सद्यस्थितीत आपत्कालीन घटनांना सामोरे जातांना आपल्याला अनेक बदलांचा सामना करावा लागेल. नवे बदल स्वीकारावे लागतील. विशेष करून शिक्षण क्षेत्रात या आपत्कालीन परिस्थितीशी लढताना, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तत्कालीन स्वरूपाचे, अन् दीर्घकालीन स्वरूपाचे कोणते निर्णय घेता येतील. तसेच सद्यस्थितीत नव्याने अंगिकारावे लागणारे शैक्षणिक बदल याविषयी सांगताहेत माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे…
आधी तात्कालिक उपाययोजनांचा विचार करू. हा विचार दोन स्तरावर करावा लागेल. एक, शालेय शिक्षण अन् दुसरे महाविद्यालयीन म्हणजे विद्यापीठ स्तरावर चे उच्च शिक्षण. यापैकी गेल्या शैक्षणिक सत्रातील राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन करणे अन् नवे शैक्षणिक सत्र सुरू करणे या महत्वाच्या बाबी असतील. यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यात सुरवातीला अडचणी येतील, व्यावहारिक समस्या असतील, पण त्या हळूहळू अनुभवाने दूर करता येतील. प्रत्येक समस्येचे उत्तर असतेच. आपल्याला सोयीचे उत्तर शोधावे लागते. पारंपरिक पद्धतीने वर्गातून मिळणाऱ्या शिक्षणाची सवय झालेल्या विद्यार्थ्यांना हे शिकणे, अन शिक्षकांना हे आधुनिक पद्धतीने शिकवणे सुरवातीला अडचणीचे वाटेल. पण सवय झाली की रुचेल हे निश्चित. विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा वेगळा विचार करावा लागेल. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकविताना सुरवातीला अडचणी येतील. इंटरनेटची उपलब्धता, स्मार्ट फोनची गरज, असे अनेक प्रश्न असतील. पण त्यावर उपाय निश्चित शोधता येतील. त्यासाठी वेळ द्यावा लागेल, पेशन्स ठेवावा लागेल. गेले काही दिवस मी शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांच्या संपर्कात आहे. ते सुद्धा या बदलला सामोरे जायला सर्व दृष्टीने सिद्ध नाहीत. प्रशिक्षित नाहीत. मग ग्रामीण भागातील आर्टस्, सायन्सच्या प्राध्यापकांची गोष्टच वेगळी.
या परिस्थितीत स्वयं अध्ययनावर भर देणे उत्तम. झालेल्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत राहिलेला अभ्यासक्रम थोडाच असणार. त्यामुळे या राहिलेल्या भागाचा विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करणे हाही पर्याय आहे. त्यासाठी पालकांची मदत घेता येईल. मोबाईलवर शिक्षकांना शंका विचारता येतील. इतर हुशार विद्यार्थ्यांची मदत घेता येईल. या अभ्यासक्रमावर आधारित गृहपाठ ऑनलाइन सबमिट करता येईल. म्हणजे आपण काय शिकलो, त्याचा उद्देश काय, उपयोग काय यावर आधारित टिपण लिहावे विदयार्थ्यांनी. त्यातून विद्यार्थ्यांचे आकलन, स्पष्टीकरण, एक्स्प्रेशन, तपासता येईल.
आता परीक्षेचा प्रश्न. गुण, ग्रेड देण्याचा प्रश्न. आपली सध्याची परीक्षा पद्धतच चुकीची आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना चे उचित योग्य मूल्यमापन होतेच असा दावा करता येणार नाही. या परीक्षा विभागासाठी लाखो रुपये, अनेक मनुष्य तास खर्च होतात. पण एवढे सगळे खर्ची घालून दिलेले गुण, ग्रेडस विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचे, आकलन शक्तीचे प्रतीक असतात का? मुळीच नाही. आपले प्रश्नपत्र, आपली मूल्यांकन पद्धत, प्राध्यापकांचा तपासण्याचा कॅज्युअल अप्रोच, मास कॉपी, विद्यार्थ्यांची मनोवृत्ती, हे सारे याला कारणीभूत आहे. त्यामुळे यावर्षी पुरते, वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करावे. त्यासाठी, तोंडी परीक्षा, ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन सेमिनार असे अनेक पर्याय आहेत. पारंपरिक तीन तासांची वार्षिक, अंतिम परीक्षा म्हणजेच सबकुछ, असे नाही. सद्यस्थितीत आपल्याला लवचिक व्हावे लागेल. ही जागतिक समस्या असल्याने, याचा दूरगामी वाईट परिणाम होईल, पुढे अडचण येईल वगैरे भीती अनाठायी आहे.
आयआयटी, एनआयटी सारख्या संस्था, विद्यापीठाचे कॅम्पस कॉलेज, स्वायत्त असल्याने अडचणी येणार नाहीत. तिथे शिकवणारे शिक्षकच मूल्यमापन करीत असल्याने फारशी समस्या येणार नाही. पण विद्यापीठाशी संलग्नित शेकडो महाविद्यालये, त्यातील लाखो विद्यार्थी, यांचा खरा प्रश्न आहे. आपल्या सिस्टीममध्ये अशा कॉलेजेसची विश्वासहर्ता शून्य असल्याने मूल्यमापन केंद्रीभूत असते. विद्यापीठ, बोर्डस्तरावर होते. जोपर्यंत शिक्षणाचे, मूल्यमापनाचे विकेंद्रीकरण होत नाही, विश्वासाहर्ता वाढत नाही, तोपर्यंत ही समस्या तशीच राहणार. या संलग्न महाविद्यालयाचा, खाजगी शाळांचा प्रश्न खरेच गंभीर आहे. त्यासाठी तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी उत्तर शोधावे लागेल.
गाडी रुळावर आणण्यासाठी खालील उपाययोजना करता येतील:
2019-20 चे राहिलेले सत्र ऑनलाईन शिकवणी, स्वयं अध्ययन, गृहपाठ या पद्धतीने पूर्ण करावे. शेवटच्या वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने, मोजक्या अभ्यासक्रमावर घ्याव्यात. आधी झालेल्या परीक्षा, त्यात मिळालेले गुण, ऑनलाईन गृहपाठ या आधारे सरासरी गुण, ग्रेडस देऊन प्रमोशन द्यावे.
2020-21 साठी वेगळे कॉम्पॅक्ट कॅलेंडर तयार करावे. प्रत्येक वेळी सारे काही वर्गातच शिकवले पाहिजे हा अट्टहास सोडावा लागेल. मुलांना जास्तीत जास्त गृहपाठ द्यावेत. स्वतः वाचायला, अभ्यास करायला, स्वतंत्रपणे शिकायला प्रवृत्त करावे. एकत्रित छोट्या ग्रुपद्वारे, टीमवर्कने स्वयं अध्ययनासाठी तयार करावे. जे वाचले, अभ्यासले, त्यावर चिंतन मनन करून टिपणे काढायला शिकवावे, बाध्य करावे. त्यावर मूल्यमापन करावे.
विज्ञान, तंत्रज्ञान, फार्मसी अशा अनेक अभ्यासक्रमात प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके महत्वाची असतात. त्यासाठी 9ते 4 ,10ते 5 अशी ठराविक वेळेची सवय बदलावी लागेल. प्रयोगशाळा जास्त वेळ उघड्या ठेवाव्या लागतील. आयआयटी किंवा परदेशात त्या 24 तास उघड्या असतात. त्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी आळी पाळीने येतील. आपल्याला कार्यालयीन वेळेची संकल्पनाच बदलावी लागेल. काही वर्ग संध्याकाळी घ्यावे लागतील. Virtual प्रयोगशाळा, artificial इंटेलिजन्सचे तंत्र, सिमूलेशनचे आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल. विद्यार्थ्यांचे continuas मूल्यमापन करणे, त्यांना सेमिनार द्यायला लावणे, प्रोजेक्ट करायला देणे, तोंडी परीक्षा घेणे, अशा वेगवेगळ्या पद्धती वापरून नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे बदल घडवावे लागतील. यात पारदर्शीपणाची गरज लागेल. ते एकछत्री न ठेवता सामूहिक पद्धतीने करता येईल. त्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासन या सर्व घटकात परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. नव्हे ती प्राथमिक अट आहे.
सद्यस्थितीचे आगळेवेगळे गंभीर स्वरूप ध्यानात घेता त्यावरील उपाययोजना देखील नाविन्यपूर्ण, अभूतपूर्व अशाच असतील. एकूण न भूतो न भविष्यती अशा समस्येला सामोरे जाताना, त्याच तोडीच्या बदलांना आपणा सर्वांना तयार व्हावे लागेल. हे सुरवातीला कठीण वाटेल, पण अशक्य नाही हेही तितकेच खरे.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
ईमेल: vijaympande@yahoo.com
मोबाईल: 7659084555