# साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने कामगारांसाठी मुक्त विद्यापीठ गरजेचे.

सामाजिक संवादातील सूर

औरंगाबाद: सन २०२० हे अण्णा भाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यांचे साहित्य व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांनी कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांच्या उत्कर्षासाठी सुद्धा अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव व्हावा म्हणून त्यांचे नावाने कामगारांसाठी एखादे मुक्त विद्यापीठ स्थापन झाल्यास त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण होईल या सदभावनेने प्रा. श्रीकिशन मोरे (उपप्राचार्य, मा.प. विधी महाविद्यालय, औरंगाबाद) यांनी “अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठा”ची संकल्पना मांडली आहे. त्या साठी तयार केलेल्या संकल्पने (Concept Note) वर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद साधून ते त्यांच्या भूमिका जाणून घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट २०२० रविवार रोजी गुगल मिटवरून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांचा ऑनलाइन सामाजिक संवाद आयोजित केला होता.

भारतीय संविधानाच्या सरनाम्याच्या वाचनाने या आॅनलाईन संवाद कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या संवादात प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे (आंबेडकरी विचारवंत, औरंगाबाद) व प्रा. डॉ. बी. एस. वाघमारे (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली) यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विजय भाऊ शिंदे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नवी दिल्ली) हे होते. विविध ठिकाणाहून सहभागी झालेल्या मान्यवरांद्वारे या संवादात सकारात्मक व मार्गदर्शक चर्चा घडून आली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोर राऊत (समाजशास्त्र विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती) यांनी केले. प्रा. डॉ. संजय सांभाळकर (उपप्राचार्य, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, वाळूज, औरंगाबाद) यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रा. श्रीकिशन मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संकल्पित विद्यापीठाची ध्येय व उद्दिष्टे आणि इतर बाबींवर सविस्तर विचार व्यक्त केले. त्यांनी या विद्यापीठाच्या स्थापनेतून अण्णा भाऊंना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रामाणिक आदरांजली अर्पण करता येईलच परंतु त्याबरोबरच कामगारांना शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करून औद्योगिक क्षेत्रात एक क्रांतिकारक परिवर्तन आणता येईल असे मत मांडले. या विद्यापीठाच्या स्थापनेमागे कामगार सक्षम तर उद्योग सक्षम, उद्योग सक्षम तर देश सक्षम असा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी या प्रसंगी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठ स्थापनेची संकल्पना ही महत्त्वाची व अभिनव असून संकल्पित विद्यापीठाची गरजच आहे. ते शेतकरी व कष्टकरी यांच्यासाठी सुध्दा असावे असे मत व्यक्त करतांना विद्यापीठाच्या नावात सुद्धा तसा उल्लेख करता येईल असे प्रतिपादन केले. या विद्यापीठात कायदा व औषधी शास्त्र असे जीवन सन्मुख अभ्यासक्रम असावेत. त्याच बरोबर त्याद्वारे परदेशी गुंतवणुकीला चालना देणे व मूल्यांची संरचना करणे हे सुद्धा या विद्यापीठाच्या माध्यमातून साध्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रा. डॉ. बी. एस. वाघमारे यांनी सुद्धा आपले विचार सविस्तरपणे विशद केले. अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठ स्थापनेची संकल्पना ही महत्वाची असून या संकल्पित विद्यापीठाच्या माध्यमातून अण्णा भाऊंचे विचार अभ्यासलै जाऊन त्यांचे पुनरुत्पादन होईल व या द्वारे अण्णा भाऊंचे समाज विज्ञान मांडले जाइल अशी अपेक्षा व्यक्त केली.

विजय भाऊ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात अण्णा भाऊंच्या कार्य-कर्तृत्ववाचा गौरव होण्यासाठी या विद्यापीठाच्या स्थापनेची गरज व्यक्त करून ते त्यांचे जिवंत स्मारक होईल असे विचार व्यक्त केले.

या सामाजिक संवादात प्रा. डॉ. टी. एस. मोरे (बार्शी), प्रा. डॉ. भास्कर पाटील (अकोला), प्रा. डॉ. जितेंद्र जगताप (मंठा), प्रकाश दादा कांबळे (पूर्णा), प्रा. डॉ. दिलीप अर्जुने (जालना) यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रा. डॉ. टी. एस. मोरे यांनी अण्णा भाऊ हे कायमच वंचित ठेवले गेले आहेत. या निमित्ताने त्यांच्या कार्याला संस्थात्मक रूप देता येईल असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. भास्कर पाटील यांनी संकल्पित विद्यापीठाच्या माध्यमातून अण्णा भाऊंची शैक्षणिक पुनर्मांडणी होईल, तर प्रा. डॉ. दिलीप अर्जुने यांनी संकल्पित विद्यापीठाच्या माध्यमातून पुढील पिढीसाठी अण्णा भाऊंचा आदर्श निर्माण करून ठेवता येईल असे मत व्यक्त केले.

या सामाजिक संवादात डॉ. दिगंबर नेटके (संचालक, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) यांचेसह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध ठिकाणांहून मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *