# जगणं सुंदर आहे..फक्त कोरोना गेला पाहिजे..! -हेमराज बागुल

कोरोनाच्या किती मरणकथा सांगाव्यात ? कोणीही या जगातून सुखासुखी गेलेलं नाही. प्रत्येक मृत्यूमागे वेदनांची एक करुण कहाणी आहेच. अशा असंख्य कहाण्या वाचून आता आसवंही आटलीत ! सर्व सुखांच्या कथा एकसारख्या असतात. मात्र, प्रत्येक दुःखामागची व्यथा वेगवेगळी असते. कोरोना सुरू झाल्यावर मी दररोज रिपोर्ट बघत असे, किती बाधित अन् किती डेथ.. त्यात राज्यात किती, भारतात किती आणि जगात किती.. आता ते पाहणं मी सोडलंय. एक समर्पक म्हण आहे, रोज मरे त्याला कोण रडे. आपल्याला साऱ्याच गोष्टींची सवय होत जाते. अगदी मरणाचीही. आणि जेव्हा आपलं मरण हे कोणाच्या आसवांनाही मोताद होतं. तेव्हा जगात यापेक्षा भीषण अन् निष्ठूर असं काहीच नसतं !

एवढं कोरोनाचं नाटक संपू दे मग तुझं काम करतो, असं उत्तर सध्या बऱ्याच ठिकाणी ऐकू येतं. प्रत्येकाचा कोरोनानंतर काहीतरी प्लॅन आहे. सगळ्यांना कोरोना जाईल आणि आपण जगणार आहोत याची खात्री आहे! आणि तिही फार काळजी न घेता. आयुष्य आपण गृहीत धरतो ते असं. अगदी टेकिंग ग्रांटेड ! निसर्ग आणि नियती या दोन्ही गोष्टींना आपण सदैव गृहीत धरलंय ! त्यांच्याशी फारच मस्ती केली आणि तीच महागात पडलीय. आता त्याचा सूड घेण्यासाठी कोरोना जणू या जगाच्या कानाशी पिस्तूल लावून विचारतोय, ‘खरं सांगा…सुधारणार आहात की नाही ? लेकिन हम नहीं सुधरेंगे, यहा एक ढुंढो, हजार मिलेंगे!

काय हरामी लोकं असतात, राव. आधी खेळणी पाठवतात आणि नंतर विषाणू. तिकडे साऱ्या जगाला संकटात लोटून चीनच्या दुकानदाऱ्या सुरू झाल्यात. एकाच वेळी जखमा आणि मलम तेच विकू शकतात. तिथल्या बाप्या आपल्या सीमेवर घुसखोरी करु लागला आणि त्याचं पोरगं शाळेत जाताना डब्यात सोयासॉससोबत बेडूकपोळी नेऊ लागलं म्हणजे समजायचं चीन नॉर्मल आणि आत्मनिर्भर झालाय. इथे आम्ही कायमच नॉर्मल असतो आणि बायकोकडून घरच्या घरी केस कापून घेतले तरी स्वतःला आत्मनिर्भर समजतो!

यापुढे बारशापासून बाराव्यापर्यंतचे सर्व सार्वजनिक व्यवहार शिस्तीने करावे लागतील. त्यामुळे जवळिकीची परिभाषाही बदलेल. अमक्याच्या मौतीला पहिल्या वीसात तर तमक्याच्या लग्नात पहिल्या पन्नासात मी होतो, असे प्रौढीनं सांगितले जाईल! एवढेच नव्हे तर संसर्गाला निमंत्रण देणारे गर्दीचे सण-उत्सव काही काळ टाळावेच लागतील. मग आपलेच का, त्यांचे का नाही असा अवसानघातकी प्रश्न कोणी विचारु नये. साऱ्यांचेच बंद व्हावेत. दुसऱ्याचं घर अस्वच्छ आहे म्हणून मी माझं घर स्वच्छ करू नये का? येणाऱ्या गणेशोत्सवाचंच उदाहरण घेऊया. आपला भक्तिभाव मूर्तीच्या उंचीवर अन् आईची शपथ घालून लावलेल्या डीजेच्या दणदणाटावर सिद्ध होतो का? ‘पोरी जरा जपून दांडा धर ..’ या श्रेष्ठ भक्तीगीतामध्ये तमाम दांडेकरांना अभिप्रेत असलेला आणि भक्तिरसानं ओथंबलेला शुद्ध सात्विक भाव मी खूप दिवसांपासून शोधतोय !

एक तर आपण लोकसंख्या बदाबदा वाढवून ठेवलीय. साऱ्याच ठिकाणी ‘एक अनार सौ बीमार ‘ अशी स्थिती. सार्वजनिक सुविधा कशा पुरतील? पूर्वी मुलगा होईपर्यंत मुलींची माळ गुंफली जायची. आता माझ्या घरात भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ पाहिजे असतो! शहरे किती फुगवायची? झोपडपट्ट्या किती वाढू द्यायच्या? धारावीत एका चौरस कि.मी.मध्ये चार लाख लोक राहतात. जिथे दोन घरांमध्येही सोशल डिस्टन्सिंग नाही, तिथे माणसांमध्ये कसं शक्य आहे? इकडचा बाप्या आपल्या बायकोला हळूच काही कानात सांगतो तर बाजूच्याच घरातील बाई लाजते!

संस्कृतीचा अभिमान जरुर असावा. मात्र, तिच्या श्रेष्ठत्वाचा गंड दूर ठेवावा लागेल. गेली अनेक वर्षे आपण तो निष्कारणच जोपासतोय. आधुनिक जगातले असे कोणते महान शोध आपण लावले आहेत, की ज्याबद्दल आपणच आपल्यावर गुलाल उधळून घ्यावा? अशा अनेक भ्रम आणि गंडांपासून इथली डोकी अनलॉक करण्याची प्रक्रियाही आता सुरु करावी लागेल. कोरोना होऊन गेल्यावर शरीरात जशा अँटिबॉडीज तयार होतात तशा मेंदूत का तयार होत नाहीत? म्हणजे डोक्यात पुन्हा पुन्हा किडे पडणार नाहीत. पुण्यात पूनावाला म्हणून कोणी पुण्यवान असामी आहेत. ते लसी तयार करतात म्हणे. त्यांनी जरा हे पुण्याचं काम करावं!

‘लाईफ में हो आराम, तो आयडियाज आते है,’ असं कोणा महान संताने सांगून ठेवलंय. आपण लॉकडाऊनमध्ये कधी नव्हे इतका आराम केला असला तरी जगण्याच्या फार आयडिया आलेल्या नाहीत. कारण थोडंफार चिंतन करून बुद्धी आणि जाणिवांच्या कक्षा विस्तारण्याऐवजी आपण वाढवलाय तो पोटाचा घेर आणि पार्श्वभागाचा परिघ. आणि प्रत्येकच मुळव्याधीचा संबंध चिंतनशीलतेशी नसतो हो !

देशात आज व्हेंटिलेटर्सपेक्षा पुतळे अन् हॉस्पिटल्सपेक्षा जास्त स्मारके आहेत. याशिवाय सध्या पुतळे-स्मारकांची किमान पन्नास हजार कोटींची नवी कामे सुरू असतील. एवढा खर्च समाजाने आरोग्यावर केला तर? समजा आपली माय अथवा बाप अत्यवस्थ आहे. त्यांचे जगण्याचे स्वतःचे श्वास संपलेत. त्यांना आता उसन्या श्वासांची गरज आहे. ते देण्यासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध असावं की पुतळा? जर उद्या आपल्या दाराशी दोन मरणं वेटिंगवर असतील अन् हॉस्पिटलमध्ये बेडच्या रूपाने एकच जगणं शिल्लक असेल तर काय करावं? या प्रश्नांचं खरं उत्तर तोच देऊ शकतो ज्याच्या घरातील एखाद्या जगण्याला कधीकाळी नियतीने क्रूरपणे नकार दिलाय !

आपल्याला आता सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या दोन गोष्टींवर जास्त लक्ष द्यावंच लागेल. यापुढे नालेकरता घोडा गमावणं परवडणार नाही. आपल्याला उठसूठ इंग्लंडमध्ये असं अन् अमेरिकेमध्ये तसं अशी उदाहरणे द्यायची फार सवय आहे. जगाच्या नकाशात जास्त वर पाहण्याची गरज नाही. जरा आपल्या पायाशी असलेल्या श्रीलंकेकडे बघा. कोरोना रोखण्यात जगात सर्वात जास्त यश श्रीलंकेला मिळालेय. तिथे आतापर्यंत केवळ ११ मृत्यू झालेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे तेथील अत्यंत निरोगी आणि सशक्त अशी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. श्रीलंकेत उपलब्ध बेडचे प्रमाण आपल्यापेक्षा पाच पटीने अधिक आहे. कलियुगात श्रीरामाच्या भारताने रावणाच्या लंकेकडून हा एक बोध जरुर घ्यावा!

प्रत्येकाच्या अंगात थोडी चरबी असावीच. प्रत्येक वेळी सरकारच घास भरवायला येईल या भरवशावर आपण का रहावं? ती सरकारची जबाबदारी असली तरी आपलीही आहेच की आणि सरकारने किती आघाड्यांवर लढावे? इम्युनिटी केवळ शरीराची नाही, खिशाचीही असावी. अगदी एक चपाती कमविणाऱ्यानेही चतकोर चपाती भविष्यासाठी ठेवावी! बेडकापासून एक जरुर शिकावं. पावसाळ्यात तो शरीरात चरबी साठवतो अन् नंतर वर्षभर ती पुरवून वापरतो. यापुढे आदर्श बेडकाचा ठेवा; भूक लागल्यावर शिकार करणाऱ्या वाघाचा नको !

भविष्यात विषाणूची आक्रमणे अत्यंत घातक असतील. केवळ मास्क लावून आणि हात धुवून जाण्याइतके पुढचे विषाणू दयाळू नसतील. त्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला खूप काही बदलावं लागेल आणि या बदलांवरच आपलं अस्तित्व अवलंबून असेल. त्यात सध्याचा कोरोना जाताना नक्कीच इथल्या मार्केटचा मंत्र शिकून जाईल. त्यामुळे पुढचा कोरोना हा ‘कोविड प्रो’ किंवा ‘ कोविड-20’ असू शकेल!
-हेमराज बागुल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *