# कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कॉर्पोरेट जगताचे योगदान -राजेंद्र सरग.

राज्‍यात कोरोनाची पहिली व्‍यक्‍ती पुण्‍यात सापडल्‍यानंतर राज्‍याचेच नव्‍हे तर संपूर्ण देशाचे लक्ष पुण्‍याकडे होते. कोरोनाने इतर देशांत घातलेला धुमाकूळ पाहून चिंता वाटणे स्‍वाभाविक होते. कोरोना संसर्गाचा धोका ओळखून प्रशासकीय यंत्रणा अगोदरपासूनच कामाला लागली होती. उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍यासह आरोग्‍य यंत्रणा, पोलीस यंत्रणा सज्‍ज झाली होती.

कोरोनाचे संकट किती मोठे आणि किती काळ राहील, याची कोणालाही माहिती नव्‍हती. तथापि, ते गंभीर असेल याची खात्री होती, त्‍यामुळे अल्‍प‍कालीन आणि दीर्घकालीन उपाय योजण्‍यात आले. सुनियोजित प्रयत्‍नांमुळे केंद्रीय पथकांनी भीती व्‍यक्‍त केलेल्‍या रुग्‍णसंख्‍येपेक्षा कमी रुग्‍ण संख्‍या राखण्‍यात यश मिळाले. हा रोग लपवण्‍यासारखा नसून त्‍यावर योग्य वेळी, योग्य उपचार घेतले तर तो बरा होवू शकतो, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवता आला. रुग्‍ण आणि रुग्‍णालयांना आवश्‍यक ती वैद्यकीय मदत, साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करणे, आवश्‍यकतेनुसार सध्‍या असलेल्‍या रुग्‍णालयांची क्षमता वाढविणे, प्रयोगशाळांतील नमुना तपासणीचे प्रमाण वाढविणे, कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड रुग्‍णालय उभारणे, खाजगी रुग्‍णालयांशी करार करणे, ग्रामीण भागातील रुग्‍णांना उपचारासाठी मदत करणे अशा उपायांचा अवलंब करण्‍यात आला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी नियोजनबद्ध आखणी केली. कोरोनाशी लढा देतांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले. त्यांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या. नियमित बैठका घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला.
कोरोनाशी लढा देतांना आर्थिक मदत कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्‍यात आली. गरजेनुसार वेळोवेळी निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला. पालकमंत्री अजित पवारांनी एक टीम तयार करून अपेक्षित कामांची यादी केली, त्या कामांचे नियोजन करुन भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी नेमून त्‍यांच्‍याकडे जबाबदारी सोपवली. नियोजनाप्रमाणे किती काम झाले, अडचणी काय आहेत, त्‍यावर उपाय काय याचा दर आठवड्याला नियमित आढावा घेण्‍यात आला. गरजेप्रमाणे निधी उपलब्‍ध करुन दिला. ही कामे करत असतांना नियमांचे कुठेही उल्‍लंघन होणार नाही, गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ कामे होतील, याची दक्षता घेण्‍याच्‍या कडक सूचनाही त्‍यांनी दिल्‍या. या लढ्यात सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सि‍बिलीटी) निधीचीही मदत होऊ शकते, हे लक्षात घेवून उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कॉर्पोरेट जगताला आवाहन केले, तसेच या कामी पाठपुरावा करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये पुणे महापालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त शंतनू गोयल, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला यांचा समावेश आहे. सीएसआर निधीचा उपयोग पुणे महापालिका, पुणे पोलीस आयुक्‍तालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय, ससून सर्वोपचार रुग्णालय यांना आवश्‍यक ती साधनसामुग्री उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी नियोजन करण्‍यात आले. विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला, केपीएमजीचे रोहन सास्‍ते यांच्‍या प्रयत्‍नांमुळे अॅक्सिस बँकेने कोरोना लढ्यासाठी आवश्‍यक 5 कोटी रुपयांची साधनसामुग्री उपलब्‍ध करुन दिली. तसेच आयडीबीआय बँकेनेही 40 लाख रुपयांचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे सुपूर्द केला. यावेळी अॅक्सिस बँकेचे अध्‍यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्‍यवस्‍थापक संजय पणीकर, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. अॅक्सिस बँकेच्‍यावतीने पीपीइ कीट 4800, एन 95 मास्‍क (धुवून वापरता येणारे) 10 हजार, सॅनिटायझर (80 टक्‍के इथेनॉल असलेले) 30 हजार, इन्‍ट्युबेशन बॉक्‍स 450, सोडीयम हायपोक्‍लोराइड सोल्‍यूशन 21 हजार किलोग्रॅम, बॅटरीवर चालणारे स्‍प्रे पंप 1126, एक वर्ष वॉरंटी असलेल्‍या थर्मल गन 285, ऑक्झिमीटर 521, निगेटिव्‍ह आयन जनरेटर 141, मोबाईल क्लिनीक 23 (एका महिन्‍यासाठी) उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. याशिवाय कोरोना उपचार विषयक कार्यवाहीचा प्रतिसाद जाणून घेण्‍यासाठी अॅप सुविधेचीही मदत देण्‍यात आलेली आहे. उपलब्‍ध साधनसामुग्रीतील काही मदत नागपूर, मुंबई, नवी मुंबईसाठीही वापरण्‍यात आली आहे.

