मुंबईः सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे रखडलेली आकरावीसह सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाशिवाय पूर्ण कराव्यात असा शासन आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून संबंधित प्रशासकीय विभागांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील ९ सप्टेंबर २०२० नंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडावी, असे या शासन आदेशात म्हटले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबरपूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील परंतु त्यांना प्रवेश देण्यात आलेले नसतील, अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावे. हा शासन निर्णय मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहील, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र. अं. खडसे यांच्या स्वाक्षरीने २४ नोव्हेंबर रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील शैक्षणिक संस्थामधील प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. ही प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार, याबाबत विद्यार्थी आणि पालकांनाही उत्सुकता होती. त्याबाबतची विचारणा वारंवार केली जात होती. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन आदेश जारी केल्यामुळे रखडलेल्या प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.