खाजगी हॉस्पिटलमधे दाखल कोविड रुग्णांनी बिलाचे ऑडिट करून बिल भरावे

पुणे: कोविडच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड मोठी असण्याची शक्यता आहे. त्यातल्या 1 टक्के रुग्णांना हॉस्पिटलची गरज पडू शकते. दुसऱ्या लाटेत खाजगी हॉस्पिटलच्या लुटीचा अनुभव पाहता आता कोविड रुग्णांनी सरकारी यंत्रणेमार्फत बिलाचे ऑडिट करून घेऊन मगच बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोविडची साथी मध्ये आपत्कालीन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाने कोविड रुग्णांना आकारायचे दर निश्चित करून दिले आहेत. त्यानुसारच खाजगी हॉस्पिटलनी बिल आकारणे आवश्यक आहे. त्यानुसार बिल आकारणी झाली की नाही हे तपासण्यासाठी प्रत्येक खाजगी रुग्णालयात ऑडिटर नेमण्यात आला आहे.

बिलाचे ऑडिट झाल्याशिवाय बिल भरण्याची सक्ती करता येणार नाही:

आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी याबाबत सांगितले की, कोविड रुग्णांनी सरकारी यंत्रणेमार्फत बिलाचे ऑडिट करून घेतल्यानंतरच बिल भरावे. बिलाचे ऑडिट झाल्याशिवाय त्यांना बिल भरण्याची सक्ती करता येणार नाही किंवा घरी जाण्यास आडकाठी करता येणार नाही. त्याचबरोबर बिलाचे ऑडिट करण्यासाठी कुठली ही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे दीड लाखापेक्षा जास्त बिल असेल तरच त्याचे ऑडिट केले जाईल असे सरकारी यंत्रणांना म्हणता येणार नाही. शासकीय परिपत्रकानुसार त्यांनी सर्व कोविड रुग्णांच्या बिलांचे ऑडिट करणे बंधनकारक आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत जन आरोग्य अभियान यांनी केलेल्या सर्व्हेत प्रत्येक कोविड रुग्णांकडून सरासरी दीड लाख रुपये जास्त घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिसऱ्या लाटेत रुग्णांनी आता सावध राहणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *