त्याची प्रिंट काढून कटर व स्केलच्या सहाय्याने हुबेहुब दिसणारी नोट तयार करण्यात  पटाईत आहे. बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी त्याच्यावर याआधीही गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी त्याने नवीन साथीदारांना प्रशिक्षण देऊन हा गोरखधंदा सुरू केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *