अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयीयुक्त आधार केंद्र आहे. इथे कोणतीही औषध-उपचार साधन सामग्री कमी पडणार नाही, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धी, काही डॉक्टरांचे खाजगी दवाखान्यांवरील अधिकचे लक्ष यामुळे कोणत्याही रुग्णावर औषध उपचाराची कमतरता भासू नये, असे चोख नियोजन करण्याचे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वाराती रुग्णालय अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
रुग्णालयातील प्रसूती विभाग, औषध पेढीतील तुटवडा, लाईफ सेव्हिंग औषधे, ऑक्सिजन यासारख्या सर्वच महत्वाच्या बाबींसह आज धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या, उणिवा, नागरिकांच्या तक्रारी आदी गोष्टींवर बोट ठेवत, औषध उपचारांची कमी पडू नये याबाबत काळजी घेण्याच्या सूचना केल्या.
रुग्णालयास 3.0 टेस्ला मशीन, अद्ययावत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशिन्स तातडीने कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक वीज जोडणी तसेच तज्ज्ञ पदांची कंत्राटी स्वरूपात भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही धनंजय मुंडे यांनी या बैठकीत दिले.
कोविड रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात अत्यंत नगण्य असली तरी मुंबई-पुण्यासह काही ठिकाणी ही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, यादृष्टीने संभाव्य धोका ओळखून पूर्वतयारी व नियोजन करावे लागणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
रुग्णालय ऑक्सिजनच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण असल्याची माहिती यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या बैठकीस आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, डॉ. नरेंद्र काळे, गोविंदराव देशमुख, राजेश्वर चव्हाण, विलास सोनवणे, बबन लोमटे, रणजित लोमटे, अधिष्ठाता डॉ. खैरे, यांच्यासह अभ्यागत मंडळातील सदस्य व विविध विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
कोणत्या विभागात खाटा वाढविण्याची गरज आहे, कुठे विद्युत पुरवठा, औषधे व अन्य सामग्री, मागील काळातील लिफ्ट सारखी काही अपूर्ण कामे पूर्ण करणे यांसारख्या कोणत्याही बाबीस निधी कमी पडत असेल ते आमच्यावर सोडा, सरकार म्हणून ती जबाबदारी आमची आहे; मात्र रुग्णाच्या उपचारात मात्र कुठेही कसूर होऊ नये. सर्व विभाग प्रमुखांनी वॉर्डमध्ये सातत्याने राउंड केले पाहिजेत व प्रत्यक्ष परिस्थिती हाताळली पाहिजे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या 3.0 टेस्ला एमआरआय मशीनच्या इन्स्टॉलेशनचे काम सध्या सुरू असून, या कामाची धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी या मशीनला आवश्यक प्रमाणात विद्युत पुरवठा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंडे यांनी संबंधितांना केल्या.
अभ्यागत मंडळासमोर ठेवलेले सर्व प्रस्ताव एकमताने मंजूर:
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील 50 जागा वाढल्याने याठिकाणी आणखी 242 नवीन बेड निर्माण करण्यासह, कंत्राटी पदभरती, अन्य मनुष्यबळ उपलब्धी यांसह रुग्णालय प्रशासनाने अभ्यागत मंडळासमोर ठेवलेल्या सर्व मागण्या धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यागत मंडळाने एकमताने मान्य केल्या.