सोनकांबळे गुरुजी चित्रकार होते, उत्तम कलावंत. अंबाजोगाईत तेंव्हा चित्रकला शिकवणारे खूप कमी शिक्षक होते. त्यात सोनकांबळे गुरुजी, अमृत टेकाळे हे योगेश्वरीत होते तर खोलेश्वरला मुळे गुरुजी तर जि. प. शाळेत त्र्यंबक पोखरकर हे अतिशय नावाजलेले चित्रकला शिक्षक. त्यात सोनकांबळे गुरुजी डावखुरे होते. त्यांनी उत्तम शिकविले व उत्तम पेंटिंग्ज काढल्या. अंबाजोगाईच्या निसर्गावर पोखरकर व सोनकांबळे गुरुजींनी भरपूर काम केले होते. ते आजही उपलब्ध आहे.
जेंव्हा वाहनांचा फार उपयोग नव्हता अनेक शिक्षक सायकलवर शाळेत जायचे त्यांच्या सायकली साध्या काळा रंग असलेल्या असायच्या. पण त्यात रंगाने लाल व नव्याने नाजूकता असणारी पहिली वहिली सायकल ही सोनकांबळे गुरुजींची होती. शाळेतील मूलं ती खूप वेळ पाहत असत. रस्त्याने ते जात तर लोकही कौतुकाने पाहत असत. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या डावखुऱ्या हाताचा पाठीतील धपाटा आणखी लक्षात असेल.
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या सुरुवातीच्या काळात टेकाळे गुरुजींमुळे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. शाळेचे विद्यार्थी घेऊन सोनकांबळे गुरुजी येत असत. नंतर कला शिक्षकांचे चित्र प्रदर्शन भरवण्याची सूचना कै.भगवानराव लोमटे यांच्या पुढे आली आणि त्याला लगेच मूर्तरूप आले. गावातील कला शिक्षक आपले पेंटिंग व अन्य चित्रांचे प्रदर्शन भरवू लागले. प्रचंड दाद या प्रदर्शनाला मिळाली. वेणूताई चव्हाण शाळेतील वर्गात हे प्रदर्शन भरू लागले. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन ते दर वर्षी भरवत असत.
तुम्ही भाग्यवान आहात, चोर प्रतिभावान असला पाहिजे:
एकदा सोनकांबळे गुरुजींचे तीन चार छोटे पेंटिंग्ज कोणीतरी खिडकीतून चोरून नेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या हे लक्षात आले. ते तावातावाने लाल होऊन भगवानराव लोमटे बापूकडे आले व तक्रार करू लागले. त्यांना चोरीचा खूप राग आला होता. खूप मेहनत करून चित्र काढलेले असते. बापूनी त्यांना शांत केले व म्हणाले तुम्ही भाग्यवान आहात. चोर प्रतिभावान असला पाहिजे. जो तुमच्या चित्रांवर फिदा झाला आणि त्याला ते पेंटिंग्ज चोरावे वाटले. त्यात तुमचा सन्मान आहे. चोरी झाली हे विसरून जा. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. असे म्हटल्यावर त्यांचा राग शांत झाला. नंतरही अनेक वर्ष ते चित्र प्रदर्शनात सहभागी होत राहिले.
अत्यंत समर्पक समय सूचक असे ते कार्टूनही काढायचे. एकदा काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार झाले. व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वात जनता दल पक्षाने निवडणूक लढवल्या. बीड लोकसभा मतदार संघात जनता दलाचे बबनराव ढाकणे उभे राहिले व काँग्रेसगच्या उमेदवार केशरकाकू क्षीरसागर होत्या. एक मर्मविनोदी कार्टून त्यांनी काढले व वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. आधीच विरोधात वातावरण असल्याने त्या कार्टूनचा मोठा फायदा ढाकणे यांना झाला. काकूंचा पराभव झाला. नंतरही ते वृत्तपत्रासाठी कार्टून काढत राहिले. त्यांची अनेक चित्र गावात अनेक ठिकाणी पहावयास मिळतील. कसलाही गर्व नसलेला हा गुणी कलावंत. त्यांच्या जाण्याने एक सज्जन व गुणी कलावंत अंबाजोगाईच्या ऐतिहासिक पटलावरून दूर झाला पण त्यांच्या स्मृती मात्र नेहमीच ताज्या असतील.
दिलखुलास व बोलतानाही नर्म विनोद असायचा. योगेश्वरी नूतन माध्यमिक विद्यालयात ते कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. पण पंचक्रोशीत त्यांनी जी ओळख निर्माण केली ती कायम स्मरणात असेल. त्यांना पुरस्कार असतील पण त्यांचे वेळोवेळी जे मान सन्मान झाले ते लाख मोलाचे आहेत. त्यांची ७० री जोरात साजरी झाली. नंतर त्यांचा मुलगा जो कलावंतच आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे नौकरी लागली व ते मुलाकडे गेले. त्यांचे गाव नांदेड. परभणी नांदेड असा त्यांचा प्रवास सुरु झाला. कधी मित्रांना भेटायला ते अंबाजोगाईला खास येत असत. त्यांच्या व्यक्तिगत ओळखीपेक्षा त्यांची सार्वजनिक ओळख फार मोलाची होती. त्यांचे यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील चित्र प्रदर्शन आलेल्या नामवंत साहित्यिक, कलावंत, पत्रकार, विद्यार्थी, कला शिक्षक व कलाप्रेमी नागरिक यांनी पाहिली व सतत त्यांना प्रोत्साहन प्रेरणा मिळत राहिली.
पुंडलिक नागनाथ सोनकांबळे उर्फ पी. एन. सोनकांबळे गुरूजी यांचे काल, २७ ऑगस्ट रोजी वयाच्या ७३व्या वर्षी अल्पशा आजाराने परभणीत निधन झाले. त्यांच्यावर नांदेड या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे. अशा या हरहुन्नरी कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली!
-दगडू लोमटे, अंबाजोगाई
मोबाईल: 9823009512