अंबाजोगाईच्या पंचक्रोशीत वकिली व न्याय क्षेत्रात प्रसिद्ध नाव म्हणजे अण्णासाहेब लोमटे. अंबाजोगाईला पूर्वी तालुका पातळीवरचे न्यायालय होते. त्याकाळी प्रसिद्ध वकील मंडळी होती त्यात ऍड. आर. डी. देशपांडे, ऍड. बोर्डे, ऍड. भालचंद्र, ऍड. रा. स. देशपांडे, ऍड. शिवाजीराव लोमटे, ऍड. तुळशीराम लोमटे, ऍड. मीर फरकुंद अली उस्मानी असे अनेक नामवंत नावे घेता येतील. नंतरच्या पिढीत जी नावारूपाला वकील मंडळी आली त्यात ऍड अण्णासाहेब लोमटे नवाब यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. तसे अनेक लोमटे वकिली व्यवसायात आले होते. पण मेहनत व कुशाग्र बुद्धीचा वापर करून न्याय मिळवून देतात अशी ख्याती त्यांनी निर्माण केली ते यशस्वी वकील झाले.
खरे तर त्यांचे वडील काशीनाथराव लोमटे नवाब हे अण्णासाहेब यांनी बी.ए. झाल्यावर पुढे काय करावे? अशा विचारात होते. तेंव्हा भगवानराव लोमटे बापू यांचे राजकीय व सामाजिक वजन व गावात त्यांना मान होता. काशीनाथराव दादा लोमटे यांनी बापूंचा सल्ला घेतला. बापूंनी अण्णासाहेब यांनी एल.एल.बी. करून वकिली करावी अशी इच्छा व्यक्त केली व आदेशच दिला आणि दादांनी त्यांना लातूरला एल.एल.बी. साठी शिकायला ठेवले. पुढे विधिवत पदवी मिळवली. परत आल्यावर भगवानराव बापूनी अण्णांना ऍड. आर. डी. देशपांडे यांच्याकडे नेले व याला निष्णात वकील करा हे तुमच्या सोबत काम करेल व शिकेल. त्या काळात आर. डी. देशपांडे यांचा न्याय क्षेत्रात प्रचंड प्रभाव होता. बापूंचा शब्द ते मोडू शकले नाहीत. खुशीने आर. डी. नी अण्णांना शिकवले. अण्णांनी सिव्हिलमध्ये जास्त लक्ष न घालता क्रिमिनलमध्ये जास्त जम बसवला व लोकांना न्याय मिळवून देण्याची किमया त्यांनी प्राप्त केली. पुढे स्वतंत्र काम पाहू लागले. लोकप्रियता मिळाली. वकील संघाचे ते अनेक वेळा अध्यक्ष झाले. पुढे वकील संघामार्फत प्रयत्न करुन सत्र न्यायालय अंबाजोगाईला व्हावे यासाठी त्यांनी सर्व वकिलांना सोबत घेऊन प्रयत्न केले व ते मान्यही झाले. प्रसिद्धी प्राप्त झाल्यावर अनेक ज्युनियर लोक त्यांच्या हाताखाली शिकू लागले. वकिली व्यवसाय करू लागले. फारच कमी कालावधीत ते सुप्रसिद्ध वकील झाले. त्याचबरोबर आपला पुतण्या अजित व आपल्या दोन्ही मुलींना त्यांनी वकील बनवलं. एक हायकोर्टात व्यवसाय करते एक जज झाली. हे प्रोत्साहन फार मोलाचे आहे.
परळी भागातील शेतकऱ्यांनी खसखस पिकवली. सरकारने या शेतकऱ्यावर अफूची शेती केली म्हणून खटला भरला व त्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले ती केस खूप गाजली. त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.
वकिली सोबत त्यांना गोपीनाथराव मुंडे व भगवानराव बापू लोमटे यांनी पुढे परळीचा वैद्यनाथ सहकारी बँकेवर संचालक म्हणून 10 वर्ष संधी दिली. तिथे यशस्वी काम केले. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा हा हनुमान सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून त्यांना लाभला. भगवानराव लोमटे बापू यांनी व गल्लीतील सूज्ञ नागरिकांनी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. कालांतराने त्या मंडळातून शाळा महाविद्यालय सुरू केली. त्या संस्थेचे बापू अध्यक्ष तर सचिव म्हणून अण्णांनी अनेक वर्षे काम पाहिले.
वरून अत्यंत कठोर वाटणारे अण्णा आतून प्रचंड हळवे होते. चांगलं काम करणाऱ्यास प्रोसाहित करण्याची कला त्यांच्याकडे होती. बालुतात्या लोमटे हे त्यांचे चुलते. ते नगराध्यक्ष झाले. त्यांचा मान ते ठेवत. वयाने मोठ्या व्यक्तीला सन्मान कसा द्यावा ते अण्णाकडून शिकावे. कुटुंब वत्सल. घरातील सगळी मुलं, मुली व सुना याना शिकवलं आणि व्यवसायात उतरवून यशस्वी उद्योजक, वकील, शिक्षक बनविले. सुसंस्कृत कुटुंब व एकत्र कुटुंब हा त्यांचा ध्यासच होता. नातेवाईक यांची आस्थेने चौकशी करून बोलत.
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह सातत्याने श्रम करून पुढे नेतोस व बापूंचे स्वप्न पूर्ण करतोस म्हणून माझं नेहमी कौतुक करत असत. २०१९ साली फेब्रुवारीत पुण्यात सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, न्या. नरेंद्र चपळगावकर, खा. रामशेठ ठाकूर, मधुकर भावे यांच्या हस्ते विशेष सत्कार झाला व या वर्षी १ मार्च २०२० ला पुण्यात डॉ. अणासाहेब गुंजकर स्मृती पुरस्कार मिळाला त्याचे त्यांना खूप कौतुक होते. त्या पुरस्कार समारंभात घालण्यासाठी खास जॅकेट त्यांनी मला घेतले. त्यासाठी लातूरला स्वतः घेऊन गेले. तिथे एक प्रसिद्ध टेलरकडे ते शिवायला टाकले. नंतर गाडी पाठवून मागविले. त्यांनी हे कौतुक केले त्याचे मोल करता येत नाही. पुण्याला पुरस्कार घेण्यास जाताना संभाजी चौकात त्यांच्या ऑफिसमध्ये सगळे पुतणे, मुलं व मित्र परिवार बोलावून माझा आशीर्वादपर सत्कार केला. हे कसे विसरता येईल. हे प्रेम कशात मोजता येत नाही. त्यांची गेल्या पाच सहा वर्षात तबेत बरी नव्हती तरी ते सतत कामात व्यस्त असायचे. त्यांच्या निधनाने लोमटे कुटुंब, समाज, वकिली क्षेत्र, आप्तेष्ट व मित्र परिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
जन्म: १० ऑक्टोबर १९५३
मृत्यू: 3 सप्टेंबर २०२०
-दगडू लोमटे, अंबाजोगाई