आठवणीतील पं. बिरजू महाराज -दगडू लोमटे

ठिकाण मुंबई -१५ वर्षांपूर्वी कांही कामानिमित्त मी मुंबईला गेलो होतो. मुंबई मराठी साहित्य संघाच्या इमारतीतील गेस्ट हाऊसला उतरलेलो होतो. दोन दिवसांची कामे आटोपून दुपारी ११ वाजता पुण्याला जाण्यासाठी दादरच्या एशियाड बस स्टँडला शिवनेरी गाडीने तिकीट काढून बस मध्ये बसलो.  तिकिटा सोबत छोटी पाणी बॉटल व महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र सोबत होतंच. सामान ठेवून मी  महाराष्ट्र टाईम्स वाचत बसलो. बस निघायला १० मिनिटे बाकी होती. सवयीप्रमाणे नाटक, साहित्य उपक्रम, संगीतसभा या जाहिराती वाचत होतो. तेवढ्यात संगीत सभेची जाहिरात पहिली. पं. राजन साजन मिश्रा यांचं गायन, पं. बिरजू महाराज यांचे कथ्थक, पं. किशन महाराज यांचा तबला व उस्ताद सुजात खान यांची सतार आशी जुगलबंदी कार्यक्रम होता. कार्यक्रम मोफत होता. परळच्या रिदम हाऊस वर त्याचे मोफत पास ठेवले होते. मला एका क्षणात वाटले की हा अभूतपूर्व कार्यक्रम आपण पुन्हा  कधीच पाहू शकणार नाही. क्षणाचाही विलंब न करता माझा हात सामानाकडे गेला. आणि खाली उतरलो. कंट्रोल रूमला तिकीट खिडकीजवळ जाऊन पुण्याला जाणाऱ्यांना विचारलं की हे तिकीट आहे माझं अचानक जायचं रद्द झाला कुणाला हवंय का? संशयाने पहात एकाने ते कंट्रोलरला विचारून घेतले. २१५ रुपये तिकीट तेंव्हा होते त्याने २०० रूपये माझ्या हातावर टिकवले आणि तातडीने परत मुंबई मराठी संघाच्या गेस्ट हाऊसवर गेलो व माझा कॉट बुक करून समान परत ठेवून दिले व खाली आलो.

कार्यक्रमाची वेळ ५ वाजताची होती. मी टॅक्सी केली व रिदम हाऊस हुडकत राहिले. बराच वेळ शोधल्यानंतर ते ठिकाण सापडलं. मी पास मिळविला. थोडे शिल्लक राहिले होते. मी त्यांना कसा आलो, कुठून आलो हे सांगितल्यावर एक मोजक्या व स्टेज समोरील आठव्या रांगेतला एकमेव शिल्लक राहिलेला तो पास होता. मी त्यांना धन्यवाद देऊन बांद्रातल्या प्रसिद्ध षण्मुखानंद सभागृहाकडे निघालो.  दुपारचे चार वाजले होते. उरलेल्या वेळेत थोडंस खाऊन मी सभागृहात गेलो. भव्य सभागृह खच्चाखच्च भरलेले. मी माझी जागा घेतली व आतुरतेने कार्यक्रम सुरू व्हायची वाट पाहू लागलो.
पाचच्या ठोक्याला बेल वाजली. उद्घोषणा झाली. मंद प्रकाशात पडदा उघडू लागला आणि तबल्यावर थाप टाकत हलक्या स्वरात राजन साजन मिश्रा यांचा स्वर, किशन महाराज यांचा तबला, सतारीवर सुजात खान आणि आपल्या नेहमीचाभाव चेहऱ्यावर ठेवून भाव मुद्रेत बिरजू महाराज. मंचावर आता पूर्ण प्रकाश लक्ख झाला होता. आणि नृत्य, गायन, वादनाची सुरू झाली मैफल.

बिरजू महाराज ताल, लय अभिनयाचा बाप माणूस. वेगवेगळे आवर्तने घेताना समेवर अलगद आणून सोडण्यात त्यांचा हातखंडा. एकताल, तिनताल व द्रुत तालावर रसिकांना खिळवून ठेवणारा कलावंत. मधेच सतार वादन, मिश्रा बंधू यांचे गायन आणि मग किशन महाराज  यांचे तबला वादन. संवादिनी वर सुधीर नायक होते. सलग तीन तासापेक्षा जास्त काळ हा झंकार चालला. घुंगरु, सतारीच्या तारा, राजन साजन यांचे सुरेल स्वर आणि किशन महाराज यांचा तबला. अतिशय भारावून गेलो. सभागृहात दिग्गज लोक जमलेले. टाळ्यांचा कडकडाट. आजही तो कार्यक्रम चालू आहे आणि मी समोर बसलोय असाच भास होतो. अशी अभूतपूर्व मैफल तो क्षण सोडला तर पुन्हा आली असती का? या एका प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसतेच.

बिरजू महाराज यांना मी पुण्याच्या प्रसिद्ध सवाई गंधर्व संगीत समारोहात दोन वेळा कला सादर करताना पाहिलं आहे. नागपूरला ही असा योग आला होता. पण फक्त कथ्थकचा.  ताल, लयीचा तो बादशहाच! पुरुषांनी कथ्थक सादर करण्याची सुरुवात त्यांनी सुरू केली?  आज शेकडो मुले कथ्थक मध्ये पारंगत आहेत व नवी पिढीही समोर येत आहे. याचे पूर्ण श्रेय त्यांना जाते. केवळ नृत्यातच नव्हे तर ते विद्वान गृहस्थ होते. तत्त्वचिंतक आणि पंडित होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
-दगडू लोमटे, अंबाजोगाई
मोबाईल: 98230 09512

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *