बंजारा समाजाचे जगद्गुरू संत रामरावजी बापू यांच्या निधनाची बातमी कळताच बंजारा व समाजेतर भक्तजगतात शोककळा पसरली. बापूच्या जाण्याने आमचे सर्वकाही हरवल्याची वेदना अंतर्मनात उमटली. संत रामरावजी बापू जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराजांचे वंशज आहेत. त्यांनी अखंड बालब्रह्मचारीपणा पाळला. जन्मभर अन्नग्रहण केले नाही. केवळ दुधावर आपले जीवन व्यतीत करणारा, आचार, विचार आणि सदाचार यामध्ये कधीही फारकत न करणारा संत हा निराळाच आहे. त्यांच्या जाण्याने समाजामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून निघेल का? हा मोठा प्रश्न त्यांच्या जाण्याने निर्माण झाला आहे..
रामराव महाराजांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी झाला, त्यांचे निर्वाण वयाच्या 88 व्या वर्षी लिलावती रुग्णाने मुंबई येथे झाले. माता पुतळाबाई व पिता परशुराम यांच्या पोटी जन्मलेले रत्न यांचा जन्म गुरु पौर्णिमेला झाला व निर्वाण कोजागिरी पौर्णिमेला झाले. हा एक निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. संत सेवालाल महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार त्यांनी वाडी, वस्ती व तांड्यावर केला. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या वाळवंटात त्यांनी अध्यात्माची हिरवळ फुलवली. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता, स्वच्छता इत्यादी बाबतीत त्यांनी प्रबोधन केले. हप्पा, बंधू पुरा यांच्या वंशजांना सोबत घेऊन चालले. संत रामरावजी बापू ही एक प्रकारची अजब रुहाणी अध्यात्मिक व्यक्तिरेखा होत. त्यांनी मोठ्या कुटुंबातील सर्वच महाराजांना एकसूत्रतेमध्ये बांधून ठेवण्याचे महान कार्य केले. व्यक्ती कोणताही असो, विचार कोणताही असो, नेता कोणताही असो, पक्ष कोणताही असो, त्याला ज्ञानाचे अमृत पाजले. विज्ञानवादी विचारांची शिदोरी व अध्यात्म सोबत देण्यापासून ते कधीही ढळले नाहीत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या प्रत्येक पंतप्रधान आणि व प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बापूच्या विचारांचा व आचाराचा सन्मान केला. काही सन्माननीय अपवाद वगळता कोणत्याही राजकारण्यांनी बापूने सांगितलेल्या योजनेवर खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली नाही. याबाबत देखील त्यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली आहे. दरवर्षी लाखो भाविकांनी पोहरादेवी याठिकाणी रामराव बापूच्या आश्रयाने माथा टेकण्यासाठी हजेरी लावली. संत सेवालाल महाराजांची गादी अव्याहतपणे दीपस्तंभासारखी चालवणारा हा आकाशातील तारा निखळला आहे.
रामराव महाराज वाडी तांडा वस्त्यावर जात असत. त्या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असत व त्यातून रामराव बापूजी चे दर्शन मिळणे हे दुर्लभ होते. रामरावजी बापू यांच्या जाण्या नंतर ती परिस्थिती कोसोदूर दिसून येत नाही. कोणताही समाज असो त्या समाजासाठी एक आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनाची चळवळ चालवणारा व्यक्ती व वलयरेखा असावी लागते. तीआज धूसर झालेली आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत संत परंपरेला साजेल असे काही तत्व आपल्या स्वतःला लावून घेतलेले होते. सत्य बोलणे, अखंड ब्रह्मचर्य स्वीकारणे. समाजामध्ये संत सेवालाल महाराजांचा विचार रुजविला. ज्या ठिकाणी अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता इत्यादी विषयाने घर केले आहे त्या तांडे वाड्या-वस्त्यांवर त्या समाजातील घटकाला आपल्या पद्धतीने समजवून सांगून सुधारण्याची संधी देणे.
“कोणाला भजू नका
कोणाला पुजू नका,
प्रथम जाना, त्याची छाननी करा,
सत्याचा स्वीकार करा
असत्य व दुर्गुणांचा त्याग करा..
अशा विचारसरणी चा अवलंब करण्याचा आग्रह त्यांनी आजतागायत केला. आचार व विचारात त्यांनी कधीच फारकत केली नाही. त्यामुळे समाजाच्या अंतर्मनात त्यांचे स्थान हे अटळ राहिले.
देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री व पंतप्रधानांनी रामराव महाराजांच्या चरण कमलावर माथा टेकला. परंतु त्यांनी सांगितलेल्या विकास योजनांवर मात्र त्यांनी कधीच अंमल केला नाही. त्याबाबत त्यांनी नेहमीच खंत व्यक्त केली. व एक काळ असा आला की कुठल्याच विकास योजना समाजाच्या मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत मी पोहरादेवी व त्या ठिकाणी जाणार नाही. अशा पद्धतीची भीष्मप्रतिज्ञा करणारे संत आज त्यांच्या विचाराचा अमल होण्या अगोदरच आम्हाला सोडून गेले आहेत.
पोहरादेवी या बंजारा समाजाच्या काशी स्थानी बहुतेक सुविधा मंदिरे व भक्तीधाम उभे राहण्याबाबत भगवान सेवक उद्योगपती किशनराव राठोड यांना त्यांनी सांगितले व त्यावर बामळालाल महाराज मठ, भक्तीधाम, सामकी माता मंदिर नंगारा भवन इत्यादी तीर्थक्षेत्रे उभी राहिलेली आहेत. मा.ना. संजय भाऊ राठोड यांनादेखील त्यांनी काही विकास योजना सांगून नंगारा भवन संत सेवालाल सागर वास्तू निर्माण करण्यासाठी प्रेरित केले. हे वास्तू निर्माण कार्य अंतिम स्थितीत असतानाच त्यांनी इहलोकाचा रस्ता धरला.
रामराव महाराज यांनी समाजापुढे लांबलचक भाषण कधीच केले नाही. ते वस्तुनिष्ठपणे संत सेवालाल महाराजांचा विचार सांगत असत. बंजारा समाज हा प्राचीन काळापासून धनी, दानी बलिदानी अशा पद्धतीचा गौरवशाली सांस्कृतिक विरासत असलेला सर्वसमावेशक समाज आहे. आम्ही सगळी प्रकृतीची लेकरे आहोत. जात, धर्म, पंथ ही व्यक्तीने उभी केलेली कृत्रिम कवचकुंडले आहेत. ज्यावेळेस आमच्या मनात अंतर्मनात मानवतावादी विचार व ज्ञानाची ज्योत ही पेटते, त्यावेळेस आम्ही अशी कृत्रीम कवचकुंडले झुगारून दिली पाहिजेत. ज्या बाबी मानवतेचा विकासाच्या आड येतील, त्या सर्व जीर्ण बाबी आम्ही फेकून दिल्या पाहिजेत. बंजारा समाजाची प्राचीन संस्कृती, वेशभूषा, केशभूषा सांस्कृतिक वारसा हा जोपासला पाहिजे, परंतु त्यामध्ये सुधारणा देखील होणे आवश्यक असल्याचे त्यांनी वारंवार प्रतिपादित केले. संत श्री ईश्वर सिंग महाराज यांच्याशी त्यांचे वैचारिक मतभेद जरी असले तरीही दोघांमध्ये मनभेद अजिबात नव्हते. संत श्री ईश्वर सिंग महाराजांच्या वंशज संत श्री शिवचरण महाराज यांच्यासोबत अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी हिरीरिने भाग घेतला. समाज सुधारणेची चळवळ आता तुम्हाला पुढे नेणे आहे, अशा पद्धतीचा संदेश देखील दिला. देशातील अशी वाडी वस्ती व तांडा नाही, ज्या ठिकाणी रामराव महाराज यांनी वारंवार हजेरी लावून प्रबोधन केले नाही.
