सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात ५० ची मर्यादा; अंत्य संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा

मुंबईः राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा ५० केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्यावतीने जारी परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली असून बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही मर्यादा ५० करण्यात आली आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरच्या म्हणजेच आज रात्री १२ वाजेपासून अंमलात येणार आहे.

अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम २० असेल. त्याचप्रमाणे राज्यातील पर्यटक स्थळे, समुद्रकिनारपट्टी, क्रीडांगणे या सारख्या जास्त लोकांना आकृष्ट करणाऱ्या ठिकाणी सक्षम प्राधिकरणास, २४ डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेल्या सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास (जमावबंदी) १४४ सीआरपीसी लागू करता येईल. याशिवाय आधीच्या आदेशाप्रमाणे लागू सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *