# महिला दिन विशेष: परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या यशस्वीनी -डॉ.मीनल कुष्टे.

समाजाने स्त्रीला अबला म्हणून कितीही हिणवले तरी ती पुरुषापेक्षा मनाने खंबीर असते. शेतकऱ्यांच्या बायकांनी ते सिद्ध करून दाखविले. ज्या परिस्थितीला घाबरून त्यांनी जीव दिला त्याच परिस्थितीला त्यांच्या बायकांनी धीराने तोंड दिले व घरातल्या वृद्धांचा व मुलांचा त्या आधार बनल्या. 

लॉकडाऊनच्या काळात स्त्रियांनीच अपरंपार कष्ट सोसून घर चालविले. ह्या स्त्रीच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे ८ मार्च! अर्थात वर्षातला फक्त एकच दिवस तिची आठवण काढायची हा तिच्यावर अन्याय आहे, पण समाजाचा रिवाज म्हणून तो पाळायचा.

स्वत:ही जगतो आणि दुसऱ्यालाही जगवतो तोच खरा यशस्वी, अशाच दोन यशस्वी स्त्रीयाची ही यशोगाथा आजच्या ८ मार्चच्या स्त्री दिनाच्या निमित्ताने…

कमल, तिची पक्षघात झालेली विधवा आई, एक बहीण व एक भाऊ दादर मधल्या एका चाळीत रहायचे. वडील वारल्यानंतर सर्वात मोठी म्हणून कमलवर घरची जबाबदारी आली. भाऊ व बहीण शाळेत शिकत होती. कमला जास्त शिकलेली नव्हती. एका डॉक्टरच्या हाताखाली राहून थोड नर्सिंगच काम शिकली. तेवढ्या तुटपुंज्या कमाईवर घर चालवणे कठीण होत. त्यावेळी आरेचे दूध मिळायचे. आरेच्या सेंटरवर दूध बाटल्यां मधून मिळायचे. एक दिवस आरेची सेंटर चालवायला देणे आहे म्हणून जाहिरात आली. कमलाने अर्ज केला व तिला सेंटर चालवायला मिळाले. पहाटे चार वाजता दुधाची गाडी यायची. त्याआधी सेंटर उघडायला लागायचे. पावणेचार वाजता कमल सेंटरवर हजर होत. क्रेट मधून दुधाच्या बाटल्या यायच्या. ते क्रेट मोजून घ्यायचे. पाच वाजल्यापासून दूध वितरणाला सुरुवात होत असे. दूध देणे, रिकाम्या बाटल्या घेणे, पैशाची देवघेव सगळं ती एकटीच बघे. जास्तीच्या कमाईसाठी आजूबाजूच्या इमारतीत घरपोच दूध देई.

आठ वाजता सेंटर रिकामे करून द्यावे लागे. त्यानंतर घरी येऊन आईला आंघोळ घालून, खायला देऊन औषध देऊन ती तिच्या कामाला बाहेर पडे. पेशंटच्या घरी जाऊन त्यांना इंजेक्शन देणे, कोणाला स्पंज करणे त्याच बरोबर कोणाकोणाची इतरही कामे करीत असे. हॉस्पिटलमधल्या पेशंटसाठी खाजगी नर्स म्हणूनही ती जात असे. काही वेळा पेशंट बरोबर रात्रीही तिला रहावे लागे. पहाटे पुन्हा केंद्रावर. अशी सर्व तारेवरची कसरत करीत ती आपले कुटुंब जगवित होती. अशात आरेने ते केंद्र दुसऱ्यांला विकले. कमल कोर्टात गेली पण तो पर्यंत नव्या मालकाने केंद्राला कुलूप लावले. दुधाचे क्रेट कोठे उतरवून घ्यायचे? कमल रडत नाही बसली. केंद्राच्या समोर ती दूध उतरवून घेऊ लागली. क्रेट मधल्या बाटल्या कोणी चोरू नये म्हणून रांगेतली माणसे लक्ष ठेवू लागली. घराघरात जेव्हा ती दूध पोहोचविण्यास जायची तेव्हा एक आजोबा तिच्या क्रेटची देखरेख करायचे.

जशी चांगली माणसे तिला भेटली तशी लबाड ही माणसे भेटली. एक मुलगा तिला मदतनीस म्हणून तिच्याकडे राहिला व सर्व शिकून तिच्या समोरच्या फुटपाथवर गोकुळचे दूध विकू लागला. अशा सर्व परिस्थीतीचा सामना करीत तिने भावाला शिकविले, बहिणीचे लग्न करून दिले. आपल्या कुटुंबासाठी तिने आपले आयुष्य पणाला लावले. सर्वांना सुखी करता-करता तिला मात्र स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही.

पोलिओग्रस्त पौर्णिमा चे लग्न एक पाय तोकडा असलेल्या व कारखान्यात कामाला असलेल्या मकरंदशी झाले. १०वी झालेल्या पौर्णिमाने सोशल सर्विस लीग मधून शिवणाचा डिप्लोमा केला होता. लग्नात आईने तिला शिवणाची मशीन दिली. सासरी ती आजुबाजुच्यांचे कपडे शिवीत असे व त्यातून थोडीफार कमाई तिला होत असे. नवरा बायको दोघेही अपंग असल्याने घरात त्यांना वागणूक चांगली मिळत नसे. त्यातच मकरंदच्या कारखान्याला टाळे लागले. मकरंदची कमाई बंद झाल्यावर घरातली कुरबुर वाढू लागली. आणि एक दिवस दोघानाही बाहेरचा रस्ता दाखविला गेला.

लग्नात मिळालेली दोनचार भांडी, कपडे आणि शिलाई मशीन घेऊन दोघांनी घर सोडले. ते दोघे  पौर्णिमेच्या माहेरी आले. तिच्या भावजयीला ते आवडले नाही. आठ दिवसात येथेही आपल्याला थारा नाही हे त्यांच्या लक्षात आले. मोठ्या मुश्किलीने मकरंदला एका चाळीत कोपऱ्यातील खोली भाड्याने मिळाली. खोलीच्या समोर इमारतीचा चौक होता. त्यात सार्वजण कचरा टाकीत. सतत येणाऱ्या त्या घाणीने डोके दुखू लागे, जेवण जात नसे. एकच चांगली गोष्ट अशी होती की तिच्या खोली समोर ओटा होता. त्यावर मशीन ठेवून, फॉल बिडिंग करून मिळेल, कपडे शिवून मिळतील असा पुठ्ठयाचा बोर्ड तिने लावला. जमविलेले पैसे संपले होते. ज्या वेळी काही काम येई त्या पैशात गुजारा होई. कधी उपाशी कधी अर्धपोटी राहून दोघे दिवस ढकलीत. मात्र, तिने हार मानली नाही.

मकरंद देखील मिळेल ते काम करून पैसा कमवित होता. हळूहळू पौर्णिमाचा शिवणात जम बसू लागला. स्त्रियांचे कपडे शिवण्यात ती तरबेज झाली. दोन-चार इमारती सोडल्यावर एका शिंप्याचे दुकान होते. वयानुसार त्याला कपडे शिवायला जमत नसे. त्याच्या कानावर तिची ख्याती गेली. त्याने तिला दुकान भाड्याने देण्याची तयारी दाखवली. ही संधी तिने वाया जाऊ दिली नाही. त्या संधीचे तिने सोने केले. आज तिच्या हाताखाली चार मुली कामाला आहेत. तिने फॅशन डिझाईन चा कोर्स करून ब्युटीक टाकले आहे. आज तिचा स्वत:चा ब्लॉक आहे, गाडी आहे. तिचा सर्व पैशाचा व्यवहार मकरंद सांभाळतो. एवढेच नाहीतर कामाला असणाऱ्या  मुलींचे घर तिच्यामुळे चालते. तिची जिद्द व अथक परीश्रम ह्याचे हे फळ आहे.

आपल्या व्यंगावर मात करून, आपल्यावर ओढवलेल्या कठीण परिस्थितीला तोंड देत उभी राहिलेली पौर्णिमा काय किंवा कमल काय या दोघींनी परिस्थितीला घाबरून पळ काढला नाही तर परिस्थितीशी दोन हात केले व यशस्वी झाल्या. अशा ह्या स्त्रियांना स्त्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
-डॉ.मीनल कुष्टे
मोबाईल: 9604207322

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *