औरंगाबाद: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन तसेच कलेक्टर ऑफिसमधील प्रतिनिधी यांच्या पथकाने शहरातील काही औषधी दुकानांची पाहणी केली. या दरम्यान ८ औषधी दुकानांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत असे आढळून आले की, वेलनेस फॉर एव्हर केमिस्ट, उस्मानपुरा आणि खडकेश्वर हेल्थ केअर सिडको या दोन दुकानांमधून बेकायदेशीर रित्या शेड्युल एच औषधाची विक्री सर्रासपणे होताना आढळून आले. परिणामी या दोन दुकानांवर कारवाई करून नोटीस बजावण्यात येणार आहे.
याबरोबरच गुरुनानक मेडिकल स्टोअर्स व संत एकनाथ मेडिकल स्टोअर्स, उस्मानपुरा यांची विक्री नियमाचे पालन करुन सुरू असल्याचे यावेळी निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये कोरोनाची लक्षणे जसे की, सर्दी, ताप, खोकला इत्यादीसाठी लागणारी औषधे विदाऊट प्रिस्क्रिप्शन दिले जाऊ नयेत अशा सूचना केल्या होत्या.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात, लक्षणे असताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अयोग्य औषधी घेतल्यामुळे कोरोनाचे लवकर निदान होण्यास समस्या होत आहे. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयाचे काटेकोरपणे पालन होत आहे का नाही याची नियमितपणे तपासणी करण्यात येणार आहे.