पुणे: इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. या दोन्ही वर्गाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असेही राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. मुंबईतील धारावीत शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानासमोरही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला पोलिसांनी अटकही केली आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन होणार याबाबतत विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झालेला असतानाच राज्य मंडळाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यंची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान होणार आहे. तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्चदरम्यान होणार असून १६ ते ३ मार्चदरम्यान इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा होईल. या दोन्ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. काही अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कोरोना काळामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झालेला असल्यामुळे ७० ते ८० गुणांच्या पेपरसाठी अर्धातास तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाणार आहे. कोरोना संसर्गामुळे एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षेची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचे महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असणार आहे, असेही गोसावी म्हणाले.
इयत्ता दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे भरली आहेत. तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ७२ हजार ५६५ विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्राप्त झाली आहेत.
कोरोना लस बंधनकारक नाहीः जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचे राज्य शिक्षण मंडळाचे नियोजन असून शाळा तिथे परीक्षा केंद्र देण्यात येणार असून बहिस्थ नव्हे तर शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर म्हणून काम करतील. विशेष म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना लस बंधनकारक नसल्याचे स्पष्टीकरणही राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या लक्षात घेता ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे गोसावी म्हणाले.