विशेष: एकाच अनुसूचीत असूनही बौध्द, मातंग, चर्मकार यांच्या नात्यात भेदभाव का?

किमान महाराष्ट्रात बौद्ध, मातंग आणि चर्मकार या तीन जाती सामाजिक आणि राजकीय दृष्टीने एकत्र आल्या तर फार मोठी क्रांती होऊ शकते परंतु प्रत्येक जात – पोटजातीत अडकलेल्या या जाती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व्यापक दृष्टिकोण समजून घेत नाहित. बाबासाहेबांनी अनुसूची का बनविली? या अनुसूचितील सर्व जातींनी तरी किमान एक राहिले तर प्रस्थापित हादरुन जातील, आपण एक राहत नाही, एकत्र येत नाही, याचा गैरफायदा प्रस्थापित पक्ष संघटना घेत असतात. खरे तर बौद्ध, मातंग आणि चर्मकार या तिन्ही जाती जनावरांच्या चर्माशी संबंधित आहेत. निसर्गतः या जाती एकच आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. 

अनुसूचित जातींमध्ये महाराष्ट्रात ५९ जाती आहेत पण त्यात तीन प्रमुख जाती आहेत बौद्ध, मातंग आणि चर्मकार ! या तीन प्रमुख जाती एका अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत परंतु वागताना ते एका अनुसूचित आहेत असे वाटत नाही. पूर्वाश्रमीचे महार हे बौद्ध झाले. ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारला, त्यांचेसोबत त्यावेळी लाखो महारांनी हिंदू धर्माला सोडचिठ्ठी देऊन बौद्ध धम्म स्वीकारला. त्यात अपवादाने कांही मातंग आणि चर्मकार नेते होते परंतु त्यात त्यांचा जनसमूह नव्हता.

हेच धर्मांतर उत्तर प्रदेशात आग्रा, कानपूर, लखनौ किंवा भारताची राजधानी दिल्ली येथे झाले असते तर उत्तर भारतातील लाखो चर्मकार त्यात सहभागी झाले असते, कारण उत्तर भारतातील चर्मकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपलेच जातबंधू समजतात. १४ ऑक्टोबर १९५६ नंतर दुसरे, तिसरे, चौथे धर्मांतर सोहळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कदाचित उत्तर भारतात आयोजित केलेही असते परंतु अवघ्या दोन महिन्यांत त्यांचे अकाली महापरिनिर्वाण झाले, यामुळे चर्मकार समाज धर्मांतरापासून अलिप्त राहिला. नसता देशात चित्र फार वेगळे निर्माण झाले असते. मान्यवर साहेब कांशीराम जी यांनी १४ ऑक्टोबर २००६ रोजी आपल्या करोडो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारण्याची घोषणा केली होती परंतु अवघ्या सहा दिवस अगोदर म्हणजे ९ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांच्यावर काळाने झडप घातली, त्यामुळे चर्मकार पुन्हा एकदा धर्मांतरापासून अलिप्त राहिले, ही फार मोठी शोकांतिका समजावी लागेल ! बहन मायावती यांनीही धर्मांतर करण्याची घोषणा केली आहे परंतु त्यासाठी अगोदर सत्तांतर ही अट त्यांनी घातली आहे. 

सम्राट अशोकाप्रमाणे सत्तेच्या माध्यमातून भारत बौद्धमय करण्याची त्यांची योजना आहे परंतु दिल्लीतील सत्ता बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतीजी यांना मिळू नये यासाठी प्रचंड अडथळे स्वकीय आणि परकीय यांच्याकडून निर्माण केले जात आहेत, त्यात वामन मेश्राम, चंद्रशेखर आझाद, जिग्नेश मेवानी, खा. सावित्रीबाई हे आघाडीवर आहेत ! अगदी प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांनाही मायावती यांची सत्ता नको आहे, यासाठी ते उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसतात, समाजवादी पार्टीचा प्रचार करतात, अर्थात तिकडे त्यांचे कांहीही चालत नाही, तरीही त्यांची लुडबूड सतत चालूच असते. कांशीराम जी यांनाही त्यांनी विरोध केला होता. तत्कालिन अलाहाबाद लोकसभा निवडणुकीत व्ही. पी. सिंह यांच्या विरोधात कांशीराम जी उभे होते, त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्ही. पी. सिंह यांचा प्रचार केला होता. ही गोष्ट उत्तर भारतातील चर्मकार विसरु शकत नाहीत.

मला न तुला घाल कुत्र्याला ही प्रवृत्ती घातक ठरत आहे, त्यामुळे देखील चर्मकार धर्मांतरापासून वंचित राहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी देशात विविध धर्म व जातींचे प्रबोधन करुन आजवर एकही धर्मांतर सोहळा घडवून आणला नाही. उत्तर भारतातील चर्मकार समाजात ते मिसळत नाहित, कांशीराम – मायावती यांचा प्रत्यक्षात विरोध करतात, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीपासून चर्मकार समाज कोसो दूर आहे. महाराष्ट्रात देखील प्रकाश आंबेडकर यांनी चर्मकार समाजाचा दुस्वास केला. अकोला ही त्यांची सुरक्षित जागा असताना त्यांनी सोलापूर येथील लोकसभा निवडणूक लढवून काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव केला. ‘हम तो डूबे है सनम, तुम को भी लेकर डूबेंगे’ ही प्रवृत्ती घातक सिध्द होत आहे. यामुळे चर्मकार समाज आंबेडकरी चळवळीपासून दुरावला जात आहे, याचा फायदा भाजप – शिवसेना – मनसे हे हिंदुत्ववादी पक्ष घेत आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण करीत बहुसंख्य महार हे बौद्ध झाले. धर्म बदलल्याने जाती संपुष्टात आल्या असल्या तरी अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यासाठी जाती शाबूत ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या जात प्रमाणपत्रावर महार हा शब्द आजही कायम आहे. आता बौद्ध, नवबौद्ध या नावानेही जातीची प्रमाणपत्रे मिळत आहेत. त्यामुळे बौद्ध ही जात झाली आहे. त्यामुळे भारत बौद्धमय करण्याचे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न बौद्ध या जातीने विसरले की काय असे वाटत आहे, कारण त्यादृष्टीने व्यापक पावले उचलताना ते दिसत नाहीत. गावोगावी बौद्ध धम्म परिषदा होतात ते प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पैश्यावर आणि त्यांनाच तिथे मान – सन्मान दिला जातो. आपल्यापेक्षा मोठ्या जातीच्या लोकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे, त्यांचा मान सन्मान करायचा ही गांधीवादी आणि मनुवादी प्रवृत्ती आहे. आपल्या सोबतचे मातंग, चर्मकार यांना मात्र या बौद्ध धम्म परिषदेची निमंत्रणे दिली जात नाहित किंवा सहभागी करुन घेतले जात नाही. त्यामुळे दुरावा आणखीन जास्त वाढत जात असतो. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पत्रकावर अण्णाभाऊ साठे आणि गुरु रविदास यांचे फोटो नसतात, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रम पत्रिकेत बाबासाहेब आणि रविदास नसतात, गुरु रविदास जयंती कार्यक्रम पत्रिकेत बाबासाहेब आणि अण्णाभाऊ नसतात. त्यामुळे सामाजिक अभिसरण होताना दिसून येत नाही. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देखील एकमेकांना निमंत्रित केले जात नाही. उच्चवर्णीय व्यक्ती मात्र मोठ्या मान सन्मानाने निमंत्रित केल्या जातात. 

चर्मकार बौद्धांना आपले मोठे भाऊ समजतात, पण हा मोठा भाऊ आपल्या कर्तव्यात कुठेतरी कसूर करतांना दिसून येतो. तो लहान भावाला जवळ धरायलाच तयार नाही. चर्मकार ऐतखाऊ आहेत, ऐतखाऊ आहेत, अशी अवहेलना फक्त वारंवार तो करीत असतो. चर्मकारांना रस्त्यावरचा संघर्ष माहित नाही, तो चळवळीत सहभागी होत नाही, तो वेळ आणि पैसा देत नाही, हे जरी खरे असले तरी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आणि कांही सामाजिक संघटना यासाठी प्रयत्नशील आहेत पण त्यांचे अस्तित्व बौद्ध मान्य करीत नाहीत, त्यांना सहकार्य करीत नाहित. नखेगाव, पानभोशी, गोणार खून प्रकरणी आम्ही रस्त्यावरील संघर्ष केला पण बौद्ध समाजाची कोणतीही संघटना मदतीसाठी धाऊन आली नाही. त्यामुळे दुरावा आणखीन जास्त वाढत जात आहे.

मातंग आणि बौद्ध हे आपण पारंपारिक वैरी आहोत असे वागत असतात. बौद्धांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मातंगानी आपापला वेगळा अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, मुक्ता साळवे मांडायला सुरुवात केली आहे. चर्मकार आपला वेगळा गुरु रविदास, संत हरळय्या, विर कक्कय्या, मान्यवर कांशीराम असे करीत आहे. हा दुरावा दूर सारुन यांना एकत्र सांधावे असे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. प्रत्येकाने आपली वेगळी अस्मिता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला तर आम्ही एका अनुसूचिमध्ये आहोत असे म्हणता येईल काय? जातीजातींमधील हा भेदभाव दूर व्हावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या व्यापक उद्देश्याने आपल्याला एका अनुसूचीमध्ये टाकले पण बौद्ध, मातंग, चर्मकार समाजाच्या ना-लायक पुढाऱ्यांनी आपसात गैरसमज वाढतील असेच गैरवर्तन आजवर केले आहे.

सर्व आरक्षणाचा गैरफायदा घेऊन बौद्धांनी केवळ आपली स्वतःची प्रगती साधली आहे, असा आरोप करीत मातंग पुढाऱ्यांनी वेगळ्या आरक्षणाची मागणी लाऊन धरली. तेलंगणा राज्यामध्ये मंदा कृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या वर्गीकरणाची तीव्र आंदोलने झाली, त्यात त्यांना यशही आले होते परंतु नंतर कोर्टात हे प्रकरण अडकले. मादीगा यांच्या आंदोलनाचा परिणाम सीमावर्ती महाराष्ट्रातही झाला. आमचे आम्हाला तोडून वेगळे आरक्षण द्या या मागणीसाठी आता महाराष्ट्रातही रोज आंदोलने होत आहेत. त्यामुळे बौद्ध आणि मातंग यांच्यात दुरावा निर्माण होत आहे.

या आरक्षणाच्या आंदोलनांपासून चर्मकार मात्र अलिप्त आहेत. फक्त चोरुन लपून आरक्षणाचा फायदा घेणे हे एवढेच चर्मकारांना माहित आहे. हे आरक्षण कसे मिळाले ? कुणी दिले ? ते टिकविण्यासाठी काय करावे लागेल ? आरक्षणाचा फायदा कुणाला जास्त झाला? कुणाला कमी झाला? आरक्षण हवे असेल तर शिक्षण घ्यावे लागेल याचे, चर्मकारांना काही देणे – घेणे नाही ! उचलली पिशवी आणि बसले रस्त्यावर गटई करायला, या अवस्थेत बव्हंशी चर्मकार आहेत. 

किमान महाराष्ट्रात बौद्ध, मातंग आणि चर्मकार या तीन जाती सामाजिक आणि राजकीय दृष्टीने एकत्र आल्या तर फार मोठी क्रांती होऊ शकते परंतु प्रत्येक जात – पोटजातीत अडकलेल्या या जाती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व्यापक दृष्टिकोण समजून घेत नाहित. बाबासाहेबांनी अनुसूची का बनविली? या अनुसूचितील सर्व जातींनी तरी किमान एक राहिले तर प्रस्थापित हादरुन जातील, आपण एक राहत नाही, एकत्र येत नाही, याचा गैरफायदा प्रस्थापित पक्ष संघटना घेत असतात. खरे तर बौद्ध, मातंग आणि चर्मकार या तिन्ही जाती जनावरांच्या चर्माशी संबंधित आहेत. निसर्गतः या जाती एकच आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. 

अनुसूचित जातीतील ५९ जाती, अनुसूचित जमातीतील ४७ जाती, ओबीसीमधील ३७४३ जाती जर सामाजिक आणि राजकीय दृष्टीने एकत्र आल्या तर..? यामुळे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात फार मोठी क्रांती होऊ शकते, मान्यवर कांशीराम जी यांनी हाच संदेश दिला. जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी ! वोट हमारा, राज तुम्हारा, नही चलेगा, नाही चलेगा! हा ८५ टक्के बहुजन समाज जागा झाला तर..? इकडे कुणी लक्ष देणार काय? 
-इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड
संस्थापक, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद
मोबाईल: ९४२३७८१११४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *