# वैचारिक भरण पोषण करणारा महोत्सव अन् भगवानराव लोमटे.

अंबाजोगाईत गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात येते, यंदा महोत्सवाचे ३६ वे वर्ष आहे. या महोत्सवात वैविध्यपूर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी ३६ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह २५ व २६ नोव्हेंबर बुधवार व गुरुवार रोजी होणार आहे. अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष भगवानराव लोमटे यांनी हा महोत्सव सुरू केला अन् महाराष्ट्रावर नावारुपाला आला आहे. भगवानराव (बापू) लोमटे यांनी महोत्सवाचे रोपटे लावले होते. त्याचा आता वैचारिक वटवृक्ष झाला आहे. अनेक उगवत्या, उमद्या, होतकरू कलाकार, लेखक, नेते, विचारवंत, शेतकरी तरुण-तरुणींना यानिमित्ताने प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अशा या रसिक व सह्रदयी भगवानराव (बापू) लोमटे यांच्या आठवणींना अंबाजोगाईचे सुपुत्र चारूदत्त उर्फ चारू देशमुख यांनी उजाळा दिला आहे…

मराठवाड्याचे नेतृत्व मागील शतकात ज्यांनी केले ते बहुतेक सर्व जण मुळचे व्यवसायाने किंवा वृत्तीने हाडाचे शिक्षक होते. (भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा, त्यांचे मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान सर्वश्रूत आहे.) अगदी अंबाजोगाईचेच उदाहरण घेतले तर स्वामीजी/बाबासाहेब परांजपे पासून ते बापू, अण्णा (डी.एन.पाटील), बप्पा (पंडितराव दौंड), प्रमोद महाजन, बप्पा (भगवानराव शिंदे गित्तेकर), डॉ.व्यंकटराव डावळे, रघुनाथराव मुंडे, प्राचार्य सबनीस, कॉ. गंगाधरअप्पा आप्पा बुरांडे, इंगोले सर, एॅड.मीर फरकुंद अली, प्राचार्य रा.गो. धाट, नरहर कुरुंदकर, मानवलोक चे डाॅ.द्वारकादास लोहिया व प्रा.शैला लोहिया (भाभी), गाठाळ सर यांच्यासह अनेक जण मुळचे हाडाचे शिक्षक होते. (ही नावे केवळ वानगीदाखल उदाहरणे आहेत.)

त्या पिढ्यांनी पेरले त्याच्या सुगीचा लाभ तुमच्या- आमच्या पिढीने खूप घेतला. पण परत पेरणी करण्यात आपली पिढी कमी पडली. “मराठवाड्याचे पुणे” म्हणवणाऱ्या अंबाजोगाई येथील शिक्षणसंस्थांचे (सध्याचे, अलीकडचे, नवे, काही सन्माननीय अपवाद वगळता) कर्ते- धर्ते जे कोणी आहेत त्यांची व्यक्तिगत शैक्षणिक कामगिरी पाहिली तर रोगाचं मुळ समजेल..

अंबाजोगाई हे पुतळे- फ्री शहर आहे. आम्ही जिवंत, निरंतर टिकणारी स्मारकं उभी करतो. यशवंतराव चव्हाण स्मृती महोत्सव हे बापूंचे खरे जिते- जागते स्मारक आहे. आजकाल गुणग्राहकता, गुणगौरव हे आऊट ऑफ फॅशन झाले आहे. कृतज्ञता तर अभावानेच आढळते. गावगप्पांमध्ये पूर्वीच्या पिढ्यांतील नेतृत्वावर अगदी चवीने चिखलफेक केली जाते. त्यांच्या कल्पीत लफड्या -कुलंगड्यांची चर्चा मिटक्या मारत होते. परंतु त्या पिढीने आपल्यासाठी काही मागे ठेवले आहे याबद्दल कृतज्ञता दिसत नाही. म्हणून आज हा आवर्जून केलेले लेखन प्रपंच..

मोहन टॉकीजमध्ये वसंत सबनीस यांचे “विच्छा..” हे नाटक होते. आई व गँग सोबत आम्ही चिल्ले – पिल्लेही गेलो.. दादा कोंडके हे दादाच! नाटकाच्या सुरुवातीला त्यांनी अंबाजोगाई येथील प्रमुख व्यक्तींची त्यांच्या शैलीत चांगली खिल्ली उडविली.. बहुतेक जण प्रेक्षकांत हजर होते. सुरुवात मात्र बापूंपासून केली. बापू हे तिथं उपस्थित असलेल्या नेत्यांपैकी सर्वात ज्युनियर होते. नुकतेच नगराध्यक्ष झाले होते. नाटक संपल्यानंतर आम्हा पाराटोरांपैकी कुणीही नाटकाची चर्चा करत नव्हते. नाहीतरी ते नाटक समजण्याचे आमचे वय नव्हते. पण दादांनी सुरुवातीला उडवलेली सर्वांची खिल्ली हे आम्हाला हसण्यासाठी अनेक वर्षे पुरली..

नंतर नव्वदच्या दशकात बापूंना जवळून पाहण्याची संधी मिळाली. ते रिगल कट्ट्याचे फाऊंडर मेंबर होते. मैफील रात्री दहानंतर सुरू होत असे. सर्व क्षेत्रातील लोकांची मैफल जमत असे. दिवसभर एकमेकांचे ऊणे- दुणे काढणारे या ठिकाणी अगदी खेळीमेळीने गप्पांचा फड रंगवत. विषयाचे बंधन नसे. पण चर्चांचा दर्जा मात्र ऑक्सफर्ड शी तुलना करावा असा. मध्यरात्रीनंतर रिगल उघडून बापूंना त्यांची आवडती नेसकॉफी/अंजीर आईस्क्रीम सर्व करण्याची जबाबदारी माझी असे. मी ती खूप एन्जॉय करत असे. कारण त्यानिमित्ताने मला “ईव्हज् – ड्रॉपिंगची संधी मिळे. मला त्यावेळी जाणवलेली भगवानराव लोमटे यांची (बापूंची) गुणवैशिष्ट्ये आजही आठवतात:

१)बापूंचे वाचन: आजच्या पिढीच्या झाडून साऱ्या पुढाऱ्यांनी वाचलेली पुस्तकं एका पारड्यात व बापू किंवा त्यांच्या पिढितील कोणतेही धुरीण (ऊदा.ए.मा.कुलकर्णी गुरुजी) यांनी डोळसपणे व आवर्जून वाचलेली पुस्तकं दुसऱ्या पारड्यात टाकली तर कोणते पारडे जड होईल?

२)स्पष्टवक्तेपणा: नामविस्ताराच्या तणावपूर्ण दिवशी टिव्ही वर येऊन जाहीर भूमिका घेत नामविस्ताराचे हर्षाने स्वागत करण्याचे आवाहन करण्याची धमक दाखवणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी बापू होते.

३)धाडस: अयोध्या कांडानंतर अंबाजोगाईत कुणी एक दगड सुद्धा उचलला नाही याचे श्रेय बापूंना जाते.

४)औदार्य व कळकळ: अयोध्या कांडानंतर अंबाजोगाईच्या जवळ परंतु हद्दीबाहेर शहराबाहेरच्या गुंडांनी एक टपरी जाळल्याचे समजल्याबरोबर बापू एकटे दुचाकीवरून (अर्थात दुचाकी चालक होता. बापू मागे बसले होते) तिथं पोचले. क्षणाचाही विलंब न करता त्या टपरीधारकाला खिशात होते तेवढे सारे पैसे दिले व जळालेली टपरी हलवायला सांगितले. जळालेली टपरी जागेवरच राहू दिली असती तर जाणाऱ्या -येणाऱ्यांच्या नजरेस पडली असती, अफवांचे पीक आले असते व वणवा पेटला असता हे बापूंनी हेरले. याला म्हणतात समयसूचकता.

५)इंग्रजी वरील कमांड: (शब्दसंग्रह- व्होकॅबलरी, ऊच्चार प्रोनाऊंसीएशन, व्याकरण- ग्रामर, ई.ई.) खरं तर बापू हे इंग्रजीचे शिक्षक होते.

६)शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता: बापू रिगलच्या कट्ट्यावर बसलेले असताना कधी रिगलचे फाऊंडर रावसाहेब गुरुजी समोरुन गेले तर बापू गप्पांमध्ये कितीही रंगून गेले असले तरी उठून उभे राहून गुरुजींना नमस्कार करायचे विसरले नाहीत.
आपण उभारलेल्या संस्थेच्या महाविद्यालयाला आपल्या शिक्षकाचे नाव त्यांनी दिले. (बाबासाहेब परांजपे महाविद्यालय). एकदा बाबासाहेब या समारोहात बोलत होते. वय झालेलं. ते काय बोलत होते कोणालाही काहीही समजत नव्हतं. प्रेक्षकांतून हुल्लडबाजी सुरू झाली. बापूंनी माईक घेऊन प्रेक्षकांना सज्जड दम भरला व नंतर बाबासाहेबांना मनसोक्त बोलू दिले.

७)शेतकऱ्यांविषयी कळवळा: या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम सुरू केला.

८)पुस्तक प्रदर्शन: या सोहळ्यातील पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची संख्या व पुस्तक विक्रीचा आकडा हा भल्या- भल्या महोत्सवांपेक्षा खूप जास्त आहे.

९)महिलांना संधी देण्यावर कटाक्ष: शक्य तिथं महिलांना प्रोत्साहन देत असत. सत्ता असताना छपाई करणारे इंजिनिअरिंग/ मेडिकल कॉलेज काढणे सहजशक्य असताना कन्या शाळा व महिला महाविद्यालय काढून मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. बापूंनी ही गंगा आपल्या दारात आणली नसती तर या संस्थेत शिकणाऱ्या बहुतेक मुली दुसरीकडे कुठेच शिकू शकल्या नसत्या. महिला विभाग महिलांच्या नेतृत्त्वाखालीच चालवला जायला हवा या अट्टाहासापोटी त्यांनी रीत झुगारून मुळापासून महिला नेतृत्वाची पिढी घडवली.

-प्रा.चारुदत्त देशमुख
हॉटेल पॅराडाईज/न्यू रिगल, अंबाजोगाई.
दूरध्वनी: ०२४४६-२४९८५०
ईमेल: eaglecharu@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *