पुणे: प्रशासकीय अधिकारी, काही पदाधिकारी यांचा विरोध असतानाही, अखेरीस संस्थेवर लोकनियुक्त कार्यकारी मंडळ स्थापन करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी घेतला. बहुतांशीचां प्रखर विरोध असतानाही योग्य काय ? याची काही वेळात उकल करून निर्णय घेणे तसे सोपे काम नाही. पण प्रत्येकाच्या मताचा सन्मान करत, योग्य निर्णय घेण्याची क्षमता अजितदादा यांच्याकडे असल्याचा अनुभव बैठकीत आला. त्यामुळे वारसा, भावनिक लाट यावर दादा सत्ता पदावर नाहीत. तर निर्णय क्षमता आणि कष्टाच्या बळावर टिकून असल्याचे ठळकपणे जाणवते. सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात, वेळेत काम करण्याची हातोटी यामुळेच उपमुख्यमंत्री पदावर टिकून राहण्याची किमया साधली आहे.
स्पष्ट बोलण्याबरोबरच चुकीच्या गोष्टी थेट नाकारण्याच्या स्वभावामुळे, प्रसार माध्यमातून त्यांच्या बाबतीमध्ये सातत्याने रागीट, उद्धट, असं चित्र काही घटनांवरून रंगवल जातं आणि तशीच प्रतिमा लोकांच्या मनामध्ये तयार होते.आपणही न भेटता, अनुभव न घेता आपलं मत तयार करतो. पण एखादेवेळी कामानिमित्ताने संबंध येतो, तेव्हा मात्र हा नेता खरं काय ते ओळखनारा आणि तात्काळ निर्णय घेणारा आहे, याचाच अनुभव येतो हे अनेकांच्या बाबतीत घडले असते. असाच अनुभव मंगळवारी (२९ एप्रिल) बैठकीच्या निमित्ताने आला. प्रत्येकाची भूमिका समजून घेत, चुकीच्या गोष्टीना लगेच फटकारणे, यामुळे त्यांचा प्रशासकीय यंत्रणेत प्रचंड धाक असल्याचे दिसून येते.
भाजप महायुतीत सध्या अजितदादा पवार आहेत. मात्र, राजकीय विरोधक म्हणून तीस वर्षात भाजप नेतृत्वाने आणि प्रसार माध्यमांनी प्रस्थापित राजकारणी म्हणून त्यांच्यावर काही आरोप करत त्यांची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. पण कोण काय म्हणेल आणि कोणाला काय वाटते? याचा विचार न करता जे असेल ते स्पष्ट सांगून आपले काम करत रहाणे हेच त्यांचे धोरण दिसते. त्यामुळे अनेकदा पत्रकार इतर नेत्यांच्या विधानावर त्यांची भूमिका विचारतात तेव्हा पत्रकारांनाही खडे बोल सुनावण्यास कचरत नाहीत. त्यांची भूमिका आणि कामाचा धडाका बघितला तर हा माणूस कामाचा तर आहेच पण राज्यातील सर्वसामान्यांच्या हिताचा असल्याचे जाणवणे.
पक्षीय राजकारणतून काही वर्षांपूर्वी शालेय मुलांना धाडस, साहस आणि राष्ट्रभक्तीचे मूल्य शिक्षण देणाऱ्या संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांवर आरोपांचा कांगावा करून पक्षीय राजकारणतून तत्कालीन मंत्र्यांनी कार्यकारी मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमले. परिणामी ही मूल्यशिक्षण देणारी चळवळ जवळपास बंद पडली. चळवळीशी संबंधित आणि तळमळ असणाऱ्यांनी सातत्याने अनेक नेत्यांना हा विषय सांगून लक्ष घालण्याचा आग्रह धरला. मात्र
लोकप्रतिनिधींनी विषय समजून घेण्याचे औदार्य ही दाखवले नाही. लोकांच्या मनातील आम्हीच सत्ताधारी समजणाऱ्या नेत्यांनाही अनेकदा हा विषय सांगून पाहीलं पण उपयोग झाला नाही. एकदा तर संबंधित विभागाच्या मंत्र्याकडे येण्याची विनंती केली तेव्हा त्यांना संबंधिताकडे येणे कमीपणाचे वाटले. वर्षानुवर्षे संबंधित असल्याने या विषयात लक्ष घालावे यासाठी खेटे घातले पण आम्ही अशा ‘छोट्या छोट्या’ कामांसाठी नाहीत, आमची राजकीय उंची खूप मोठी अशी त्यांची भूमिका राहीली. मात्र, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी विषय एकाच भेटीत समजून घेतला. विषय काय आहे, यापेक्षा कोण सांगतायत या भावनेतून त्यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन संबंधित विभाग आणि पदाधिकारी यांची बैठकच लावली. बैठकीतही नियमानुसार, प्रसंगी आक्रमकपणे बाजू मांडली आणि प्रशासकीय यंत्रणेचा प्रखर विरोध असतानाही संस्थेवर लोकनियुक्त संचालक मंडळ स्थापन करण्यासाठी आग्रह धरला. अजितदादा यांनीही बैठकीत प्रत्येक सदस्याचे मत ऐकून घेतलं. काही लोक वैयक्तीक हेतू ठेवून अनावश्यक विरोध करत होते त्यांना प्रसंगी खडेबोल ही सुनावले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मांडलेली भूमिका कशी अयोग्य आहे. हे समजून सांगून काही पदाधिकाऱ्यांवर आरोप असतील तर त्यांची चौकशी करून कारवाईची आपल्याकडे तरतूद आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांवर आरोप झाला म्हणून लोकनियुक्त कार्यकारी मंडळाच्या निवडणुकाच कायमच्या रद्द करून संस्था प्रशासकीय यंत्रणेच्या ताब्यात ठेवणे हे लोकशाही मूल्यांना धरून नाही. आपण सर्व लोकशाही प्रक्रिया मानणारे आहोत. त्यामुळे असे करता येणार नाही हे स्पष्ट करून कार्यकारी मंडळ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. पाऊणतासाच्या बैठकीत अजितदादा यांची एकूण काम करण्याची पद्धत प्रत्येक सदस्याचं मत जाणून घेऊन त्यावर आपली भूमिका मांडण्याची हातोटी आणि योग्य काय? याचा निर्णय घेण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून आली.
अनेक वर्ष माध्यमात काम करत असल्याने प्रशासकीय बैठका कशा होतात आणि निर्णय कसे घेतले जातात याची पुरेपूर माहिती आहे. मात्र अजितदादा यांच्याबरोबरच्या पहिल्याच बैठकीला अनुभव अत्यंत वेगळा आणि आशावर्धक वाटला. अशा नेतृत्वातच सामान्यांचे हित साधल जाऊ शकते. कार्यकर्ते सामान्य माणसाचे जीवनमान उंचावलं जाऊ शकतं. अन्यथा वेळ देऊनही न भेटने, काम घेऊन दारात आलेल्या लोकांना का? आले म्हणून हीनतेची वागणू देणे आणि लोकांना त्यांच्या प्रश्नांभोवतीच झुंजवत ठेवणे. आणि केवळ मतदानासाठी जातीपातीच्या लाटा निर्माण करून आपल्या नेतृत्वांच्या पोळ्या भाजणाऱ्यांकडून अपेक्षाभंगा शिवाय काही साध्य होत नसल्याने लोकांचा राजकीय नेत्यांवरील विश्वासच राहीला नाही. अशा राजकीय वातावरणतही अजितदादा पवार हा नेता केवळ कष्ट आणि कामाच्या बळावरच लोकांच्या मनात टिकून आहे. आणि कामाचा दादा म्हणून लोक पाठबळ देत राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून सरकार कोणतेही असो आपलं स्थान कायम ठेवणे सोपी गोष्ट नाही.
महाराष्ट्रात अनेकांना संधी मिळते कोणाला राजकीय वारसांने तर कोणाला भावनीक लाटेवर तेव्हा पदापेक्षा लोकांपेक्षा आपण वेगळे झालोत या अविर्भावात नेते वावरतात आणि कमी काळात त्यांचा आलेख उतरायला लागतो हे सातत्याने घडते. याला अजितदादा पवार हे अपवाद ठरतात ते त्यांच्या कार्यशैलीने. त्यांचा वक्तशीरपणा, स्पष्टोक्तेपणा, निर्णय घेण्याची क्षमता, हे गुण इतर राजकीय नेत्यांमध्ये पाझरले तर राजकीय व्यवस्था दुरुस्त व्हायला मोठी मदत होऊ शकते. त्यामुळेच शायर अशोक साहील यांच्या शब्दांत सांगायचं तर..
नजर नजर में उतरना कमल होता है,
नब्ज नब्ज में बिखरना कमल होता है
बुलंदियों पे पहुंचाना कोई कमाल नहीं,
बुलंदीयों पे ठहरना कमल होता है।
-वसंत मुंडे, वरिष्ठ पत्रकार, बीड. +91 93097 82599