मुंबई: हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. अमिताभ यांना मुंबईतील नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अमिताभ यांचे चिरंजीव अभिनेते अभिषेक बच्चन यांचीही कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. अभिषेक यांनीही ही माहिती ट्वीट करून दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. बच्चन कुटुंबिय राहत असलेला जलसा हा बंगला सॅनिटाईज करण्यात येणार आहे.
अमिताभ यांना आज शनिवारी सायंकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रात्री ट्वीट करून तपशीलवार माहिती दिली. ‘माझी कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. मला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील अन्य सदस्य आणि स्टाफचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया कोरोनाची तपासणी करून घ्यावी.’ अशी विनंती केली आहे.