मुंबई: भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे, शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे राज्य युद्ध स्मारक आणि लष्करी संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार असून या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्णत्वाला नेऊन येत्या १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी सुरु करावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल एस.के. पराशर, ब्रिगेडियर डॉ. आचलेश शंकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस.चहल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ब्रिगेडियर डॉ. शंकर यांनी देशभरातील राज्य लष्करी संग्रहालयाची माहिती देणारे सादरीकरण यावेळी केले.
सल्लागार आणि डिझाईनर समितीची स्थापना
हे संग्रहालय कसे असावे, यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा हे निश्चित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या सहभागासह एका सल्लागार आणि डिझाईनर समितीची स्थापना करण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या आपल्या जवानांप्रती अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने या संग्रहालयात काही गोष्टींची अनुभूती घेता येईल अशीही व्यवस्था करण्यात यावी. बंकर कसे असतात, सियाचीनसारख्या ठिकाणी उणे डिग्री सेल्सियसमध्ये आपले सैनिक कसे राहतात, जड शस्त्रास्त्रे सोबत घेऊन आपले सैनिक वाळवंटातून कसे चालतात, जंगलात त्यांचा वावर कसा असतो, यासारख्या गोष्टींची माहिती आणि अनुभव संग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांना मिळावा.