जन्मदिन: १६ जून १९२०
स्मृतीदिन: २६ सप्टेंबर १९८९
हेमंतकुमार यांचा वाराणसी येथे जन्म झाला. अत्यंत तलम आवाजात त्यांनी गाणी गायली आहेत. हिंदी बरोबर काही मराठी गाणी पण त्यांनी म्हटली आहेत, त्यापैकी सुधीर मोघे व शांता शेळके यांची दर्या गीते खूप प्रसिद्ध झाली. मी डोलकर, गोमू संगतीनं इत्यादी. उत्तम गीतकार, उत्तम संगीतकार व उत्तम गायकांचा तो सुवर्णकाळ होता.
हेमंतकुमार बहुसंख्य भारतीय भाषांमध्ये गायले, तरी मराठी भाषेत गाताना मात्र हेमंतकुमार अस्सल मराठी भाषिक वाटले. प्रितीच्या चांदराती, घेऊन हात हाती, जोडू अमोल नाती, ये ना’ ह्यासारखं मराठी भावगीत असो किंवा मराठीत जास्त लोकप्रिय असलेले कोळीगीत, मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा, असो गायक म्हणून! लता मंगेशकरांच्या सोबत गायलेल्या या कोळीगीताला अफाट लोकप्रियता मिळाली.
हेमंतकुमारांचा आवाज मखमली आवाज म्हणून प्रसिध्द होता. कुणी त्या आवाजाला धीरगंभीर आवाज म्हणायचे. खरं सांगायचं तर त्यांच्या खर्जातल्या आवाजाला एक वेगळाच दर्जा होता. त्यांचे समकालिन महंमद रफी, मुकेश, किशोरकुमार, महेंद्र कपूर, मन्ना डे ह्या गायकांपेक्षा त्यांच्या आवाजाचा पोत काही वेगळा होता, म्हणूनच हेमंतकुमारांचं गाणं ह्या सगळ्या गायकांपेक्षा काहीस वेगळंच वाटत राहिलं
हेमंतकुमारांची गाणी म्हटली की ‘बेकरार कर के हमे युं न जाइये’, ‘न तुम हमे जाने’, ‘इतना तो कह दो हम को तुम से ही प्यार है’, ‘ना मांगु ये सोना चांदी, तेरे द्वार खडा एक जोगी’, ‘है अपना दिल तो आवारा, ना जाने किस पे आयेगा’ अशी गाणी पटकन आठवतात.
‘बेकरार कर के हमे युं न जाइये’ ह्या गाण्यातला सुरूवातीचा ‘बेकरार’ हा शब्दच मुळी हेमंतकुमारांनी फारच निराळ्या पध्दतीने उच्चारला आहे. ‘बेकरार’ हा शब्द उच्चारल्यानंतर त्यांनी जो पॉज घेतला आहे तिथूनच ह्या गाण्याच्या सुंदरतेची सुरूवात होते. ‘बीस साल बाद’ ह्या सिनेमातल्या त्यांनी स्वत:च गायलेल्या ह्या गाण्याला त्यांचंच संगीत लाभलं आहे. या गाण्याचा खुद्द हेमंतकुमारांनी सांगितलेला किस्सा असा आहे की शुभ्र धोतर नेसलेल्या मांडीवर ताल धरत ह्या गाण्याचे शब्द वाचता वाचता ह्या गाण्याची चाल तिसर्या मिनिटाला हेमंतकुमारांना सुचली. समोर हार्मोनियमही नव्हती आणि ह्या गाण्याचा मुखडा सुचल्या सुचल्या त्यांना दोन अंतर्याच्या वेगवेगळ्या चालीही तिथल्या तिथल्या सुचल्या. हे गाणं हेमंतकुमार त्यांच्या मैफलीत मूळ रेकॉर्ड केलेल्या गाण्यापेक्षाही थोडं हटके गायचे हे विशेष.
हृदयनाथ मंगेशकरांकडे संगीत दिग्दर्शनासाठी ‘हा खेळ सावल्यांचा’ हा सिनेमा आला तेव्हा त्यात जेव्हा कोळीगीताचा एक प्रसंग आला तेव्हा हृदयनाथ मंगेशकरांनी ते कोळीगीतही गाण्यासाठी हेमंतकुमार यांनाच पाचारण केलं. ह्या कोळीगीताचे शब्द होते ‘गोमू, संगतीनं माझ्या तू येशील काय!’ फक्त ह्यावेळी त्या कोळीगीतासाठी हेमंतकुमारना साथ द्यायला लता मंगेशकरांऐवजी आशा भोसले होत्या.
हे कोळीगीतही इतकं लोकप्रिय झालं की हेमंतकुमारांच्या आवाजातल्या ह्या कोळीगीता नंतर त्यांना मराठीत आणखी एक कोळीगीत गाण्याची संधी मिळाली. हे गाणं होतं ‘दर्यावरी रं, तरली होरी रं, तुझीमाजी जोरी बरी, साजना, होरीतून जाऊ घरी’. गाण्याचं संगीत होतं प्रदीप-विलास ह्यांचं. ह्यावेळी त्यांची सहगायिका होती श्यामा चित्तार.
त्यावेळी मराठीत एकापेक्षा एक मराठी भाषिक गायक असताना हेमंतकुमारां सारख्या एका बंगाली गायकाने मराठी गाणी गाऊन मराठी भावसंगीतावर आपली छाप सोडली हे निर्विवाद. भारत सरकारच्या टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ ५ रु. चे टपाल तिकीट जारी केले आहे.