बनावट संदेश पाठवून फसवणूक; महावितरण कडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई: वीज देयकाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने तातडीने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, अशा स्वरूपाचे बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आज दिले. त्यानंतर तातडीने पावले उचलत महावितरणने मुंबई आणि महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

महावितरणच्या नावाने वीज ग्राहकांची अशा पध्दतीने दिशाभूल करणे ही गंभीर बाब आहे.  महावितरणची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका यावेळी डॉ राऊत यांनी घेतली. 

अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये असे आवाहनही डॉ राऊत यांनी ग्राहकांना केले आहे. केवळ महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आणि अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेट वे च्या माध्यमातूनच विज बिल भरावे. याशिवाय सर्व ग्राहकांनी आपले थकित बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, अशी विनंती यानिमित्ताने डॉ. राऊत यांनी ग्राहकांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *