मुंबई: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी बुधवारी रात्री दिले. त्यानंतर तिनही आरोपींची रवानगी अलिबाग मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेल मध्ये करण्यात आली आहे. ४० अन्य कैद्यासमवेत तिघांना ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलिबाग मध्यवर्ती कारागृहाने नगर पालिकेच्या शाळा इमारतीत क्वारंटाईन सेल स्थापन केला आहे. या क्वारंटाईन सेलमध्ये कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्णब यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर याच क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जामीन होत नाही तोवर याच क्वारंटाईन सेल मध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. तिघांनाही क्वारंटाईन सेलच्या एक नंबर रुममध्ये ठेवण्यात आले आहे. इतर कैद्यांसमवेत त्यांना कारागृहात शिजवलेले अन्न, पाणी घ्यावे लागणार आहे. या क्वारंटाईन सेल परिसरात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिनही आरोपींनी मुख्य न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या जामिन अर्जांवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.