मुंबईः राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला असून निर्बंध आणखी कडक केले आहेत. नव्या निर्बंधांनुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक बाबी वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. नवीन निर्बंध सोमवार, १० जानेवारीपासून लागू होतील.
राज्य सरकारने शनिवारी नवीन निर्बंधाची सूचना जारी केली आहे. नव्या निर्बंधांत लग्न समारंभापासून ते सर्वच सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घातले आहेत.
असे आहेत नवीन निर्बंधः
• पहाटे ५ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही. म्हणजेच जमावबंदी लागू असेल.
• रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक बाबी वगळता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही, प्रवास करता येणार नाही. म्हणजेच संचारबंदी लागू असेल.
• लग्न समारंभात जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्याच उपस्थितीला परवानगी असेल.
• अत्यंविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल.
• सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
• स्विमिंग पूल, स्पा, जिम, वेलनेस सेंटर्स आणि ब्युटी पार्लर्स बंद राहतील.
• हेअर कटिंग सलूनला क्षमतेच्या ५० टक्के परवानगी असेल. रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत हेअर कटिंग सलून बंद राहतील. कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे लागेल.
• नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवावी लागतील.
• लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, सलून, दुकान, रेस्टॉरंट मालकावर कारवाई करण्यात येईल.
• पूर्वनियोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धावगळता अन्य क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात येतील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत प्रेक्षक नसतील. सर्व खेळाडू व पदाधिकाऱ्यांसाठी बायो-बबल वापरावे लागेल. प्रत्येक तिसऱ्या दिवशी सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल.
• शहर किंवा जिल्हास्तरीय क्रीडा शिबीर, स्पर्धा किंवा कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
• प्राणी संग्रहालये, करमणूक पार्क, किल्ले किंवा अन्य तिकिट लावून असलेली ठिकाणे/ कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असतील.
शॉपिंग मॉल्स/ मार्केट कॉम्प्लेक्सः शॉपिंग म़ॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील. क्षमता आणि आतमध्ये असलेल्या अभ्यागंतांची संख्या बाह्यदर्शनी फलकावर लावाली लागेल. संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच परवानगी असेल.
रेस्टॉरंट्स/खाणावळीः क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. रात्री १० वाजता बंद होतील आणि सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील. एकूण क्षमता आणि सध्या आतमध्ये असलेल्या अभ्यागंतांची संख्या बाह्य दर्शनी भागावर लिहावी लागेल. संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच परवानगी असेल.