संगमनेर: महसूल विभागाच्या सर्व सेवासुविधा ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’द्वारे एका क्लिकवर घरबसल्या उपलब्ध झाल्या आहेत. इनलाईन नाही तर ऑनलाईन हे शासनाचे धोरण आहे. या लोकाभिमुख डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृतवेल मीडियाच्या ‘अमृतवेल गव्हर्नन्स’ने ‘महाराष्ट्राचा डिजिटल सातबारा’ हा विशेषांक प्रसिद्ध केला. या अंकाचे प्रकाशन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. सातबारा संगणकीकरण आणि महसूल विभागाच्या सेवा डिजिटल स्वरूपात देण्याच्या उपक्रमाची सुरूवात आघाडी सरकारच्या काळात थोरात महसूलमंत्री असताना झाली होती. आता हा उपक्रम त्यांच्याच कार्यकाळात पूर्णत्वास गेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. या संगणीकरणाच्या वाटचालीची, सर्व डिजिटल उपक्रमांची आणि सुविधांची सविस्तर माहिती या अंकामध्ये देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना मंत्री थोरात म्हणाले, सातबारा संगणकीकरण हे क्लिष्ट आणि आव्हानात्मक काम होते. मात्र महसूल विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी आणि या प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप आणि त्यांची टीम या सर्वांच्या अथक मेहनतीमुळे हे साध्य होऊ शकले. तलाठी, मंडळ अधिकारी यांनी यामध्ये विशेष मेहनत घेतली. यामध्ये केवळ संगणकीकरणच नव्हे तर विविध डिजिटल माॅडेल्स तयार झाले आहेत. महाराष्ट्राचा डिजिटल सातबारा ग्लोबल झाला आहे. तो केव्हाही आणि कुठेही उपलब्ध होईल. महाराष्ट्राच्या या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी इतर राज्यांचे महसूलमंत्री उत्सुक आहेत. त्याअर्थी हा प्रकल्प देशासाठी पारदर्शी ठरेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी संगणकीकरण व डिजिटलायझेशन प्रकल्प आणि प्रक्रियेचा प्रवास मांडला. तसेच याचे महत्त्वही विषद केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अमृतवेल मीडिया समूहाचे संपादक धर्मेंद्र पवार यांनी केले. तर आभार तहसीलदार अमोल निकम मानले.