शरद पवार यांना डी.लिट. मिळावी यासाठी अंबाजोगाई चे अंकुश ढोबळे यांनी ६०० किलोमीटरचा अंबाजोगाई ते मुंबई असा केला होता प्रवास
औरंगाबाद: शरद पवार यांनी नामांतराच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन दलित समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली होती. त्यांनीमराठवाडा विद्यापीठाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करुन नामांतराचा प्रश्न सोडवला होता. त्यामुळे १९९५ मध्ये अंबाजोगाई ते मुंबई असा सायकलवर प्रवास करत राज्यपालांची भेट घेऊन लोकनेते शरद पवारांना डी.लिट ही मानद पदवी मिळावी म्हणून त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल डॉ. पी.सी. आलेक्झांडर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पहिल्यांदा मागणी करणारे व याच मागणीसाठी उपोषणाचा इशारा देणारे कार्यकर्ते अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडीचे माजी सरपंच अंकुश तुकाराम ढोबळे यांच्या प्रयत्नाला आज अखेर यश आले आहे.
अंकुश ढोबळे यांनी २७ वर्षापूर्वी अंबाजोगाई ते मुंबई असा सहाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर केला. त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. डॉ. पी.सी. आलेक्झांडर यांची राजभवनात भेट घेऊन पवार यांना डी. लिट. ही मानद पदवी बहाल करावी अशी मागणी केली होती. अंकुश ढोबळे यांच्यासह भारत वेडे या दोघांनी १७ डिसेंबर १९९५ ते ७ जानेवारी १९९६ असा तब्बल ६०० किलोमीटरचा एक महिन्याचा सायकल प्रवास अंबाजोगाई ते मुंबई प्रवास केला
होता. त्यावेळी या सायकलस्वराचे प्रत्येकालाच कुतूहल वाटत होते. त्यावेळचे राजभवनचे कुलपतीचे अवर सचिव सु.मो. डाखोरे यांनी १६-१-१९९६ रोजी पत्र पाठवून सदर कार्यवाही बाबत विद्यापीठाच्या कुलसचिवाला कळविले होते. विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे, तत्कालिन प्रा. विद्यमान व्यवस्थापन सदस्य प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांची भेट घेतली होती.
तब्बल २७ वर्षाच्या कालखंडानंतर शरद पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आज १९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यपालांच्या उपस्थितीत डी.लिट.ही पदवी पदवी प्रदान समारंभात शरद पवार यांना बहाल करण्यात येत आहे. ही बाब अतिशय आनंदाची स्वप्नपूर्ती होत असल्याने समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया अंकुश ढोबळे यांनी व्यक्त केली आहे.