कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या जीवनशैलीमध्ये फार मोठा फरक पडत चालला आहे. ऑफिस मध्ये आठ-आठ तास काम करणारा नोकरदार वर्ग आज घरात एकाच ठिकाणी बसून वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली बोर झाला आहे. मग मुलांची काय अवस्था झाली असेल. गेल्या शंभर दिवसापासून घरातच कोंडून राहावे लागल्यामुळे त्यांना घरात अस्वस्थ वाटू लागले आहे आणि लॉकडाऊन मुळे शाळा कॉलेज उघडणार नसल्याने आता घरातच बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार. आता शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्रांतीचा उगम झाला आणि हे कुठंपर्यंत चालेल सांगता येणार नाही. ऑनलाईन शिक्षण घ्यायचे झाले तर तासंतास कॉम्प्युटर आणि मोबाईल समोर बसावे लागेल. शिवाय नेटवर्कच्या समस्या विद्यार्थी वर्गासमोर आ वासून उभ्या आहेच. मुंबईत जरी मोबाईलचे नेटवर्क चांगले असले तरी खेड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? आज ही गावच्या ठिकाणी दोन दोन दिवस लाईट येत नाही मग मुलांनी मोबाईल चार्जिंग करायचे कुठे? याचा शिक्षण मंत्र्यांनी विचार केला आहे का? ऑनलाईन शिक्षण श्रीमंतांची मुले घेतील त्यांना परवडेलही, गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून द्यायचे काय? ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा, कॉलेजची फी पालकांकडून उकळण्याचा पुरेपूर प्रयत्न शिक्षण खात्याकडून होत आहे. त्यांना विद्यार्थी वर्गाच्या समस्यांचे काही देणे घेणे नाही. कोरोनाने खऱ्या अर्थाने शिक्षणाचं चांगभलं करून टाकलं आहे. कोरोना व्हायरसचा जगातील इतर देशांसह भारतातही वाढता प्रादुर्भाव पाहता मार्च २०२० च्या मध्यावर शाळा व महाविद्यालये काही काळापुरती बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. हा व्हायरस नवीन असून त्यावर कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही आणि प्रसार अधिक वेगाने होत असल्याने त्यावर सध्या तरी उपाय एकच- तो म्हणजे सामाजिक अंतर पाळणे असे माध्यमांतर्फे आणि सरकारतर्फे सुचवण्यात आले. बघता बघता म्हणजे २४ मार्च रोजी केंद्र सरकारने ‘लॉकडाउन’ घोषित केला. सुरुवातीचे काही दिवस घराबाहेर पडू नका वगैरे सूचनांचे पालन करून झाल्यानंतर जेव्हा कोविड-१९ चा प्रसार दिवसेंदिवस वाढू लागला, तेव्हा मात्र हे काहीतरी वेगळे आणि गंभीर प्रकरण आहे आणि पुढचे कित्येक दिवस आपल्याला घरातच थांबावे लागणार आहे, याची सर्वांना जाणीव झाली. आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनीही घरूनच काम करावे अशी व्यवस्था करण्यात आली. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दिवसाचा काही वेळ जाऊ लागला. कधीही कल्पनाही न केलेले आयुष्य समोर आले. या सगळ्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर न झाला तरच नवल. शिक्षक आणि विद्यार्थी घरात अडकून पडले तरी शिक्षण दिले व घेतले जाऊ शकते आणि तेसुद्धा रोज वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही कल्पना जोर धरू लागली आणि बघता बघता अगदी प्राथमिक ते अगदी पदव्युत्तर स्तरावरील अध्ययन व अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. कोरोना संसर्गामुळे चालू शैक्षणिक वर्षातील तीन महिने आतापर्यंत वाया गेले असून, यावर पर्याय म्हणून बहुतांश शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. विद्यार्थी व पालकांकडूनही या पर्यायास प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
तांत्रिक साधनाच्या अभावामुळे २७ टक्के मुले शिक्षणापासून वंचित:
