नांदेड: कोरोना महामारीच्या पार्शवभूमीवर मागील सुमारे दोन महिन्यापासून बंद आसलेली चर्मकार समाजाची चप्पल बूट विक्रीची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच मध्यप्रदेश सरकारने पुजाऱ्यांसाठी आठ कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज नुकतेच दिले आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रातही गोरगरीब चर्मकार समाजासाठी दहा कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी अ.भा. गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनादवारे केली आहे.
चर्मकार समाजाच्या उपजीविकेचे साधन म्हणजे चप्पल बूट विक्री व दुरुस्ती करणे हे आहे. कोरोना महामारिमुळे मागील दोन महिन्यापासून हे सारे व्यवसाय शासनाने बंद ठेवले आहेत. सध्या चर्मोद्योग व्यवसाय बंद असल्या कारणाने हातावर पोट असणाऱ्या चर्मकार समाजाची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. ही अवस्था जवळपास सर्वच बारा बलुतेदार समाजाची झाली आहे. यातून दिलासा म्हणून शासनाने कांही दुकाने, उद्योग व व्यवसाय कांही काळ उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे गोरगरीब समाजाची उपासमार थांबू शकते, परंतु यातून चर्मोद्योग, चप्पल बूट विक्री व दुरुस्तीची दुकाने चालू करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. हे समाजावर अन्यायकारक असे आहे. शारीरिक अंतर राखून सुरक्षितरित्या चप्पल बूट विक्री करता येणे सहज शक्य आहे. सध्या कडक उन्हाळा आहे व पायाच्या संरक्षणासाठी पादत्राणे आवश्यक आहेत. यामुळे जनतेची होरपळ थांबणार आहे.
चर्मकार समाजाच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा आणि जनतेच्या गरजेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रोज कांही तास चप्पल बूट विक्री व दुरुस्ती (गटाई) करण्याची ही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच चर्मकार समाजाचा भूकबळी होऊ नये यासाठी दहा कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्यात यावे, मध्य प्रदेश सरकारने पुजाऱ्यांसाठी आठ कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज नुकतेच दिले आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रातही गोरगरीब चर्मकार समाजासाठी दहा कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्यात यावे. अन्यथा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने सर्व कार्यकर्ते शुक्रवार, २२ मे पासून आपापल्या घरी राहून लाक्षणिक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड यांच्यासह जिल्हाध्यक्ष गंगाधराव गंगासागरे, विठल उकंडे, महासचिव प्रकाश कामळजकर, युवा जिल्हाध्यक्ष संतोष बोराळकर आदींनी दिला आहे.