पुणे: बंगालच्या उपसागारातील उत्तर पूर्व भागात तयार झालेले अमफन चक्रीवादळाने प्रचंड वेग घेतल्यामुळे ते पूर्व किनारपट्टीकडे सरकले असून, या वादळाचा वेग मंदावत चालला आहे. पुढील दोन दिवसात हे चक्रीवादळ पूर्णपणे शमणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. असे असले तरी किनारपट्टीसह ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले अमफन चक्रिवादळाची वेग दोन दिवसांपूर्वी ताशी 275 कि.मी.पर्यंत गेला होता. तो बुधवारपासून 155 ते 180 कि.मी.एवढा कमी झाला आहे. पुढील दोन दिवसात या चक्रीवादळाचा वेग आणखी कमी होईल. सध्या हे चक्रीवादळ बांग्लादेशमधील हतिया, सुंदरबन या बेटांसह पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाम तसेच पुढे आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत झेपावले आहे. या चक्रीवादळामुळे केरळ, दक्षिण कर्नाटकसह पूर्व किनारपट्टीवर मुसळधार अतिवृष्टी होत आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले अमफन चक्रीवादळ पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेशपर्यंत (पूर्व किनारपट्टी) झेपावले आहे. यामुळे या भागात वादळासह मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, 21 मे पर्यंत ओडिशा आणि 22 मे पर्यंत पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागातून हे चक्रीवादळ पूर्णपणे थांबणार असल्याच्या शक्यतेला पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनीही दुजोरा दिला आहे.
या राज्यांमध्ये अतिवृष्टी:
पश्चिम बंगाल, केरळ, आंध्रप्रदेश, आसाम, ओडिशा, नागालॅड, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, सिक्कीम या राज्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे.