# वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; संप मागे.

३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश

मुंबई: वीज कर्मचाऱ्यांना बोनस
जाहीर करण्यात आला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. वीज कर्मचा-यांनी संप मागे घेतला आहे.

लॉकडाउन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात उर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली.

हीच बाब लक्षात घेऊन उर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केली असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

वीज कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या बोनसची रक्कम ही गेल्या वर्षी इतकी असणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस म्हणून मिळाले होते. तसेच ते यावर्षीही मिळणार आहेत.

३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश:
विशेष बाब म्हणजे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे वर्षभरापासून नियुक्तीची वाट पाहणाऱ्या ३६८ जणांची दिवाळीही गोड झाली आहे.

महावितरण कंपनीत गेल्या वर्षी भरती करण्याच्या दृष्टीने कनिष्ठ अभियंता या पदाकरता निवड परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड यादी करून सुमारे 368 पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

मात्र, कोरोनामुळे या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले नव्हते. पण आता या सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती व पदस्थापना देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत.

यासाठी ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता हे आदेशाची अंमलबजावणी करणार आहेत. या आदेशामुळे सर्व नवनियुक्त अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे. गेल्या वर्षी महावितरणने सरळ 327 तर अंतर्गत भरतीद्वारे 41 कनिष्ठ अभियंत्यांची निवड केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *