मुंबई: औरंगाबाद शहरासाठी मंजूर १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेस गती देण्याच्या सूचना पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केल्या.
संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा योजनेवर चर्चा करण्यासाठी श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार संजय शिरसाट, पाणी पुरवठा विभागाचे सचिव संजीव जैस्वाल, जीवन प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्यासह मुंबई महापालिकेचे पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १६८० कोटींची योजना मंजूर आहे. योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी कामाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही. आजच्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली. संथ कामाबाबत पालकमंत्री तसेच पाणी पुरवठा मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना गतीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदारास सूचना केल्या. दरम्यान, पाइपालाइनचा खर्च वाढला असून वाढीव खर्चाचा प्रस्ताव कंत्राटदाराने सादर केला.त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागणीच्या प्रस्तावाची छाननी करून नगर विकास विभागास कळवण्यात आल्याची माहिती दिली.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सल्ला
आजच्या बैठकीत संभाजीनगर शहरातील जुन्या पाणी पुरवठा योजना व सध्या नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली. जुन्या पाणी पुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेतील अनुभवी अधिकाऱ्यांना बैठकीला पाचारण करण्यात आले होते. येत्या काळात त्यांचा सल्ला घेऊन औरंगाबाद शहरातील जुनी पाणी पुरवठा योजना सुधारण्या बाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
निवृत्त व अनुभवी अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर घेणार
संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पाणी पुरवठा विभागात काम केलेल्या निवृत्त तज्ज्ञ मंडळीची नियुक्ती करण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.