जालना: शहराजवळील दरेंगाव शिवारात ड्रायपोर्टनजीक असलेल्या ढाब्यावर काल सांयकाळी भिलपूरी येथील तरुण सिद्धार्थ मांदळे हा मित्रांसह जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण आटोपून तो परत निघत असतांना चुकीने त्याच्या मोटारसायकलसारखीच असलेली मोटारसायकल तो घेऊन गेला होता.
दुसऱ्याची मोटारसायकल चुकून आपण घेऊन आल्याची बाब लक्षात येताच, ती परत करण्यासाठी तो मागे निघाला होता, तेवढ्यात ज्यांची मोटारसायकल होती, तो व्यक्ती 5 ते 6 जणांसह त्याचा पाठलाग करीत आला होता. भिलपूरी गावाजवळ असलेल्या खदानीजवळ सिद्धार्थ यास गाठून या जमावाने बेदम मारहाण केली. मोटरसायकल चुकून बदली झाल्याचे तो आकांताने सांगत असतांना कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, जीव वाचवण्यासाठी तो सैरावैरा पळत होता, तरीही त्याला हा जमाव मारहाण करीत होता. मारहाण सुरू असताना सिद्धार्थाने गावातील नातेवाईकाला फोन करून, हा प्रकार कळवीला होता. मात्र, नातेवाईक येईपर्यंत सिद्धार्थचा जीव गेलेला होता.
सिद्धार्थ जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असतांना खदानीत पडल्याचे सांगण्यात येते आहे. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.