राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंतच्या संपूर्ण भागावर 59 कॅमेरे तैनात
नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि संपूर्ण देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे, यानिमित्ताने दूरदर्शनवरून होणारे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रक्षेपण केवळ भव्य प्रमाणातच नाही तर वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय पध्दतीने होणार आहे; कारण यंदाच्या वर्षी भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने हवाई उड्डाणाच्या कसरतींंचे प्रक्षेपण करण्यासाठी विशेष नवीन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अमृत महोत्सवानिमित्त, ताफ्यातील 75 मोठ्या विमानांद्वारे विविध नवीन स्वरूपाच्या कसरतींचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या थेट प्रक्षेपणासाठी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंतच्या संपूर्ण भागावर दूरदर्शनने 59 कॅमेरे तैनात केले आहेत आणि 160 हून अधिक कर्मचार्यांची नियुक्ती अशी अत्यंत चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सर्व पैलूंचे पूर्णत्त्वाने निर्दोष प्रक्षेपण सुनिश्चित करण्यासाठी नोव्हेंबर 2021 पासून तयारीला सुरुवात झाली. डीडीने संपूर्ण राजपथावर, राष्ट्रपती भवनाच्या घुमटापासून ते नॅशनल स्टेडियमच्या घुमटापर्यंत 59 कॅमेरे तैनात केले आहेत. राजपथ येथे 33 कॅमेरे, राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, नॅशनल स्टेडियम येथे 16 कॅमेरे आणि राष्ट्रपती भवन येथे 10 कॅमेरे बसविण्यात आले आहेत.