बहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे महात्मा फुले यांची आज जयंती आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद यांना मूठमाती द्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही बाब महात्मा फुले यांना त्या वेळेस समजली होती. त्यामुळे महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा 1848 रोजी पुणे येथे भिडे वाड्यामध्ये काढली. अस्पृश्यांसाठी 1852 साली शाळा काढली, स्त्रिया आणि बहुजनांना, अस्पृश्यांना शिक्षणासाठी दारे उघडी केली. पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून भारतातील पहिली शिक्षक आणि पहिल्या मुख्याध्यापक होण्याचा मान मिळवून देणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने महात्मा होते. सावित्रीबाईनी मुलींच्या शाळा सांभाळल्या, मुलींना शिक्षण दिले. सावित्रीबाईंच्या अंगावर दगड आणि धोंडे फेकणारे कर्मठ मनुवादी विचारसरणीच्या लोकांना न जुमानता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या आणि दलितांच्या शिक्षणाचीं दारे कायमस्वरूपी खुली केली.त्यामुळेच आज भारतातील प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्त्रिया आपल्याला काम करताना दिसत आहेत. याचे सर्व श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जाते. शिक्षणाचीं निकड किती आहे हे पाहून महात्मा फुले यांनी 1882 साली हंटर कमिशनपुढे साक्ष देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले होते. भारतातील पहिले साक्षरता अभियान चालवणारे महात्मा फुले हेच होते. त्यावरती न थांबता विधवा स्त्रियांसाठी त्यांच्या प्रसूतीची व्यवस्था केली आणि त्यांच्या अनाथ मुलांना सांभाळण्याचे महान असं कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. यशवंताला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर केले आणि सत्यशोधक पद्धतीने त्याचा विवाह सुद्धा लावला. बोले तैसा चाले या म्हणी प्रमाणे काम केले. दुष्काळाच्या काळामध्ये अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. तेव्हा स्वतःच्या घरातील विहीर त्यांनी सर्वांसाठी खुली केली.
जातीयतेला मूठमाती देणारे महामानव म्हणून जन्माला येणारे महात्मा फुले हेच होते. प्रत्येक माणूस हा समान असतो हाच विचार त्यावेळी त्यांच्या मनामध्ये होता. धर्मवेड्या लोकांनी बहुजनांच्या मनामध्ये कर्मकांड, अंधश्रद्धा, दैववाद ठासून भरवलेला होता. त्यामुळे महात्मा फुले म्हणत असत की देवाची भक्ती करायची असेल तर त्यासाठी मध्यस्थाची आपल्याला काय गरज असणार आहे. ब्राह्मणांच्या हातून कुठलेही लग्न लावून घ्यायचे नाही असा ठाम निर्धार करून समाजामध्ये सामाजिक परिवर्तनाची नवी वाटचाल करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड आशा प्रकारे अनेक प्रकारची उत्कृष्ट अशी ग्रंथसंपदा आपल्याला देऊन महात्मा फुले यांनी आपल्या ज्ञानाची कवाडे उघडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच काय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरू मानले होते. महात्मा फुले यांच्या विचारांवरती, कार्यांमध्ये गौतम बुद्धाच्या विचारांचा अंश दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे पहिले महात्मा फुले हेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती समाजासाठी व्हावी यासाठी विविध प्रकारे उपक्रमांचे आयोजन करून त्यामधून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तबगारी विषयी माहिती देणारे जगातील पहिले महात्मा फुले हेच होते. महात्मा फुले यांच्या या गोष्टीवर ठाम विश्वास होता कि,जगातील कुठलंही पुस्तक देवाने लिहिलेलं नाहीये, मनुवादी, ब्राह्मणवादी लोकांनी बहुजनांच्या मेंदूमध्ये अंधश्रद्धा वाढवण्यासाठी खोटी ग्रंथसंपदा लिहली आहे. बहुजनंना मानसिक गुलामगिरी मध्ये ठेवण्यासाठी अनेक प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे. ती जर भीती घालवायची असेल तर शिक्षणाशिवाय कुठलाही पर्याय नाही.शिक्षण हे यावरती एकमेव उपाय असेल याची खात्री महात्मा फुले यांना होती, म्हणून अस्पृश्यांच्या, स्त्रियांच्या शिक्षणावरती भर दिला. भारतातल्या समस्त स्त्रियांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या उपकाराचे भान ठेवले पाहिजे. घरांमध्ये महात्मा फुले,सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज छत्रपती, शिवाजी महाराज या सर्व महामानवांचे फोटो लावून त्यांना वंदन केलं पाहिजे.
-जयश्री सोनकवडे
लेखिका ह्या सामाजिक न्याय विभाग, पुणे येथे उपायुक्त आहेत. मोबाईल: 7798547744