औरंगाबाद: कोरोनामुळे जिल्ह्यातील हिंदू मंदिरे बंद आहेत. मात्र, सध्या हिंदूंचा पवित्र श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे शासनाने काही नियम व अटीवर जिल्ह्यातील मंदिरे सुरू करावीत, अशी मागणी शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
खैरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना याविषयी निवेदन दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू लाॅकडाऊनमध्ये राज्यात आणि शहरात बऱ्यापैकी शिथिलता आली आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही याची जाणीव ठेवून नागरिकांनी आता सोशल डिस्टन्स्टिंगचे नियम, नियमित मास्कचा वापर करत स्वत:ची काळजी घ्यायची आहे. लोकांना हे समजले असून त्या पद्धतीने लोकांमध्ये बदल देखील दिसून येत आहेत. बाजारपेठा व व्यवहार सुरू झाल्यामुळे आता हिंदूंची धार्मिक स्थळ, मंदिरे देखील खुली केली जावीत. जेणेकरून श्रावणासारख्या पवित्र महिन्यात लोकांना मंदिरात जाऊन व्रत वैकल्य, धार्मिक विधी, पूजा करता येणे शक्य होईल. लाॅकडाऊनमुळे धार्मिक विधी, पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मंदिरे सुरू झाली, तर त्यांना देखील आधार मिळेल. कोरोनाचा धोका टळलेला नाही, याची पूर्ण जाणीव आहे, त्यामुळेच सुरक्षित अंतर, मास्कचा वापर याशिवाय रा्ज्य सरकारकडून ज्या सूचना दिल्या जातील, त्याचे पालन करण्याच्या हमी व अटीवर मंदिरे खुली करण्याची परवानगी द्यावी, असेही चंद्रकांत खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे.