बीड: शहरातील कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने शहरातील ६ तपासणी केंद्रावर २६०१ व्यावसायिकांची कोविड-१९ निदानासाठी अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ८६ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
बीड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशानुसार बीड शहरातील सर्व व्यावसायिक व कामगार वर्ग यांची अँटिजन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आलेले होते. या तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. यामध्ये
१.बलभिम महाविद्यालय, बीड
२.माँ वैष्णवीदेवी पॅलेस, एम.आय.डी.सी.रोड, बीड
३.जिल्हा परिषद शाळा, अशोक नगर, बीड.
४.राजस्थानी विद्यालय, विप्रनगर, बीड
५.चंपावती प्राथमिक शाळा, बुथ क्र१ नगर रोड, बीड
६.चंपावती प्राथमिक शाळा, बुथ क्र२ नगर रोड, बीड या ठिकाणांचा समावेश होता.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ९४ कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.
बलभीम महाविद्यालयातील केंद्रावर ३४२ चाचण्या झाल्या यात ११ पाॅझिटिव्ह आढळले, वैष्णोदेवी पॅलेसमधील केंद्रात ३९६ चाचण्या झाल्या यात ०९ पाॅझिटिव्ह आढळले, अशॊकनगर जिप शाळेत ३८४ चाचण्या झाल्या यात १६ पाॅझिटिव्ह आढळले, राजस्थानी विद्यालायात ५५१ चाचण्या झाल्या यात २० पाॅझिटिव्ह आढळले. चंपावती प्राथमिक शाळेतील एका केंद्रावर ४५५ चाचण्या झाल्या यात ११ तर दुस-या केंद्रावर ४७३ चाचण्या झाल्या यात १९ पाॅझिटिव्ह आढळले.
लागण झालेल्या ८६ नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले. यांची तपासणी व निदान झाल्यामुळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यात मदत होणार आहे. शहरात ९ व १० आॅगस्ट रोजी विशेष मोहिमेच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी देखील विविध व्यवसाय व संघटनानिहाय दुकानदार आणि कर्मचाऱ्यांची अँटिजन तपासणी करण्यात येणार असून त्याचे नियोजन पूर्ण झालेले आहे.