दगडू लोमटे यांनी लिहिलेली पत्र तरुणांच्या जीवनाला उभारी देणारी

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांचे मत; “राहून गेलेली पत्र” पुस्तकाचे थाटात प्रकाशन

अंबाजोगाई: शिक्षण हे माणसाचं मोठेपणा मोजण्याच परिमाण होवूच शकत नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले.

दगडू लोमटे यांनी लिहिलेल्या “राहून गेलेली पत्र” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. येथील नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या हस्ते तर  मुक्त पत्रकार व साहित्यिक अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे व मसाप केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य प्रा. किरण सगर, नव्या पिढीचे लेखक बालाजी सुतार, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानराव शिंदे, अक्षय मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, केंद्र बीडचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, वेणुताई चव्हाण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सतीश लोमटे, केज मसापचे अध्यक्ष राहुल गदळे  व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे पुढे म्हणाले की, दगडू लोमटे यांनी या पुस्तकात लिहिलेल्या पत्रात त्या त्या व्यक्तीच्या जीवनाची अनेक कंगोरे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात समाविष्ट असलेल्या २६ पत्रात सामाजिक अंग असलेल्या ७, व्यक्तींची चरित्र असलेल्या ७,  साहित्यिक, कवी, चित्रकार असलेल्या ४, राजकारणी नेते असलेल्या ३, पत्रकार असलेल्या २, चित्रपट आणि नाटकांनी संबंधित असलेल्या २, निसर्ग आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या २ आणि आईला लिहिलेले पत्र हे कौटुंबिक स्तरावर लिहिलेल्या पत्रांचा समावेश असल्याचे सांगत या पुस्तकात उभ्या करण्यात आलेल्या अनेक व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि भारत जोडो अभियान या दोन क्षेत्रात केलेल्या कामामुळे दगडू लोमटे यांच्या जीवनाला आकार मिळाला, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला. अल्प शिक्षण घेतलेल्या दगडू लोमटे यांच्या सारखा माणूस जगाच्या मुक्त विद्यापीठाच्या कॅनव्हास वर येवून आपली नवी ओळख निर्माण करतो हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण हे माणसाचं मोठेपणा मोजण्याच परिणामच होवू शकत नाही असे मत डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले. दगडू लोमटे यांनी लिहिलेली पत्र केवळ वाचण्यासाठीच नाही तर तरुणांना आपल्या जीवनाला उभारी देणारी ठरणारी आहेत असे सांगितले.

प्रा. रंगनाथ तिवारी यांनी आपल्या भाषणात रामदास स्वामींनी संभाजी राजे यांना लिहिलेल्या पत्राची आठवण सांगत साहित्य क्षेत्रात यापूर्वी अनेक मान्यवरांनी लिहिलेल्या अनेक गाजलेल्या पत्रांचा ओझरता उल्लेख केला. दगडू लोमटे यांनी लिहिलेली पत्र वाचताना व्यक्ती जीवंत व्हावी अशा प्रकारचे लिखाण केले आहे असे सांगत पत्र लिखाणाचा एक नवा फॉर्म विकसित व्हावा असे लिखाण दगडू लोमटे यांनी आपल्या “राहून गेलेली पत्रे “या पुस्तकातून केले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक अमर हबीब म्हणाले की, दगडू लोमटे यांचा साहित्य प्रवास हा गेली अनेक दिवसांपासून असला तरी हे पुस्तक प्रकाशन म्हणजे साहित्याशी लागलेलं लगीन आहे. त्यामुळे साहित्याशी निर्माण झालेले हे अतुट नाते कायम ठेवण्याचा, फुलवण्याचा प्रयत्न सातत्याने करावा असे आवाहन केले.

यावेळी अमर हबीब यांनी “राहून गेलेली पत्र” या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकावर व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या घेतलेलं पुस्तक भेट दिले. या पुस्तकात ब्रम्हपुत्रा ते आई यांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे तर इतर पत्रे  या उपनद्या आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या पुस्तकातील पात्र आहेत. राजकारणात वावरणाऱ्या लोकांच्या जीवनातील सुगंध या पुस्तकात आहे, असे मत अमर हबीब यांनी व्यक्त केले. आपल्या समारोपात त्यानी अनिवासी अंबाजोगाईकर साहित्य संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र काळे, अक्षय मुंदडा, राजकिशोर मोदी, भगवानराव शिंदे, बालाजी सुतार, प्रा. किरण सगर, सतीश लोमटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लेखक दगडू लोमटे यांनी  राहून गेलेली पत्र या पुस्तकाच्या निर्मिती ची संकल्पना विषद केली. जीवन पटावरील मोकळी राहिलेली रिक्त जागा भरण्यासाठी ही सर्व राहून गेलेली पत्रे लिहिली आहेत . समाजाच्या विविध प्रवाहात कार्यरत असलेल्या आणि मला भावलेल्या २६ लोकांना लिहिलेल्या पुस्तकाचा आज प्रकाशन होत असल्याचे सांगून मला भावलेल्या अजून किमान १५० लोकांवर पुढील काळात मी पत्र लिहाणार आहे असे त्यांनी सांगितले.

‘राहून गेलेली पत्रे’ या सदरात महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार, अभिनेते, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना दीर्घ पत्रांची मालिका लिहिली होती. त्याला अनेक मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक, दैनिके, पाक्षिके व फेसबुक , फेसबुक पेज व वेबपेज वरून प्रकाशित झाली होती. त्याचे पुस्तक प्रतिमा पब्लिकेशन पुण्याच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे.  दगडू लोमटे यांचे हे पहिलेच पुस्तक प्रकाशित होत आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरख शेंद्रे, डॉ. राहुल धाकडे, कोषाध्यक्षा डॉ. शैलजा बरुरे यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित जोंधळे यांनी केले तर आभार संतोष मोहिते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *