बीड: जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे गेवराई शहरातील ३ तसेच अंबाजोगाई शहर येथील १, परळी शहरातील २, परळी तालुक्यातील १ ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे .
गेवराई शहरातील धनगर गल्लीमधील जामा मस्जिद परिसर, दास घोडके यांचा मळा बस स्टँड समोर व सिद्धिविनायक कॉलनी. तसेच अंबाजोगाई शहर येथील केशवनगर, परळी शहरातील माणिक नगर व उपजिल्हा रुग्णालय परिसर, परळी तालुक्यातील संपूर्ण दैठणाघाट या गावातील संबंधित परिसरात कंटेन्मेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे. तसेच सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येऊन पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लाॅकडाऊन कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.
अंबाजोगाईतील सातपुते कॉलनी येथील कंटेनमेंट झोन शिथील:
अंबाजोगाई शहरातील सातपुते कॉलनी येथील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.