बंजारा समाज हा प्राचीन काळापासून अन्नधान्य व इतर वस्तूंचा व्यापार या माध्यमात आहे. मोठ्या राजा महाराजांना व देश-विदेशातील गोरगरिबांना, गुरांना दुष्काळामध्ये रसद पुरवून त्याचं पालनपोषण करणारा समाज आहे. बंजारा समाजातील बल्लूराय बिंजरावत, माईदास संत मलुकी बंजारन, अनाथपिंडक तपासू ,भल्लिक, गोविंद गुरु, संतश्री मनिसिंह असे अनेक धनी, दाणी, बलीदानी व यौद्दे रत्नाची वंशावळीचा इतिहास आहे. बंजारा समाज हा निसर्गपूजक, प्रकृती पूजक समाज आहे. देश-विदेशात बापूचे करोडो भक्त आहेत. दरवर्षी श्रीक्षेत्र बंजारा समाजाची काशी पोहरादेवी या ठिकाणी भाविक, भक्त मोठ्या श्रध्देने रामराव महाराज यांच्या आश्रयाने येत असत. रामनवमीला भरविण्यात येणाऱ्या यात्रेमध्ये त्यांच्या चरणी माथा टेकत असत. अशा भावी भक्तापुढे मोजक्या शब्दात त्यांनी केलेले प्रबोधन अत्यंत मूलगामी विचारांचा सारं आहे. संत श्री रामराव बापूचे निधन झाल्यानंतर बंजारा समाजातील ही संत परंपरेची मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ती पोकळी भविष्यात भरून काढण्याची जिम्मेदारी ही हप्पा, बंधू , पूरा, बामळालाल महाराज यांच्या वंशजांनवर येऊन ठेपली आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी आज हयात असलेले बाबुलाल महाराज, सुनील महाराज, कबीर महाराज रमेश महाराज, आदींवर येऊन ठेपली आहे. ती गादी ते सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वातून कसे सांभाळतात यावर बंजारा समाजाच्या आध्यात्मिक आणि मानवतावादी विचाराचा विकासाचा मूलाधार हा अवलंबून आहे.
बंजारा समाजाच्या पोहरादेवी यात्रा क्षेत्राचा हा तारा निखळला व बंजारा समाजामध्ये एक अंधकाराचे ढग पसरले आहे. यातून आम्ही कसा मार्ग काढतो, हाच यक्षप्रश्न आज सर्वसामान्य भाविक भक्तांवर येऊन पडला आहे. भविष्यातील ही अंधारमय काळोखाची पोकळी भरून काढणारी व्यक्तिरेखा म्हणून कोण पुढे येते? यावर बंजारा समाजाच्या विकासाचे प्रश्न अवलंबून आहेत. रामरावजी महाराजांनी शासनापुढे व समाजातील चळवळीपुढे काही महत्त्वाचे प्रश्न प्रश्न नेहमीच ठेवले आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही धडपड केली पाहिजे.
१)मूळ गुन्हेगार जमात कायद्यातील. जमातींना अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासंदर्भात विधिमंडळात समिती गठीत करून शिफारस करणेबाबत.
२)बार्टी, सारथी व महा ज्योती च्या धर्तीवरमूळ विमुक्त जाती भटक्या जमातीतील ‘अ’व ‘ब ‘ प्रवर्गासाठी वसंतराव नाईक मानवी विकास संस्था (वनार्टी), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या मध्यवर्ती ठिकाणी अंदाजपत्रकीय तरतुदीसह स्थापन करून त्याचे केंद्र महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये उघडणे.
३)राष्ट्रीय जनगणने सोबत विमुक्त जाती भटक्या जमातीतील जनगणना महाराष्ट्र शासनाने करून लोकसंख्येच्या प्रमाणात योजनासाठी अंदाजपत्रकीय तरतूद करणे.
४)बंजारा आदिम भाषेला राजभाषा, संघभाषा व शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यासाठी विधिमंडळात समिती गठीत करून केंद्र सरकारला शिफारस केली पाहिजे.
५)श्रीक्षेत्र पोहरादेवी ला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास केला पाहिजे.
रामराव महाराजांच्या महानिर्वाणाने निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार? याची चिंता सामान्य गोरगरीब भक्तमंडळीच्या अंतर्मनात घर करून आहे ! म्हणूनच दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.. असे पोकळी भरून काढणारे नेतृत्व ही प्रकृती निर्माण करेल असा आशावाद बाळगतो. शा महान संताला त्यांनी निर्माण केलेल्या अध्यात्माच्या जगताला आमचे विनम्र अभिवादन…
-डॉ.अशोक पवार
-डॉ.सुनीता पवार राठोड
माजी संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र डॉ.बाआंम विद्यापीठ, औरंगाबाद. तथा अध्यक्ष, अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन नागपूर.
मोबाईल: 9421758357
ईमेल: pawarashok40@gmail.com