कोरोना लढ्यात ससून रूग्णालय, पुण्यातील प्रशासन आणि लष्कराच्या सदर्न कमांडमध्येही माहिती-तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाची कार्यवाही सुरू झाली. त्‍यानुसार लष्कराकडे उपलब्ध असलेले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच मॉड्युलर आयसीयूचे तंत्रज्ञान, उपकरणे कशी ठेवायची, कशी वापरायची याबाबतची माहिती आता प्रशासनाला मिळणार आहे. या बदल्यात राज्याकडे असलेल्‍या कोरोना नमुना तपासणीच्‍या सुविधेचा लाभ लष्कराला मिळणार आहे. एकाच वेळी 96 तपासण्‍या आणि साडेतीन तासांतच अहवाल देण्याची क्षमता पुणे प्रशासनाकडे आहे. याचा फायदा सदर्न कमांडला होणार आहे.

पालकमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली ससून रूग्णालयात कोरोना (कोविड-19) परीक्षणासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी केली जात आहे. या प्रयोगशाळेत रोबोटीकचाही वापर करण्यात येत आहे. याशिवाय सीबी नॅट यंत्राचा वापरही सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे येत्या काळात पुण्यात जास्तीत जास्त तपासण्‍या होऊन कोरोनाचे अत्यंत जलद निदान करता येऊ शकेल.

सीएसआरच्‍या माध्‍यमातून अॅक्सिस बँकेने नॉन कोविड रूग्णांसाठी मोबाईल क्लिनिक व्हॅन, कोविड लक्षणांच्या तपासणीसाठी अद्ययावत मोबाईल व्हॅन, आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून डिजीटल एक्सरेचे विश्लेषण, वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरती शौचालये, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी टेलिमेडीसीन सुविधा पुरवण्यासाठी अद्ययावत अॅपची निर्मिती, कोविड-19 कटेन्मेंट अॅपच्या माध्यमातून कोरोना योद्धे स्टाफ, स्वयंसेवी संस्था, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्‍या उपक्रमांचे संनियंत्रण आणि ट्रॅकींग करणे, कोरोना संसर्गाचा धोका असलेल्या रूग्णालयांमध्ये निगेटिव्ह आयन निर्मिती करणारी संयंत्र देणे, एनट्युबेशन बॉक्स,पीपीई कीट-एन-95, सॅनिटायझर तसेच इतर आवश्यक साधनांचा पुरवठा करणे यासाठी मदत केली.

आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केलेले डिजीटल एक्सरे सॉफ्टवेअर हे पूर्णपणे भारतात तयार करण्‍यात आले आहे. तरुण अभियंत्यांची टीम यासाठी धडपड करीत होती. त्यांना या कामी कौस्‍तुभ बुटाला यांनी मार्गदर्शन केले. या सॉफ्टवेअरचे कौतुक अनेक ज्‍येष्‍ठ रेडिओलॉजिस्‍टसह आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, ससूनच्‍या रेडिओलॉजिस्‍ट विभागाच्‍या प्रमुख डॉ. शेफाली पवार आणि त्‍यांचे सहकारी, पुणे मनपाचे डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. वावरे, पिंपरी-चिंचवडचे डॉ. वाबळे यांनी केले आहे.

कोरोनाच्‍या (कोविड-19) साथीमुळे इतर आजारांनी ग्रस्त रूग्णांना उपचार मिळणे कठीण झाले होते. मात्र, सर्व सुविधांनी युक्त फिरत्या दवाखान्यांमुळे लोकांना त्यांच्या-त्यांच्या विभागात वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीसांनीही लोकांच्‍या आरोग्याच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावले. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना असलेला कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन खास पोलीसांसाठीही मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. या व्हॅनमध्ये प्राथमिक लक्षणांवरून निदान करता यावे म्हणून डिजीटल एक्स-रे ची सोय ही करण्यात आली आहे.

रूग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य सेवकांना संसर्गाचा धोका लक्षात घेता रूग्णालयांमध्ये इनट्युबेशन बॉक्स देण्यात आले आहेत. या बॉक्समुळे रूग्णाशी थेट संपर्क टाळला जातो तसेच त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचारही करता येतात. रूग्णालयांमधल्या संसर्गाचे प्रमाण वाढण्‍याची भीती असते. डॉक्टर तसेच आरोग्य सेवक सतत संसर्गाच्या छायेखाली असतात, यावर उपाय म्‍हणून आता रूग्णालयांमध्ये निगेटिव्ह आयन तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रेही रूग्णालयांना पुरवण्यात आलेली आहेत.

संसर्गाच्या भीतीमुळे डॉक्टर्सनी आपली क्लिनिक बंद ठेवली. अशा परिस्थितीत रूग्णांना आधार देण्यासाठी सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एक टेलिमेडीसीन अॅप ही सुरु करण्‍यात आले. यासाठी आयडीबीआय बँकेची मदत झाली. स्मार्ट सारथी अॅपच्या जोडीने हे अॅप वापरता येणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या अॅपच्या माध्यमातून वैद्यकीय साह्य मिळवता येते. या अॅपचा फायदा सामान्य लोकांबरोबरच कोरोनामुळे घरीच विलगीकरण करण्यात आलेल्या रूग्णांना मिळणार आहे.

कोरोना लढ्यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सेवा-सुविधांसाठी कार्यरत मनुष्यबळाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी टेक्नो-पर्पल अॅपचे साह्य घेण्यात आले आहे. या अॅपमुळे सामान्य नागरिक आणि प्रशासन या दोघांनाही खूप मदत होणार आहे. पीसीएमसी सारथी आणि पीएमसी केअर या दोन्ही अॅपमध्ये या अॅपचे इंटीग्रेशन झाल्यामुळे विविध सुविधांसाठी ‘एक खिडकी’ मांडणी तयार होणार आहे. या अॅपवरील डॅशबोर्डमुळे कटेन्मेंट भागामध्ये वेळेवर सुविधा पोहोचत आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. जीपीएसचा वापर करण्यात आलेल्या या अॅपमुळे केलेल्या कामाची खात्री आणि पडताळणी करता येते. बाधित क्षेत्रामध्ये सार्वजनिक शौचालयांची कमतरता जाणवू नये म्हणून अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून फिरती शौचालयेही देण्यात आली आहेत. सीएसआरच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन प्रेरणादायी काम केलेआहे. कोरोना लढा देतांना लोकांना उत्तम आरोग्य सुविधा द्यायच्या, कोरोनाचा प्रसार रोखायचा त्याचवेळी जे या विषाणूशी प्रत्यक्ष लढतायत त्या कोरोना योद्ध्‍यांचे मनोधैर्य सतत वाढवत ठेवायचे, ही एक मोठी तारेवरची कसरत शासन-प्रशासन पार पाडत आहे. कॉर्पोरेट जगताला स्‍वयंस्‍फूर्तीने या लढ्यासाठी सीएसआर निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचेही आवाहन करण्‍यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, स्‍वयंसेवी संस्‍था, कॉर्पोरेट जगताने सुरु केलेल्या कोरोना लढ्यामध्‍ये लोकांनी स्‍वयंशिस्‍त आणि खबरदारी पाळून साथ दिली तर कोरोनावर मात करण्‍यात नक्‍कीच यश येवू शकते.-राजेंद्र सरग
लेखक पुणे येथे जिल्‍हा माहिती अधिकारी आहेत.
मोबाईल: 9423245466

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *