खूप दिवसांनी मी या विषयावर लिहिण्याचे आणि बोलण्याचे ठरवले होते, पण बरेच दिवस हे टाळत होतो कारण सध्या कुठल्याही परिस्थितीत कोरोना महामारीशी दोन हात करणे हे महत्वाचे आहे. पण सध्या रोज कोरोना आणि ॲलोपॅथी डॉक्टर्स यांच्याबद्दल विविध प्रकारचे गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच इतरही विविध माध्यमातून पसरवले जात आहेत त्याच्यावर मी भाष्य करणार आहे.
सर्वप्रथम कोरोना हे थोतांड आहे किंवा खूप साधा आजार आहे, असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी फक्त एकदा त्यांच्या गावातील कोविड सेंटरला भेट द्यावी आणि आजवरची त्यांच्या गावातील तसेच आपल्या देशाची तसेच जगाची कोरोना बाधितांची आकडेवारी पहावी तसेच मृतांची संख्या पहावी म्हणजे कोरोना आजार थोतांड नसून खरोखरच एक भयंकर संकट जगावर आलेले आहे हे आपल्या लक्षात येईल.
दुसरा गैरसमज म्हणजे ॲलोपॅथी डॉक्टरांबद्दल पसरवली जाणारी जाणून बुजून चुकीची माहिती. अॅलोपॅथी हेसुद्धा एक शास्त्र आहे. जसे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी हे शास्त्र आहे तसेच हेसुद्धा एक शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राच्या काही मर्यादा असतात तसेच त्याचे काही फायदेही असतात. कोणी कितीही म्हणो अॅलोपॅथी हे जगातील नंबर एकचे शास्त्र असून त्यामुळे अनेकांना आजवर जीवदान मिळाले आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही कोरोनाचे व्यवस्थापन आणि अॅलोपॅथी डॉक्टर्सची भूमिका यांची सांगड घालणे हे अत्यंत चुकीचे आहे. औषधांच्या किमती ठरवणे, कोणती औषधे कोणत्या वेळी बाजारात आणणे तसेच कोरोनाच्या उपचाराबाबत गाईडलाईन्स देणे हे ॲलोपॅथी डॉक्टरांचे व्यक्तिशः काम नसून ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (W.H.O.) चे अधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शासनाचा अधिकार आहे. यामध्ये शासन आणि प्रशासन दोन्ही मिळून उपाययोजना करतात म्हणून वाढत्या औषधांच्या किमती ठरवणे, आजाराचे नियमन आणि व्यवस्थापन याबद्दल अलोपॅथी डॉक्टरांना दोष देणे अत्यंत चुकीचे आहे.
कुठल्याही व्यवसायात किंवा सेवेत काही प्रमाणात अपप्रवृत्ती असतात याला कुठलेही क्षेत्र अपवाद नाही, म्हणून सरसकट सर्व अलोपॅथी डॉक्टरांना दोष देणे अत्यंत चुकीचे आहे. अशा अपप्रवृत्तीचे समर्थन कोणीही करणार नाही. जे खरोखरच दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे याबाबत कुणाचेही दुमत नाही. आजपर्यंत कोरोना बाधित डॉक्टरांची संख्या आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण पाहिले तर ॲलोपॅथी डॉक्टरांचे समर्पण आणि त्याग लोकांच्या लक्षात येईल जवळपास तीनशेच्या वर आपल्या देशातील डॉक्टरांनी आपले प्राण या आजारामुळे गमावले आहेत. तसेच भारतातील मृत्यू पावलेल्यांची संख्या पन्नास हजाराच्यावर पोहोचली आहे म्हणजेच कोरोना हा घातक आजार असून ॲलोपॅथी डॉक्टरांचे त्याच्या उपचारामध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींसाठी डॉक्टरांना जबाबदार धरून त्यांची बदनामी करणे थांबवावे. तसेच औषधांच्या किमती दवाखान्याची बिले येणारा खर्च याबद्दल शासनाला आणि प्रशासनास जाब विचारावा. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करणे, दोषींवर कठोर कार्यवाही करणे, तसेच शासकीय रुग्णालयात चांगल्या सेवा सुविधा निर्माण करून लोकांचा विश्वास जिंकणे यावर भर देणे गरजेचे आहे.
कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेल्या डॉक्टरांची दखल घेऊन त्यांचा उचित सन्मान करणे, त्यांना शहिदाचा दर्जा देणे, तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांची काळजी घेणे गरजेचे आहे. सीमेवर लढणारे सैनिक आणि या आजाराशी दोन हात करणारे सर्वजण यांचे देशासाठी असलेले योगदान हे सारखेच आहे. जर कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा आणि सर्व सेवा देणाऱ्या सेवावृत्तीचा सन्मान करता येत नसेल तर अपमान करण्याचाही कोणाला अधिकार नाही. तसेच डॉक्टर पेशाची विशेशतः अॅलोपॅथी डॉक्टरांची नाहक बदनामी थांबवणे ही काळाची गरज आहे असे वाटते. तसेच रोज होणाऱ्या डॉक्टरांना मारहाणीच्या घटना थांबणे हेही तितकेच महत्वाचे आहे. जर डॉक्टरांची विशेष काळजी घेतली नाही, आणि त्यांची अवहेलना अशीच सुरू राहिली, तर याचे दूरगामी वाईट परिणाम या सेवा क्षेत्रावर झाल्याशिवाय राहणार नाहीत हेही तितकेच खरे आहे.
-डॉ.प्रकाश सिगेदार, जालना
अस्थिरोग तज्ज्ञ तथा माजी सचिव
महाराष्ट्र अस्थिरोग संघटना.
मोबाईल: 9423457010