‘असा बदलला भारत’मधून उलगडणार भारताचे अंतरंग

भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार दोन खंडाचा महाग्रंथ

पुणे: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या महाग्रंथातून भारताचे अंतरंग उलगणार आहेत. ‘असा बदलला भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे’ हा दोन खंडाचा, बाराशे पानांचा महाग्रंथ जानेवारी २०२३ मध्ये वाचकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती प्रकाशक अरविंद पाटकर, महाग्रंथाचे संपादक दत्ता देसाई व मनोविकास प्रकाशनचे संपादक विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अरविंद पाटकर, आशिश पाटकर व दत्ता देसाई यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारत आहे. त्यासाठी संयोगित ढमढेरे यांच्याही सहकार्य लाभले आहे.

दत्ता देसाई म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचा आणि आत्ताचा भारत घडत गेला आहे. घडण्याची ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. प्रत्येकाला आस्था आणि कुतूहल वाटावे, असा हा प्रवास आहे. या प्रवासातील चढउतार, यासह भारताचा सर्वसमावेशक, सर्वांगीण इतिहास, लेखाजोखा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा हा ग्रंथ असणार आहे. दोन खंडातील या ग्रंथात आठ विभाग असून, त्यात साठ नामवंत लेखकांनी लिहिले आहे. आधुनिक राष्ट्राची जडणघडण : वाटा आणि वळणे, राजकीय इतिहास : प्रवाह आणि वाटचाल, साहित्य कला : भारतीय दर्शन, लोकशाही : राज्यघटना आणि संरक्षण, धर्म आणि संस्कृती, विज्ञान -शिक्षण-आरोग्य-क्रीडा माध्यमे, उद्योग विकास अर्थकारण पर्यावरण, जात-स्त्री-कामगार-परिजन (आदिवासी /भटके विमुक्त) असे आठ विभाग आहेत.”

“हा शतक-दीड शतकाचा संग्राम नेमका काय होता? त्याचे नायक कोण? विविध प्रवाह, प्रक्रिया व त्यामागील शक्ती, जनतेच्या भूमिका काय होत्या? स्वतंत्र भारत ‘रेडिमेड’ मिळाला की आजही घडतो आहे? गेल्या ७५ वर्षांत स्वातंत्र्याची कमाई काय? आजचा ताणतणाव, वसाहतीकडून महासत्तेकडे जातोय का? पुढील २५ वर्षांत भारतात कसा बदलेल? अशा अनेक प्रश्नांची उकल या ग्रंथातून होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, समीक्षक, लेखक, राजकीय विश्लेषक, अभ्यासू पत्रकार यांनी चिंतनशील लेख लिहिले आहेत,” असे दत्ता देसाई यांनी नमूद केले.

अरविंद पाटकर म्हणाले, “महाग्रंथाची निर्मिती, वाचन संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी याकरीता एक चळवळ म्हणून याकडे पाहत आहोत. यासाठी आशिष पाटकर आणि संयोगिता ढमढेरे यांचेही सहकार्य लाभले आहे. प्रत्येक जिज्ञासू नागरिकाने, अस्वस्थ देशप्रेमाने, स्वातंत्र्य व लोकशाही प्रेमीने, अध्यापक-अभ्यासकाने, विद्यार्थी-तरुणांनी, कार्यकर्ता-पत्रकाराने हा ग्रंथ वाचावा, असा असणार आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यासह गाव ग्रंथालय, स्वयंसेवी व संशोधन संस्था यांच्यापर्यंत हा ग्रंथ पोहोचवणार आहोत.”

या लेखकांनी दिले आहे योगदान: या ग्रंथात जुन्या व नव्या पिढीतील अभ्यासू लेखकांनी लेखन केले आहे. डॉ. जयंत लेले, डॉ. गणेश देवी, सुहास पळशीकर, प्रताप आसबे, रावसाहेब कसबे, शांता गोखले, डॉ.माया पंडित, गजानन खातू, तारा भवाळकर, डॉ. अनंत फडके, किशोर बेडकिहाळ, अजित अभ्यंकर, दत्तप्रसाद दाभोळकर, प्रदीप पुरंदरे, अनंत बागाईतकर, गोपाळ गुरु, विजय खरे, इरफान इंजिनिअर, प्राची देशपांडे, श्रध्दा कुंभोजकर, संध्या नरे-पवार, अशोक राणे, नीला भागवत, नुपूर देसाई, श्रीरंजन आवटे, अभिषेक भोसले, रणधीर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर लेखकांचा समावेश आहे.

महाग्रंथाच्या नोंदणीसाठी: या महाग्रंथाची प्रत आरक्षित करण्यासाठी मनोविकास प्रकाशन, फ्लॅट न. ३, ए/४ शक्ती टॉवर्स, ६७२ नारायण पेठ, पुणे-३० किंवा मनोविकास बुक सेंटर, आकाशवाणी, आमदार निवास आवार, चर्चगेट, मुंबई येथे संपर्क करता येईल. तसेच ०२०-२९८०६६६५, ८८८८५५०८३७ किंवा ९५९४७३८११० या दूरध्वनीवर आपली प्रत नोंदवता येईल, असे पाटकर यांनी सांगितले.

मराठी प्रकाशन व्यवसायाला शासनाने सहकार्य करावे: मराठी प्रकाशन व्यवसाय हा पुस्तकाच्या विक्रीवर उभा आहे. त्याला शासनाचे सहकार्य असावे. सध्याच्या डिजिटल प्रवाहाचा वाचन संस्कृतीवर फारसा परिणाम झालेला नाही. वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचवण्यात आम्ही कमी पडतो. ललित साहित्याच्या दुकानाची वानवा आहे. त्यामुळे मराठी प्रकाशन व्यवसाय आक्रसत चालला आहे. महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात प्रत्येकी एक तरी दुकान उभारण्यासाठी भाडे तत्वावर का होईना शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक अरविंद पाटकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *