पुणे: शैक्षणिक, सेवा, निवडणूक आदी कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. 2021-22 या वर्षात त्रुटीअभावी प्रलंबीत आहेत अशा विद्यार्थ्यांचे आणि अर्जदारांचे नुकसान होवू नये यासाठी शासनाच्या निर्देशान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्रुटी असलेल्या प्रकरणात त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यास व अर्जदारास कळवण्यास तसेच त्यांच्या प्रकरणांतील त्रुटींची मुदतीत पूर्तता करुन घेण्याबाबत कळवण्याच्या सूचनाही समित्यांना देण्यात आलेल्या आहेत.
जात वैधता प्रमाणपत्र त्रूटीअभावी प्राप्त झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी, अन्य अर्जदारांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे आणि मूळ कागदपत्रांसह 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा राज्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याचे मुख्य समन्वयक महाधम्मज्योती गजभिये यांनी केले.