संग्रहित छायाचित्र
मुंबई: राज्यात खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करीत असताना लॉकडाऊनमध्ये पेरणीपूर्व कामे, शेतमजुरांची ये-जा, खते, बियाण्यांची वाहतूक आणि विक्री व्यवस्था आदी शेतीशीनिगडीत कामे लॉकडाऊन परिस्थितीत रखडणार नाहीत, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
शेतीविषयक कामे रखडू नयेत यासाठी राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून शेतीविषयक साहित्याच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व कृषी सेवा केंद्र तसेच कृषी साहित्याची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने पूर्णवेळ उघडी राहतील. तसेच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे. अपवादात्मक परिस्थितीत या दुकानांच्या वेळा बदलण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने याकाळात कोणती दक्षता घेतली पाहिजे यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. शेतमजुरांना कामासाठी ये-जा करणे सहजसुलभ व्हावे तसेच शेतीविषयक व्यवसायातील व्यक्ती आणि संबंधित विभागातील अधिकारीआणि कर्मचारी यांच्यासाठी कृषी विभागाने दिलेली प्रवेश पत्रे ये-जा करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावीत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात, असे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले आहेत. खरीप हंगामासाठी कृषी विभागातील अधिकारी अणि कर्मचारी यांची गरज लक्षात घेता कोरोना प्रतिबंधाच्या कामासाठी या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले आहे.