देशभरातील अनेक विद्यार्थी तांत्रिक सुविधांअभावी या शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे एनसीआरटी च्या सर्वेक्षणानुसार जर आकडेवारी बघितली तर लक्षात येईल. द नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, स्मार्टफोन व कम्प्युटर यांसारखी साधने नसल्याने किमान २७ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणात ३४ हजार जणांचा सहभाग २८ टक्के विद्यार्थ्यांना अपुऱ्या वीजपुरवठ्याची समस्या टीव्ही, रेडिओ या माध्यमांचा नगण्य वापर ‘एनसीईआरटी’ने केलेल्या या सर्वेक्षणात ३४ हजार जण सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक मुख्याध्यापकांनी अभिप्राय नोंदवले. या सर्वेक्षणात केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयांसह सीबीएसई शाळांच्या शिक्षक, मुख्याध्यापकांचाही सहभाग होता. यातील २७ टक्के सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे स्मार्टफोन वा लॅपटॉप नसल्याचे सांगितले. तर, २८ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अपुऱ्या वीजपुरवठ्याची समस्या जाणवत असल्याचेही स्पष्ट झाले. या इलेक्ट्रॉनिक साधनांचा शैक्षणिक उद्देशासाठी प्रभावीपणे वापर करण्याचे ज्ञान नसणे तसेच, या ऑनलाइन माध्यमांमध्ये शिक्षक पारंगत नसणे या अडचणीही येत असल्याचे या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले. ऑनलाईन शिक्षण ही सध्याची गरज झाली असली, तरी ३६ टक्के विद्यार्थी हे आजही त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाठ्यपुस्तके व अन्य पुस्तकांवर अवलंबून असल्याचे यात दिसून आले. यानंतर स्मार्टफोन व लॅपटॉपना पसंती मिळाली आहे. अध्ययन व अध्यापनासाठी टीव्ही, रेडिओ या माध्यमांचा नगण्य वापर होत असल्याचेही यात स्पष्ट झाले. कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील शाळा आणि विद्यापीठे १६ मार्चपासून बंद ठेवली आहेत. आज सर्व सुरु असतांना महाविद्यालय मध्ये काळजी घेऊन महाविद्यालय व शाळा सुरु करणे गरजेचे वाटते. राज्यात दारूची दुकाने उघडली, हॉटेल उघडली परंतु खाजगी क्लास किंवा शाळा व महाविद्यालय सुरु व्हावी म्हणून कोणी त्यावर विचार केला नाही. कोविड १९ आजार आहे, काळजी घेतली पाहिजे पण नेमके किती दिवस शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवणार आहे. आज शिक्षणाची परिस्थिती बघता समाजिक विषमता वाढेल असे चित्र दिसते आहे. शिक्षण हे महत्वाचे असतांना शासन त्यावर गांभीर्याने विचार का करत नसावे.
ऑनलाईन शिक्षण, अडचणीच फार:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणापासून कुणीही विद्यार्थी वंचित राहू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये या भावनेतून शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणास प्राधान्य देत शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय घेतलाय किंवा घ्यावा लागलाही, हे जरी खरे असले तरी मात्र ज्यांच्याकडे लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन आदी सुविधा आहेत किंवा घेऊ शकतात अशा शहरातील सधन, चाकरमानी शिक्षित पालक आपल्या मुलांना सहज ऑनलाईन शिक्षण देवू शकतात, परंतु वीज खंडित होणे, बिघाड होणे या गोष्टींना पालक कसं आवर घालणार? शहरात राहतात म्हणून सर्वच पालकांकडे ऑनलाइन शिक्षणाची आयुध असतातच असे नाही किंबहुना मुलांना अभ्यास समजावून सांगण्या इतपत सक्षम असतातच असेही नाही. शाळेत प्रत्यक्ष जेवढा अभ्यास होतो त्याच्या अर्ध्यानेही घरात ऑनलाईन अभ्यास मूल एकाग्रपणे करू शकत नाही हेही तेवढेच सत्य होय. कोरोनाच्या चाहूलीने हबकलेल्या सरकारने सर्व शिक्षणसंस्था बंद केल्या आणि नंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय असा? प्रश्न पडला आणि त्यावर ऑनलाईन शिक्षणाचा उपाय सर्वांनी शोधला. तात्पुरती व्यवस्था म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय ठीक असला तरी तो कायम होणे योग्य ठरणार नाही. शाळेत वा कॉलेजमध्ये फक्त अभ्यासक्रम शिकविला जात नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होतात. तसेच इतरांशी कसे वागावं, वेळ पडल्यास आपला हट्ट सोडून देणे, दुसऱ्यांचे कौतुक करणे, सामुदायिक खेळातूनही खूप शिकायला मिळते. शिक्षकांशी रोज भेट झाल्याने एक वेगळं नातं तयार होतं. रोज शाळेत गेल्याने शाळेबद्दल आत्मियता वाटायला लागते. हे सर्व ऑनलाईन शिक्षणात होत नाही. हल्ली तसंही घरटी एक मूल असल्याने एकलकोंडी वृत्ती वाढीस लागली आहे ती ऑनलाईन शिक्षणाने वाढण्याचा धोका संभवतो. आता कोरोनासोबतच जगायचे असल्याने ऑनलाईन शिक्षण किती काळ चालू ठेवायचे ह्याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे.
