# मज़रुह सुलतानपुरी: एक प्रतिभावंत गज़लकार -डॉ.नीता पांढरीपांडे.

“मै अकेला ही चला था, ज़ानिबे-मंज़िल मगर
लोग साथ आते गये कारवाँ बनता गया
जिस तरफ भी चल पडे हम आबला-पायाने शौक
ख़ार से गुल और गुल से गुलिस्ता बनता गया।”

(मी एकटाच आपल्या उद्दिष्टाकडे निघालो होतो. रस्त्यात लोक माझ्याबरोबर येत गेले आणि कारवा तयार होत गेला. घाव झालेल्या पायांनी मी जेथे-जेथे पाय ठेवत गेलो तेथे-तेथे काट्यांची फुले झाली आणि फुलांचे गुच्छ झाले.)

ध्येयवेड्या माणसाची वाटचाल नेहमी एकटीच असते. कालांतराने त्यांची मते लोकांना पटत जातात आणि त्यांच्यापाठी अनुयायी लोकांची भीड जमा होत जाते. अशा ध्येयवेड्या मजरुहचा जन्म उत्तरप्रदेशातील आजमगढ़ जिल्हातील निज़ामाबाद येथे १ ऑक्टोबर १९१९ ला झाला. त्यांचे नाव असरारुल हसन खान. मदरसामध्ये त्यांनी अरबी, फारसी आणि उर्दूचे शिक्षण घेतले. अलाहाबाद विद्यापीठातून ‘आलिम’ (पंडित) ही उपाधी घेतली. १९३४ साली लखनऊला येऊन मजरुह यांनी यूनानी चिकित्सा शिकण्यासाठी ‘तकमील उलतीब कॉलेज’ मध्ये प्रवेश घेतला. कॉलेजचे शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करून सुलतानपूरला त्यांनी एक छोटेसे हॉस्पिटल सुरू केले.

त्या काळात सुलतानपुरात नित्य मुशायरा होत असे शेर-शायरीचा हंगामा बघून मजरुहचे भावूक मन काव्याकडे आकर्षित झाले. अन् हळूहळू ते स्वतः कविता करू लागले. काव्य सम्मेलनांत भाग घेऊ लागले.

१९४१ च्या दरम्यान मजरुहने एका भव्य काव्य सम्मेलनात भाग घेतला. मुशायर्‍यात त्या काळचे प्रसिध्द शायर ज़िगर मुरादाबादी उपस्थित होते. मजरुहचे काव्य, त्यांचे गंभीर व्यक्तिमत्व आणि त्याच बरोबर त्यांचे अतिशय अर्थपूर्ण उपनाम ‘मज़रुह’.(मज़रुहचा अर्थ घायाळ आत्मा) या सर्व गोष्टीमुळे ज़िगर अत्यंत प्रभावित झाले.

मज़रुहने ज़िगर मुरादाबादीला आपला गुरू मानले. ज़िगरनी त्यांना गुरूमंत्र दिला. ते म्हणाले —” माणसाचा स्वभाव जसा असेल तसाच बरेच अंशी तो कवितेत उतरतो. स्वभाव चांगला असेल तर कविता देखील अप्रतिमच होतात. स्वभाव जर जिद्दी, हेकड, ईर्षाळू असेल तर तसेच भाव कवितेत उतरतात. एक महत्वाची गोष्ट नेहमीच लक्षात असू दे- दुसर्‍याचे काव्य कितीही सुंदर का असेना त्याची कधीही नक्कल करु नकोस.’ ज़िगरच्या मार्गदर्शनामुळे मज़रुहचे काव्य भट्टीतून तावून सुलाखून सोन्यासारखे झळकू लागले.

माणूस ठरवतो एक अन् घडते काही वेगळेच. मानवी जीवनाची आणि वांछित ध्येयाची गाठ फार कमी वेळा पडते. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना दैव मात्र स्वतःच्या इच्छेप्रमाणे व्यक्तीला दुसरीकडे खेचत नेते. असेच काहीसे मज़रुहच्या बाबतीत देखील झाले. पण दैव त्याला उदारपणे एका नव्या मार्गावर घेऊन गेले. एक प्रसिध्द हकिम होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही पण प्रसिध्द कवी, गीतकार म्हणून ते अत्यंत प्रसिध्द झाले.

