जालना: पुणे, मुंबई प्रवासात जातांना आणि परत जालन्याला येतांना खाजगी स्लीपर ट्रॅव्हल्समध्ये 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील नूतन वसाहत भागातील एका 33 वर्षीय महिला शहरापासून जवळच असलेल्या गावात नोकरीस आहे. 25 सप्टेंबर रोजी सदर महिला आपली 14 वर्षे वयाची मुलगी घरी तिच्या वृद्ध आजीजवळ सोडून, नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेली होती. मुलीची आजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त तहसील कार्यालयात मुलीला सांगून गेली होती. काम आटोपून घरी आल्यानंतर आजीला मुलगी घरी दिसली नाही, त्यामुळे त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र आढळून आली नाही. गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांनी त्या मुलीस एका जणाने मोटारसायकलवर बसवून नेल्याचे सांगितले. सांयकाळी ड्युटीवरून आल्यानंतर त्या मुलीच्या आईने तात्काळ कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या मुलीस त्याच भागातील सुनील उर्फ मोनू संतोष जाधव याने पळवून नेल्याची नातेवाईकांना खात्री झाली होती.
दरम्यान, सुनील जाधव याने त्या मुलीला जालन्यातून छत्रपती संभाजीनगर येथे मोटारसायकलने नेले व तेथून त्याच रात्री खाजगी ट्रॅव्हल्स स्लीपर बसने पुणे आणि तेथून मुंबईला घेऊन गेला होता. मुंबईत गेल्यावर तिथे त्यांची राहण्याची सोय झाली नाही व मुलगीही थांबत नसल्याने काल रात्री पुन्हा सुनील जाधव हा मुलीला घेऊन, स्लीपर ट्रॅव्हल्स बसने परत जालना येथे घेऊन आला. पुणे, मुंबईला जातांना आणि परत जालन्याला येतांनाही स्लीपर ट्रॅव्हल्स बसमध्ये त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे समजताच नातेवाईक मुलीला घेऊन आज सकाळी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
कदीम जालना पोलिसांनी तातडीने याप्रकरणात आधी दाखल असलेल्या भादंवि. 363, 366 (अ) या गुन्ह्यात 376, 376 (2)(N) आणि पोस्को कलम 4, 5 (i), 6, 8, 12 या कलमाची वाढ करून नराधमास अटक केली आहे. हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला असून, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पिंक मोबाईल पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड करीत आहेत.