ऑनलाईनमधील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता:
कोरोनाच्या साथीमुळे शिक्षणावर न भुतो.. अशी बंधने आली आहेत. विद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हाच पर्याय उरला आहे. आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक साधने उपलब्ध असतानाही बहुतांश ठिकाणी पारंपरिक म्हणजेच ऑन-कॅम्पस पद्धत रूढ आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये संक्रमण करताना भारतासह जगातील सर्वच शिक्षण संस्थांसमोर मोठे आव्हान आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे भरपूर फायदे आहेत. पण त्याचबरोबर काही त्रुटी व तोटे आहेत. या त्रुटी दूर करून नवे पर्याय शोधावेच लागतील. मुख्य म्हणजे अशा परिस्थितीची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने यथोचित ऑनलाईन शिक्षण साधने उपलब्ध होण्यास काही काळ लागू शकतो. सध्या काही संस्थांनी ऑनलाईन पद्धत स्वीकारलेली आहे व ती बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एकाग्र ठेवणे व त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष देणे कठीण आहे. अभियांत्रिकी, वैद्यकशात्र, किंवा तत्सम अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिक सहभागाशिवाय शिक्षण देणे आणि घेणे अशक्यप्राय आहे. म्हणजेच संपूर्णपणे ऑनलाईन शिक्षण होऊ शकत नाही. त्यासाठी वेगळ्या पद्धती आणि नियम बनवावे लागतील. ज्या ठिकाणी अद्ययावत संगणकीय सुविधा उपलब्ध नसतील तेथे त्या पुरवाव्या लागतील. ऑनलाईन शिक्षण ही आजच्या परिस्थितीतील अपरिहार्यता असली तरी हा कायमस्वरूपी तोडगा नव्हे. देशात आज ऑनलाइन शिक्षणाचे प्रमाण 30 टक्के आहे. परंतु हे फक्त महानगरांमध्ये आढळते. इंटरनेटची तसेच विजेची उपलब्धता, स्पीड, संस्थांमधील यंत्रणा, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षक व विद्यार्थी यांचे कसब अशा अनेक पैलुंवर याचे यश अवलंबून आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी परीक्षा पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील. त्याचबरोबर हॅकिंग /व्हायरस सारख्या समस्यांसाठी खात्रीलायक उपाय योजावे लागतील. मुंबई विद्यापीठामध्ये आजही दूरःस्थ / बहिःशाल विभागात ऑनलाईन पद्धत असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठात प्रत्यक्ष जावे लागतेच. अशा पार्श्वभूमीवर आपण या नव्या संकटास किती प्रभावीपणे तोंड देऊ शकू याबाबत साशंकता आहे. पण विद्यार्थ्यांचे आयुष्यातील किमान एक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे ते टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण अपरिहार्य आहे. मात्र, त्यातील त्रुटी आपल्याला जाणीवपूर्वक व चौकटीबाहेरचे परिश्रम घेऊन दूर कराव्या लागतील.
-मयूर बाळकृष्ण बागुल
समन्वय समिती सदस्य,
किसानपुत्र आंदोलन, पुणे.
मोबाईल: ९०९६२१०६६९