स्वाधार योजनेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

पुणे: कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या शैक्षणिक कालावधीमध्ये स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती संगिता डावखर यांनी केले आहे.

अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर- व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता, निवास भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते.

तथापि, 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये शैक्षणिक संस्था महाविद्यालये प्रत्यक्ष बंद होती. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेतल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी खोली भाड्याने घेऊन ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण घेतले असेल अशा पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी परिपूर्ण अर्ज करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *