# बजाज नंतर आता ‘पार्ले’चा ‘रिपब्लिक’ला दणका.

द्वेष पसरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय

मुंबई: टेलेव्हिजन क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता जाहिरातदार देखील त्यासंदर्भात मोठा निर्णय घेत आहेत. या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय बजाज ऑटोने घेतल्यानंतर आता पाठोपाठ बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या पार्ले कंपनीनेही आपल्या जाहिराती काही वृत्तवाहिन्यांवर न दाखवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

टीआरपी घोटाळा पोलिसांनी उघड केल्यानंतर यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे प्रमुख जाहिरातदार आणि मीडिया एजन्सीने म्हटले आहे.आम्ही द्वेष पसरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, अशी शक्यता आम्ही पडताळत आहोत, ज्यात इतर जाहिरातदार एकत्र येतील आणि वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देण्याच्या आपल्या खर्चाला आळा घालतील, जेणेकरुन वृत्तवाहिन्यांना स्पष्ट संकेत जाईल की, आपल्या मजकुरात बदल करणे त्यांना गरजेचे आहे. आम्हाला आक्रमकता आणि द्वेष वाढवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या वाहिन्यांवर खर्च करायचा नाही, कारण ते आमचे ग्राहक नाहीत.

दरम्यान, पार्लेच्या आधी उद्योजक आणि बजाज ऑटोचं व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी तीन वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केल्याचं सांगितलं होतं. राजीव बजाज म्हणाले होते की,”एक मजबूत ब्रॅण्ड असा पाया असतो ज्यावर तुम्ही एक मजबूत व्यवसाय उभा करता. अखेर एका व्यवसायाचा उद्देशही सामाजात काही योगदान देण्याचा असतो. आमचा ब्रॅण्ड कधीही अशा कोणाशीच जोडलेला नाही जे समाजात द्वेष पसरवण्याचा स्रोत असल्याचं आम्हाला वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *