प्राचार्य रा.रं. बोराडे सर व अंबाजोगाई यांचे अतूट नाते आहे. त्यांना अंबाजोगाईबद्दल अत्यंत प्रेम आहे. अंबाजोगाईच्या एकूण राजकारण, साहित्य, सांस्कृतिक, समाजकारण, शिक्षण व राजकारण यात विधायक दृष्टी असलेले भगवानराव लोमटे यांचे व बोराडे सरांचा खूप जिव्हाळ्याचा ऋणानुबंध होता. त्यांच्या नावाचा आठवा पुरस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थितीत, शनिवार, 19 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने बोराडे सरांना बाबा भांड यांच्या हस्ते दिला जात आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्य व व्यक्तीमत्वाचा दगडू लोमटे यांनी घेतलेला वेध…
प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्याशी माझा पहिला परिचय त्यांच्या कथा वाचून झाला. आणि पुढेही वेगवेगळ्या दिवाळी अंकांतून व विविध नियतकालिकांतून त्यांच्या कथा सातत्याने वाचायला मिळत गेल्यामुळे हा परिचय अधिक दृढ होत गेला. कुठल्या तरी प्रादेशिक साहित्य संमेलनात त्यांचे कथाकथनही ऐकल्याचे मला स्मरते आहे. त्या कथाकथनावेळी मी त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं. त्यानंतर परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. प्राचार्य रामदास डांगे यांना भेटलो आणि मग मी व डांगेसर त्यांना महाविद्यालयात जाऊन भेटलो. डांगेसर अनेक वर्षे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यामुळे ते खूप प्रेमाने आणि उत्साहाने मला महाविद्यालयात घेऊन गेले होते.
बोराडे सरांच्या कथांबरोबरच कादंबऱ्या, नाटके, एकांकिका आणि इतरही लेखन वाचत गेलो आणि त्यांच्यातला लेखक मला अधिकाधिक आवडत गेला. ‘आमदार सौभाग्यवती’ ही कादंबरी; जिचे नंतर त्यांनी नाट्य रूपांतर केले. ते खूप गाजले. पूर्वी सकाळ, महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता वाचायला घेतला की, मी आधी त्यातल्या नाटक, सिनेमे, संगीतसभा, कविसंमेलन किंवा व्याख्यानांच्या छोट्या जाहिराती पहात असे. त्यात तेव्हा ‘आमदार सौभाग्यवती’ची जाहिरात हमखास असायची. माझ्या आवडीच्या ज्येष्ठ नाट्य कलावंत ज्योती चांदेकर यांनी त्यात भूमिका केली होती. ज्या महत्वाच्या नाटकांनी ज्योती चांदेकर यांना अभिनेत्री म्हणून स्वतंत्र ओळख दिली, त्यात ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘रखेली’ व ‘आमदार सौभाग्यवती’ ही नाटके प्रामुख्याने होती.
बोराडे सरांचे एक वगनाट्य अंबाजोगाईत प्रा.शैला लोहिया यांनी बसविले होते, हेही आठवते. १९८० नंतर शेतकऱ्यांच्या एकूण दुःखावर फुंकर घालण्याचे काम शेतकरी आंदोलनामुळे झाले. शरद जोशी यांचा झंझावात व त्यांची विद्वत्ता कृषक संस्कृतीतील जनमानसाला प्रचंड खेचून घेणारा होता. शेतीतील उत्पन्न आणि उत्पादन खर्चातील भयावह तफावत व शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या पातळीवर होणारे शोषण याचा ताळेबंद शरद जोशी यांनी मांडला आणि सबंध देशभरातला शेतकरी जागा झाला. या आंदोलनाच्या राजकीय-सामाजिक प्रभावाइतकाच परिणाम त्याकाळी वयात येऊ पाहणा-या ग्रामीण साहित्यावरही मोठ्या प्रमाणात झाला. तो परिणाम बोराडे सरांच्या १९८५ नंतरच्या लिखाणात दिसून येऊ लागला. त्यांची दिशाही शेतकरी व ग्रामीण जीवनाशी एकरूप झाली आणि ते साहित्य खेड्या पाड्यात, वाड्या वस्त्यांवर पोहचले. त्यामुळेच ग्रामीण साहित्यात एक नवी पिढी साहित्याच्या एकूण प्रांतात उदयाला आली. प्रा.भास्कर चंदनशिव, इंद्रजित भालेराव, उमेश मोहिते, अमर हबीब, प्रा. शेषराव मोहिते अशी शेकडो नावे घेता येतील. तीच पंरपरा पुढे आसाराम लोमटे व बालाजी सुतार यांच्या लेखणीत आपल्याला दिसते, याचे श्रेय बोराडे सरांना जाते. त्यांच्या निमित्ताने ग्रामीण जीवनाचा एक ओघ मराठी साहित्यात ठळकपणे आला. शेतकरी कुटुंबातील जन्म व संस्कार, कुटुंबातील नातीगोती यांची सुरेख गुंफण व त्या नात्यातील बरे वाईट अनुभव, सण-समारंभ, चालीरीती यातून त्यांचे साहित्य फुलत गेले. मराठवाडा शिक्षण मंडळातील प्राध्यापकी व समांतर लेखन. दरम्यान, प्राचार्य पदामुळे प्रशासनाचा अनुभव लाभला. वैजापूर, परभणी व औरंगाबाद येथील मंडळाच्या महाविद्यालयातील प्रदीर्घ अनुभव आणि पुढच्या नव्या पिढीशीही त्यांचे नाते कायम राहिले.
बोराडे सरांच्या लेखनाची वैशिष्ट्ये:
बोराडेंच्या कथांमधल्या व्यक्ती ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. ग्रामीण भागातील गरीब दुबळ्या माणसांना त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केले. याशिवाय अत्यंत बेरकी आणि धोरणी माणसेही त्यांच्या कथांमधून भेटतात. रा.रं. बोराडे यांच्या कथा कादंबऱ्यांत महिलांची व्यक्तिचित्रणेही अत्यंत समर्थपणे आली आहेत. त्यांच्या ‘नाती-गोती’ या कथासंग्रहात अशा महिला जवळपास प्रत्येक कथेत वाचकांना भेटतात. ‘तलफ’, ‘बुरूज’ यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही रा.रं. बोराडे यांनी लिहिल्या. या कथांतून ते ग्रामीण माणसांच्या मनाचा ठाव घेतात. या लेखन गुणांमुळे बोराडे यांना मोठा वाचकवर्ग लाभला. महाराष्ट्रातच नव्हे, तर मराठी भाषा जाणणाऱ्या भारत भरातील विविध प्रांतांत त्यांचा वाचकवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे भारतीय भाषांत तसेच इंग्रजीत अनुवाद झाले. त्यात ‘पाचोळा’ या कादंबरीचा समावेश आहे. ‘पाचोळा’ ही कादंबरी मराठीतील अभिजात कादंबऱ्यांत समाविष्ट होते. मराठीतील वाचकप्रिय ‘टॉप टेन’ कादंबऱ्यांतही तिची गणना केली जाते. ही कादंबरी लिहायला बोराडेंना तीन वर्षे लागली. या कादंबरीचे इंग्रजी व हिंदी भाषांतर नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे व तो बहुमान समजला जातो.
मी वर उल्लेख केलेल्या त्यांच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीनेही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळविला. या कादंबरीचे नंतर बोराडे यांनी याच नावाने नाट्य रूपांतर केले. स्त्री-पुरुषांतील सत्तासंघर्षाचे अत्यंत थरारक चित्रण या कादंबरीत आणि नाटकात येते. ‘आमदार सौभाग्यवती’ या नाटकाचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर शेकडो प्रयोग झाले. मराठीतील अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी या नाटकात नायिकेची भूमिका केली होती. ‘राजकीय नाटक आणि आमदार सौभाग्यवती’ या नावाचा एक स्वतंत्र समीक्षा ग्रंथ बाबा भांड यांच्या साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. प्रा.त्र्यंबक महाजन यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. प्रा.दासू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. साध्या सोप्या मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी बोराडे आग्रही आहेत. सर्वसामान्यांना, अगदी निरक्षरांनाही कळेल अशी सोपी, अर्थपूर्ण भाषा प्रसार माध्यमांनी वापरली पाहिजे. वाचक, श्रोता, प्रेक्षक बदलत आहे, त्यांच्या गरजाही बदलत आहेत. हे लक्षात घेऊन भाषाही बदलली पाहिजे, असे मत रा.रं. बोराडे यांनी वारंवार व्यक्त केले. लेखकाची जातीमध्ये विभागणी करून विशिष्ट गटामध्ये बंदिस्त करणे म्हणजे लेखणीला संकुचित व मर्यादा घालणे होय. त्यामुळे लेखकाला जातीचे कुंपण घालता कामा नये, ही भूमिका रा.रं. बोराडे यांनी आयुष्यभर जपली. अनेक मासिकांतून रा.रं, बोराडे यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. उदा. शेतकरी मासिकातले ‘शेरास सवाशेर’ भाग १ ते ४’ या कथा. आमदार सौभाग्यवती, आयुष्याच्या सायंकाळी, इथं होतं एक गाव, कणसं आणि कडबा, कथा एका तंटामुक्त गावाची, चारापाणी (हिंदीत तिनका), तिळा तिळा डिकी उघड, नामदार श्रीमती, पाचोळा, रहाटपाळणा, राजसा, रिक्त अतिरिक्त, वळणाचं पाणी, सावट व हरिणी या कादंबऱ्या. तर खोळंबा, नातीगोती, पेरणी, बुरूज, मळणी, माळरान, राखण या कथा प्रसिद्ध झाल्या. आमदार सौभाग्यवती (याच नावाच्या बोराडे यांच्या कादंबरीचे श्रीनिवास जोशी यांनी केलेले नाट्यरूपांतर)
आम्ही लेकी कष्टकऱ्यांच्या,
कशात काय अन् फाटक्यात पाय, चहाट, चोरीचा मामला (एकांकिका), पाच ग्रामीण नाटिका, त्यात – पाणी ! पाणी ! पाणी !, पिकलं पान, बंधमुक्ता, बिनपाण्याचा गाव, भोवरा, रिंगण (आमदार सौभाग्यवती या कादंबरीच्या आधी त्याच कथाबीजावर लिहिलेले नाटक) व विहीर ही नाटक व एकांकिका तर ग्रामीण साहित्य हे समीक्षा पुस्तक मापदंड आहे. तर बालसाहित्यात ‘हरवलेली शाळा’ हे खूप गाजले.
बोराडे सरांच्या लेखनकृतींना अनेक मानाचे पुरस्कार लाभलेले आहेत. त्यात उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य शासनाचे पुरस्कार (एकूण: ५ पुरस्कार), फाय फाउंडेशन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची सन्मानवृत्ती, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, अंबाजोगाई, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार, मराठवाडा सेवा गौरव पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचे नरहर कुरुंदकर सह महत्वाचे पुरस्कार यांचा समावेश होतो.
त्यांची ‘शिवार’ नावाची संस्था साहित्य क्षेत्रातील महत्वाची संस्था आहे. दरवर्षी एक तरुण परंतु प्रतिभावंत लेखकास ते पुरस्कार देतात. प्रा.इंद्रजीत भालेराव यांना पुरस्कार दिला त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले. अनेक ग्रंथालयांना नेहमी ते मदत करत आले आहेत. अनेक मान्यताप्राप्त साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मानसन्मान मिळाले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त पदावर ते २०१३ पासून नियुक्त आहेत. कोणत्याही साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही, असा निश्चय रा.रं. बोराडे यांनी अगदी उमेदीच्या काळातच केला होता. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते वंचित राहिले. त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे चाहते गेली अनेक वर्षे त्यांच्या मागे ससेमिरा लावीत आहेत. तथापि, त्यांनी आपला निर्णय बदललेला नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, अशी त्यांची भूमिका आहे. आपल्या भूमिकवर ते आजही ठाम आहेत. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने देण्याचा निर्णय केल्यानंतर उस्मानाबाद येथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते सहज अध्यक्ष झाले असते. परंतु माझे वय आता संमेलनाच्या अध्यक्षपदाचा भार सोसवणारे राहिले नाही, त्यामुळे माझी या पदावर निवड करू नये अशी जाहीर भूमिका घेऊन आपले मोठेपण सिद्ध केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते चार वर्षे अध्यक्ष होते. त्या कार्यकाळात नवीन लेखक कवींना पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आर्थिक मदत मिळवून दिली व जाचक अटी दूर करून साहित्याभिमुख भूमिका घेतल्याने नवोदित ग्रामीण भागातील साहित्यिकांचे साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले व होत आहे. त्यांच्या कार्यकाळात १०० महाराष्ट्राचे हिरे शोधून त्यावर १०० लेखकांकडून ते लिहून घेतले व ती चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित झाली. त्यात तंट्या भिल्लसारख्या व्यक्तींचे चरित्र आज वाचकांना वाचायला मिळते. तंट्या भिल्ल नाव माहीत होते, त्यांचे कार्य लोकांना सहज कळले ते या पुस्तकामुळे. असे दूरदृष्टी असलेले बोराडेसर इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेले आहेत. फेसबुक वापरणारे सगळ्यात वयस्क साहित्यिक म्हणून ते जास्त परिचित आहेत. गर्भित विनोद असलेली वाक्य टाकून ते आपल्या चाहत्यांना आकर्षित करतात.
प्राचार्य रा.रं. बोराडे सर व अंबाजोगाई यांचे अतूट नाते आहे. त्यांना अंबाजोगाईबद्दल अत्यंत प्रेम आहे. अंबाजोगाईच्या एकूण राजकारण, साहित्य, सांस्कृतिक, समाजकारण, शिक्षण व राजकारण यात विधायक दृष्टी असलेले भगवानराव लोमटे यांचे व बोराडे सरांचा खूप जिव्हाळ्याचा ऋणानुबंध होता. त्यांच्या नावाचा आठवा पुरस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने बोराडे सरांना बाबा भांड यांच्या हस्ते दिला जात आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्य व व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न…
-दगडू लोमटे, अंबाजोगाई
मोबाईल: 9823009512