१९४५ ला एका मुशायर्‍यात भाग घेण्यासाठी मज़रुह मुंबईला आलेले होते. ज़िगर देखील त्यांच्या बरोबर होते. या दोघांची मुशायर्‍यांत उपस्थिती म्हणजे रसिकांना कपिलाषष्ठीचा योग वाटे. मुशायर्‍यात चित्रपट सृष्टीतील मातब्बर मंडळी उपस्थित होती. चित्रपट निर्माता ए.आर. कारदार यांना मज़रुहचे काव्य फार पसंत पडले. त्यांनी मज़रुहला चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासाठी आमंत्रित केले.

त्या काळांत चित्रपटासाठी गाणी लिहिणे कमी दर्जाचे मानले जात होते. पण ज़िगरच्या आग्रहावरून त्यांनी प्रस्ताव स्वीकारला. पण नेहमी ते म्हणत-

‘फिल्मी गीत रोटी देता है, मगर शायरी सुकून देती है।”

‘शाहजहाँ’ चित्रपटासाठी मज़रूहने पहिले गाणे लिहिले-

“हम जी के क्या करेंगे, जब दिल ही टूट गया। उल्फत का दीया हमने, इस दिल मे जगाया था। उम्मीद के फूलों से, इस घर को सज़ाया था।”

या गीताला नौशादजींनी संगीत दिले होते आणि के.एल. सैगल यांनी ते गायले होते. सहगल यांना ते गीत अतिशय आवडले. आपल्या अंत्य संस्काराच्या वेळी हेच गाणे वाजवावे अशी आपली अंतिम इच्छा आहे असे त्यांनी म्हटले. हे गीत अतिशय लोकप्रिय झाले अन् मज़रूहचा फिल्मी सफर सुरू झाला.

स्वतंत्रता संग्रामाच्या काळांत त्यांनी असे काही लिहिले की त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. जवानीचा जोश आणि शायरीच्या वेडाने त्यांना घेरले होते. त्यांनी लिहिले होते-

“रोक सका हमें ज़िन्दाने बला क्या ‘मज़रूह’
हम वो आवाज़ है दीवारों से छन जाते हैं।”

या शेरमध्ये एक ज्वलंत त्वेष आणि लढवय्याचा झुंजार आवेश आहे. प्रस्थापितांशी, अन्यायाविरुध्द ते नेहमीच उभे राहतात. दीन-दुःखी, पीडितांविषयी त्यांच्या डोळ्यात नेहमीच अश्रू असतात. भविष्याविषयी ते एक दिव्य स्वप्न अंतःकरणांत बाळगताना दिसतात आणि सोनेरी भविष्याची वाट मोकळी करण्यासाठी यशस्वी लढा देण्यास सदैव तत्पर असतात. आपल्या काव्यातून मज़रूह नेहमीच लोकांना प्रोत्साहन देताना दिसतात. प्रगतीवादी लेखन आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अन् सरकार विरुध्द लेखन केल्यामुळे बलराज साहनी सारख्या अनेक वामपंथी लोकांबरोबर मज़रूहला काही दिवस कारावास भोगावा लागला.

जीवन विरोधी परिस्थितीतही मज़रूह समर्थपणे जगण्याची इच्छा प्रकट करतात. माणूस स्वतः आपल्या नियतीला बदलू शकतो हा विचार, ही प्रेरणा ते लोकांना देतात.

“देख ज़िंदा के परे ज़ोशे ज़ुनून, जोशे बहार।
रक्स करना है तो फिर पाँव की ज़ंज़ीर न देख।”
(रक्स = नृत्य )

प्रगतीशील लोकांबरोबर संबंध आल्यामुळे मज़रूहचे विचार बदलत गेलेले दिसतात. त्यांच्या विचारातील क्रांतीकारी भाव स्पष्टपणे नजरेत भरू लागले. मज़रूहच्या काव्यात जोश, आवेग आहेच पण त्याबरोबर त्यात एक गोडवा देखील आहे. आपल्या क्रांतीकारी मित्रांना ‘मेहबूब’ समजून ते लिहितात-

“मुझे सहल हो गयी मंज़िले
वो हवा के रुख़ बदल गये
तेरा हाथ हाथों मे आ गया
कि चिराग राह मे जल गये।”

महाराष्ट्राच्या कामगार आंदोलनात भाग घेऊन मज़रूहनी त्यांच्या प्रश्नांना, अडचणींना, दुःखाला आपल्या काव्यात स्थान दिले. ते कामगारांचे शायर झाले. त्यांनी आपल्या शायरीत साहित्यापासून खूप दूर असलेल्या कामगारांची जीवन व्यथा प्रखरपणे समाजासमोर ठेवली. त्या काळात सरदार ज़ाफ़री, मख़दूम, कैफी आज़मी हे देखील ट्रेड युनियनच्या कवी सम्मेलनात भाग घेत असत.

शोषितांसाठी धडकणारे मज़रूहचे ह्रदय स्वतंत्र्य देशात समानतेचा अधिकार मागत होते. एक दिवस कामगार सभेत त्यांनी एक कविता म्हटली. त्यातील काही ओळी अशा होत्या-

“ये भी कोई हिटलर का है चेला, मार ले साथी जाने न पाए।
कॉमनवेल्थ का दास है नेहरू मार ले साथी जाने न पाए।”

काही लोकांनी या कवितेचा चुकीचा प्रचार केला. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की नेहरूंना मारण्यासाठी त्यांनी जनतेला प्रेरित केले आहे. त्यावेळी मोरारजी भाई देसाई मुंबईचे राज्यपाल होते. त्यांनी मज़रूहला तुरूंगात टाकण्याचे आदेश दिले. त्यांना माफी मागण्यास सांगण्यात आले. माफी मागण्याचा सरळ अर्थ आपण चूक केली असा होतो. मज़रूहला ते मान्य झाले नाही आणि त्यांची रवानगी आॅर्थर रोडच्या तुरूंगात करण्यात आली. तुरूंगात असताना मज़रूहने एक शेर लिहिला-

“ज़ुनूने-दिल न सिर्फ इतना कि इक गुल पैरहन(१)तक है
कदो-गेसू(२)से अपना सिलसिला दारो- रसन (३) तक है।”
(१. वस्त्र २. देह, शरीर .३. फाशी)

हा शेर मज़रूहच्या कला-वैविध्य आणि विशाल दृष्टीचा निदर्शक आहे. त्यातली रचनेची उत्कटता, भावनेची खोली आणि कल्पनेची झेप बघण्यासारखी आहे. त्यात अन्यायाविरुध्द चाललेल्या जनतेच्या आंदोलनाशी कवीचा आत्मा एकरूप झालेला आढळतो. त्यांच्यातील जागृत कार्यकर्ता आणि झुंजार ईर्षाळू कवीमन त्यांच्या कवितेच्या पाठीशी असते. मज़रूहच्या जीवनाचे एक टोक दैहिक प्रेमाशी तर दुसरे टोक फाशीच्या फंदाशी जोडले गेलेले आहे. हा शेर त्यांची आत्मकथा आहे की काय असे वाटते.

तुरूंगातून बाहेर आल्यावर मजरूह पुनः चित्रपट सृष्टीकडे वळले. या काळात नवीन संगीतकारांचे आगमन झालेले होते. जेल प्रकरणामुळे सुरूवातीच्या काळात पुनः काम मिळणे त्यांना अतिशय अवघड गेले. पण त्यांच्या प्रतिभेला बघून ‘दोस्ती’ चित्रपटासाठी त्यांना पाचारण करण्यात आले. ‘मेरी दोस्ती मेरा प्यार; राही मनवा दुःख की चिंता; असो किंवा ‘चाहूँगा मै तुझे’ असो या गाण्यांनी रेकॉर्ड केले. “चाहूँगा मै तुझे शाम सवेरे” या गाण्यासाठी त्यांना फिल्म फेअर अवाॅर्ड मिळाले. यानंतर त्यांची मागणी खूप वाढली.

सिनेसृष्टीच्या झगमगाटात मज़रूह कधीही स्वतःला हरवून बसले नाही. चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली त्यात देखील उर्दूची अदब नेहमी जतन केलेली दिसते. स्वतःच्या शायरीला आणि विचारांना त्यांनी निष्ठेने जपले. त्यामुळेच त्यांची गाणी वास्तववादी भावनांना प्रकट करणारी अशी आहेत.

मज़रूह असामान्य प्रतिभेचा कवी आहे. आपल्या आधी निर्माण झालेल्या प्रतिमांचा, प्रतीकांचा संस्कार त्याच्या मनावर आहे. पण त्याची नक्कल न करता त्या प्रतीकांना मजरूहने नवीन पैलू पाडलेले दिसतात. कवीच्या काव्यप्रतिभेचा कस अशा वेळीच लागतो.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मज़रूह खूप आनंदात होते. सगळीकडे खुशहालीचे वातावरण राहील हे स्वप्न बघत होते. आपल्या मनातील आनंद शब्दात व्यक्त करीत ते म्हणतात..

“अब खुल के कहूँगा हर गमे-दिल
‘मज़रूह’ नही वो वक्त कि जब
अश्कों मे सुनाना था मुझको
आहों मे गज़लख्वां होना था।”

अशा प्रकारच्या कवितेत राजकीय, सामाजिक, मानसिक सर्व प्रकारच्या गुलामगिरीबद्दलची चीड देखील मोठ्या खुबीने तीव्रपणे व्यक्त झालेली दिसते.

उर्दू भाषेत, गज़लांमध्ये एक नज़ाक़त, नशा, नाद माधुर्य आहे. त्याचा पूर्णपणे उपयोग मज़रूहने केलेला आहे ‘दस्तक’ चित्रपटात वेश्या व्यवसायातल्या कचाट्यांत सापडलेल्या स्त्रीची मनोव्यथा व्यक्त करताना मज़रूह लिहितात-

“हम है मता-ए-कुचा-ओ बाज़ार की तरह
उठती है हर निगाह खरीददार की तरह।”

सरेआम विकल्या जाणार्‍या या स्त्रिया भोगवस्तू आहेत. कोणीही येतो आणि आमची किंमत विचारतो.

उर्दू शायरीत स्त्री जीवनावर लिहिलेले अनेक शेर आहेत. त्यातील हा एक महत्वपूर्ण शेर आहे. मज़रूहने या गज़लेत स्त्री जीवनाला एक व्यापक आयाम दिला आहे. स्त्रीचे दुःख प्रामाणिकपणे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजही पैशाच्या बळावर बाजारातील एक विक्रीची वस्तू म्हणून स्त्रीकडे बघितले जाते. ही वस्तुस्थिती मज़रूहनी गीतातून व्यक्त केलेली आहे. या संदर्भात त्यांची ‘पाकीज़ा’ चित्रपटातील ही गज़ल मनाला स्पर्श करुन जाते, जेंव्हा मज़रूह म्हणतात-

“इन्ही लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा।
हमरी न मानो बज़ज़वा से पूछो।
जिसने अशरफी गज़दीना दुपट्टा मेरा।”

मज़रूहच्या काव्यातील वैचारिकता ही खास त्यांच्या व्यक्तिमत्वातून साकारलेली आहे हे लक्षात घेणे आज अत्यंत औचित्यपूर्ण वाटते. जीवनविषयक श्रध्दा, उत्कटता, निष्ठा यातूनच त्यांची कविता उद्भूत होते. तिने परंपरेचे डोळस अवलोकन केले आहे अन् त्यातूनच स्वतःचे असे काही कविताविश्व निर्माण केले आहे. उर्दू कविता वैयक्तिक अनुभूतीच्या आविष्कारात विलसू लागल्यामुळे तिला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले.

“रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे। साज़े दिल टूट गया हो तो सुनाए कैसे।
बोझ होता जो गमों का तो उठा ही लेते। ज़िंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे।”

या सर्व गज़लातून स्त्री विध्द झालेल्या मनाने आपल्या ह्रदयातील दुःखाचे वर्णन करते तेंव्हा रसिक श्रोते भारावून जातात. नारीच्या वेदना अनोख्या, अचूक शब्दात मज़रूह मांडतात तेंव्हा श्रोत्यांचे मन हेलावून जाते.

प्रेमभावनेचे प्रगटन करताना मज़रूहच्या शब्दात वेगळीच नज़ाकत बघायला मिळते. सुंदर शब्दात तो आविष्कार रसिकांना बघायला मिळतो, जेंव्हा मज़रूह म्हणतात-

“पहले सौ बार इधर और उधर देखा है।
तब कहीं डर के तुम्हे एक नज़र देखा है।”

शंभर वेळा चहूकडे नजर टाकून कोणी बघत नाहीय याची खात्री करुन घेत प्रियकराने चोरुन प्रेयसीकडे नजर टाकली, तिच्याकडे बघितले अन् आश्चर्य म्हणजे ती देखील चंचल नजरेने प्रेमाने माझ्याकडेच बघत होती. ही भावना व्यक्त करताना मज़रूह पुढे लिहितात-

“आज इस एक नज़र पर मुझे मर जाने दो।
उसने लोगों, बड़ी मुश्किल से इधर देखा है।”

विलक्षण कल्पनाशक्ती, मनोरम कल्पना विलास आणि आपल्या बुध्दीची चमक मज़रूहच्या काव्यातून प्रकट होताना दिसते. त्यांच्या या गुणांमुळेच सिनेसृष्टीत बघता-बघता त्यांनी आपले स्थान निर्माण केले.

मज़रूहनी पन्नास वर्षै चित्रपटातून गाणी लिहिली. या काळात वेळोवेळी काव्याच्या रंगरूपात फेरबदल झाले. काही वरवरचे तर काही अंतर्मन ढवळून टाकणारे. काही इतके ठसठशीत की मंद दृष्टीला देखील जाणवतील, तर काही इतके सूक्ष्म की एकाग्र बुध्दिलाही सायासाने उमगावेत. हा फेरबदलांचा स्पर्श मज़रूहच्या कवितेला देखील झाला. तिच्या प्रभावाने अनेक बदल झाले. साध्या, सोप्या पण ह्रदयाला भिडणार्‍या रचना लिहिल्या गेल्या

“कभी आर कभी पार लागा तीरे नज़र/सैंया घायल किया रू तुने मेरा ज़िगर।”;
“लेके पहला-पहला प्यार, भरके आँखों मे खुमार/जादू नगरी से आया है कोई ज़ादूगर”;
“जाइये आप कहाँ जायेंगे, ये नज़र लौट के फ़िर आयेगी”;
“तेरे मेरे मिलन की ये रैना”

अशा प्रकारच्या गाण्यातील वेगवेगळे भाव आणि त्यातील लडिवाळ गोडव्यामुळे ही गाणी पुन्हा-पुन्हा ऐकाविशी वाटतात. अशा रेशमी वाणीचा उपमात्मक आविष्कार, देखणा बदल हवाहवासा वाटणारा आहे.

मज़रूहचे एक गीत-
‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ मधील सूचकता मनाला भुरळ घालते तर
‘रात अकेली है, बुझ गए दीये’; “चढती जवानी मेरी चाल मस्तानी” किंवा “पिया तू अब तो आजा, शोला-सा मन दहके आके बुझा जा” मधील आव्हान मनाला गुदगुदावून, भुरळ घालून जाते. मज़रूहने अशी एकापेक्षा एक मदमस्त गाणी रसिकांना देऊन मन अन् कान तृप्त केले.

१९६५ मध्ये ‘ऊँचे लोग’ मधील मज़रूहचे आणखी एक मदहोश करणारे गीत-

“जाग दिल-ए-दिवाना,ऋतु जागी, वस्ल-ए- यार की/बसी हुई ज़ुल्फ मे आई है सबा प्यार की/एक परी कुछ शाद-सी नाशाद-सी/बैठी हुई शबनम मे तेरी याद की/भीगी रही होगी कहीं कली-सी गुलज़ार की।”

रफ़ी साहेबांच्या कोमल आवाजात मोरपिसाचा हळूवार स्पर्श करणारं हे गीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाही.

मज़रूहनी चित्रपट सृष्टीचा तो विशिष्ट काळ, वास्तवपूर्ण रित्या उभा केलेला आहे. तो काळ हूबेहूब उभा करताना सर्वात महत्वाची गोष्ट साधण्यात आली ती म्हणजे-त्या काळाचे उडत्या चालीचे काव्य. लखनवी संस्कारातील मज़रूह त्याच काळात चित्रपटात स्थिरस्थावर झाले. ते नुसते आलेच नाहीत तर आपला आब घेऊन आले आणि तो अंगा खांद्यावर मिरवतच वावरले.

मज़रूहनी ‘ममता’ चित्रपटात एकाहून एक सरस गाणी लिहिली. लता दीदी आणि हेमंतदांच्या अनुपम अन् गंभीर स्वरातील प्रेमातील पावित्र्य प्रभावीपणे दाखविणारे हे गीत अतिशय कमी शब्दात लिहिण्याचे कसब मज़रूहने मोठ्या खुबीने केलेले दिसते..

“छूपा ले यूँ दिल मे प्यार मेरा, के जैसे मंदिर मे लौ दीये की।
मै सर झुकाए खडी हूँ प्रितम, के जैसे मंदिर मे लौ दीये की।”

साध्या सरळ भाषेत व्यक्त केलेली प्रेमाची, समर्पणाची ताकद त्यांनी अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केलेली दिसते. या चित्रपटात मानवी नात्यांचा खोलवर शोध घेणारी एक गज़ल थेट ह्रदयाला भिडते-

“रहते थे कभी जिनके दिल मे हम जान से भी प्यारों की तरह।
बैठे हैं उन्ही के कूचे मे हम आज गुनहगारों की तरह।”

लतादीदींच्या आवाजातील आर्तता ह्रदयाला जावून भिडते आणि संगीत अलौकिक वातावरण निर्माण करते.

‘धरम-करम’ मधील-

‘एक दिन बिक जाएगा माटी के मोल। जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल।”

या गीतामधून सत्यतेचा संदेश देण्यात मज़रूह यशस्वी झालेले आहेत. जीवनात अनेक संकटे येतात, त्यावर प्रयत्नपूर्वक मात करून जीवनपथावर चालायला हवं हे सत्य ते सर्वांना ठासून सांगतात-

“रुक जाना नही तू कहीं हार के/कंटो पर चलके मिलेंगे साये बहार के।”

‘इम्तिहान’ चित्रपटातील हे गीत जीवनाचे सार सांगणारे आहे.

जीवनात अनेकदा एकाकीपणा येतो. ती परीक्षेची वेळ असते. अशावेळी न डगमगता, निराश न होता परिस्थितीवर मात करण्याचा संदेश मज़रूह या गीतामधून देतात. अशी गाणी निश्चितच माणसाच्या कठिण परिस्थितीत त्याला साथ करतात, धैर्य देतात. कळत-नकळत त्यांचे जीवन समृध्द करून जातात.

मज़रूहची गीतं कधी आनंदाची लहर निर्माण करतात तर कधी डोळ्यांतून अश्रुंची बरसात करायला लावतात.

‘जब दिल ही टूट गया, हम जी के क्या करेंगे जब दिल ही टूट गया।”

प्रेयसीच्या नकाराने जीवन नकोसे झाल्याची, सर्व काही हरवून बसल्याची, नष्ट झाल्याची भावना मज़रूह व्यक्त करतात. तर कधी

“लेके पहला-पहला प्यार भरके आँखों मे खुमार। जादूनगरी से आया है कोई जादूगर।”

म्हणत प्रेमाचा इजहार करतात.

“आँखों ही आँखों मे इशारा हो गया। बैठे-बैठे जीने का सहारा हो गया।”

मध्ये जीवन जगण्याचा मार्ग ते काढतात. जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक रंग त्यांनी आपल्या गीतात आणलेले आहेत.

प्रेमाच्या खोट्या शब्दात अडकलेल्या उर्दू शायरीला बाहेर काढून मज़रूहनी शायरीला एक निराळीच गेयता दिली. ‘बहूबेगम’ चित्रपटातील हे गीत-

“दुनिया करे सवाल तो हम क्या ज़वाब दें/तुमको न हो खयाल तो हम क्या जवाब दें/ पूछे कोई कि दर्द-ए-वफ़ा कौन दे गया/कहने से हो मलाल तो हम क्या ज़वाब दे।”

लतादीदींच्या आवाजातील या गाण्याचे आजही हजारो दीवाने आहेत. प्रेमाची भावना अधिक उठावदारपणे प्रदर्शित करण्याची एक वेगळीच रीत मज़रूहने जगासमोर आणली..

“आँखों मे क्या जी रुपहला बादल / बादल मे क्या जी किसी का आँचल/आँचल मे क्या जी अजबसी हलचल।”

हे गाणे अश्लिलतेकडे झुकू शकले असते पण मज़रूह पुढे लिहितात..

“झूमे लहराए नैना मिल जाये नैन से/साथी मिल जाये रस्ता कट जाये चैन से /देखने मे भोली हो पर हो बड़ी चंचल।”

मज़रूहच्या गीतातील रचना कौशल्यामुळे त्यांची गीतं रसिकांना भावत होती. अशाच प्रकारचे आणखी एक गीत-

“ऐसे तो न देखो के हमको नशा हो जाये/ खूबसूरत-सी कोई हमसे ख़ता हो जाये।”

मज़रूहचे मदहोश करणारे हे गीत आहे. शब्दांच्या नेमक्या अर्थाची जाण असल्याशिवाय इतके सुंदर गीत लिहिणे केवळ अशक्य आहे. मज़रूहची लेखणीच ते यशस्वीपणे करू शकली.

मज़रूहनी शायरीमध्ये कधी लोकांची अभिरूची ओळखून त्याप्रमाणे गाणी लिहिली तर कधी गंभीर विषय घेऊन त्यावर काव्य रचना केली. सर्व चांगल्या गोष्टींचा संगम करुन त्याला आपल्या काव्यात स्थान दिले. त्यांचे काव्य हे मनुष्य जीवन आणि संस्कृतीच्या अथांग अनुभवातून निर्माण झालेला सृजनात्मक शक्तीचा एक प्रभावी आविष्कार आहे.

चित्रपटातील पात्रांचे व्यक्तिमत्व, त्यांची बोलण्याची ढब, त्यांचे वागणे, चित्रपटाची पटकथा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मग मज़रूह गीत लिहित. त्यामुळे एकीकडे

“छोड़ दो आँचल ज़माना क्या कहेगा”

तर दूसरीकडे

“सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली” सारखी गाणी लिहून रोमांटिक आणि कॉमेडी गीतांसाठी जागा करून दिली.

मज़रूहच्या अनेक गीतांमधून त्यांची बंडखोर वृत्ती स्पष्ट दिसते. प्रियकर विचार करतो की प्रेयसीने सर्व बंधने झुगारुन देऊन प्रेमाचा स्वीकार करायला हवा. कारण मानव जीवन फार मूल्यवान आहे म्हणून उगाचच मन मारुन जगू नये. जीवनाचा आनंद पूरेपूर अनुभवायला हवा. प्रेम ही एक उदात्त भावना आहे. ती मोकळेपणाने व्यक्त करायला हवी.

प्रेयसी जाणून आहे की समाज या प्रेमाला कधीही मान्यता देणार नाही म्हणून ती आपले प्रेम उघडपणे प्रकट करीत नाही. प्रियकर तिला आपल्या बरोबर येण्याचा आग्रह करीत म्हणतो..

“मेरे महबूब मेरे साथ ही चलना है तुझे/ रौशनी लेके अंधेरे से निकलना तुझे/ ढ़ल गयी गीत मे सच्चे दिलों की धडकन/ जिसमे जलता हूँ उसी आग मे जलना है तुझे।”

‘ग्यारह हज़ार लडकियाँ’ चित्रपटासाठी मज़रूहने हे गीत लिहिले होते. या गाण्याचा युवा वर्गावर इतका परिणाम झाला की म्हणतात- एक शियापंथी मुसलमान शायरने हैदराबादच्या एका ख़ानदानी सुन्नी मुसलमान मुलीला ही ऩज्म ऐकवून तिला आपल्याबरोबर येण्याची गळ घातली आणि त्या युवतीने समाजाची सर्व बंधने झुगारुन त्याच्यावरील प्रेमासाठी त्याला साथ दिली.

चित्रपटातील गीत लिहिताना देखील मज़रूह सकस काव्य निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नशील असत. काव्य अर्थपूर्ण, आशय गर्भ, भावयुक्त, लयबध्द असायलाच हवे असा त्यांचा आग्रह असे. गीतात प्रवाहीपणा असेल तर ते लोकांच्या मनाचा ठाव घेते हे जाणून मज़रूह काव्यनिर्मिती करीत.

१९६०-१९७० चा काळ मज़रूहसाठी सोनेरी काळ होता. या काळात त्यांनी लिहिलेली गाणी प्रचंड गाजली.

‘चुरा लिया है तुमने जो दिल को’;
आज मै ऊपर आसमाँ नीचे, आज मै आगे ज़माना है पीछे’;
अंग्रेजी मे कहते हैं कि आय लव यू’

अशी अनेक गाणी आहेत ज्यात नवीन काहीतरी देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.

“हम है मता- ए- कुचा-ए बाज़ार की तरह”

लिहिणारे मज़रूह जेंव्हा

“बाहों मे चली आओ हमसे सनम क्या परदा।”

लिहितात तेंव्हा रसिक आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहात नाही.

सार्थक शायरी आणि संगीताचे ज्ञान असल्यामुळे त्यांची गाणी रसीली झाली आहेत. साहित्यिक योगदानासाठी मज़रूहला ‘वली अवॉर्ड, १९८० साली गालिब सन्मान मिळाला. मज़रूह हे पहले गीतकार आहेत ज्यांना १९९३-९४ चे दादासाहेब फाळके पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. फिल्म जगतातील हा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो.

शेवटच्या काळात मात्र मज़रूह थोडेसे चिडचिडे झाले होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे डोळ्यासमोर तरण्याबांड झालेल्या पोटच्या मुलाचा ‘इराम’ चा मृत्यू. त्यानंतर ते नेहमी म्हणत-‘ माणसाच्या डोळ्यासमोर स्वतःच्या तरुण मुलाचा मृत्यू बघण्याची वेळ कधी कोणावरही न येवो. मुलाची तिरडी बापाच्या खांद्यावर उचलण्याची वेळ कोणत्याही दुर्देवी बापावर कधीही न येवो.

२४ मे २००० ला मज़रूहनी शेवटचा श्वास घेतला. तेंव्हा ते ८० वर्षाचे होते. त्यांनी उर्दू काव्यात शायरी आणि चित्रपटसृष्टीत एक उत्तम गीतकार म्हणून आपले नाव अमर केले. त्यांचे अनेक शेर आजही रसिकांच्या ओठावर आहेत-

“सवाल उनका, ज़वाब उनका, सुकून(१)उनका, खिताब(२)उनका/ हम उनकी अंज़ुमन (३)मे सर न करते ख़म(४) तो क्या करते।”

(१ मौन २ बोलणे ३ महफिल ४ नम्र होणे, झुकणे)

अनेकदा शायरचे नाव माहित नसताना देखील असे शेर मात्र रसिकांच्या आठवणीत कायम राहतात. हीच शायराची मोठी उपलब्धी असते.

मज़रूहची गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. सहज ती गुणगुणली जातात-

“अनहोनी पग मे काँटे लाख बिछाए, होनी को फिर भी बिछड़ा यार मिलाए। ये विरहा, ये दूरी, दो पल की मजबूरी, फिर कोई दिलवाला काहे को घबराए।
धारा जो बहती है बहके रहती है, बहती धारा बन जा या दुनिया से डोल
एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग मे रह जाएँगे प्यारे तेरे बोल।”

-डॉ.नीता पांढरीपांडे
१०१, सुरभी हेवन अपार्टमेंट
२-२-१०, उस्मानिया युनिव्हर्सिटी रोड, हैदराबाद ५००००७
मोबाईल: 7659064555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *