..जर भविष्यातही कोरोनाच्या एकामागून एक अशा लाटा येत राहिल्या तर सर्वांचेच मरण अटळ आहे. आणि आपले मरण ‘नाकर्त्या’ शासनव्यवस्थेमुळे होत आहे, याची जाणीव जर लोकांना झाली तर कोणत्याही शक्तिशाली व्यवस्थेला उलथून टाकण्याची क्षमता लोकात असते हे यापूर्वी इतिहासाने अनेकदा सिद्ध केले आहे. तशी वेळ येऊ नये, एवढीच अपेक्षा..!
एक:
देशातील कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह वळणावर येऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या पाहून सर्वसामान्य माणूस हादरून गेला आहे. कुणाचे कधी काय होईल? याची कोणतीही शाश्वती या काळात उरलेली नाही. आपल्या ज्ञान- विज्ञानाच्या आणि आरोग्याच्या मर्यादा तर गेल्यावर्षीच उघड झाल्या होत्या, पण वर्षभर सुधारणेला वाव असूनही ती संधी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांनी घालवली. अगदी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सगळं पूर्ववत होण्याची चिन्हे निर्माण झाली होती, पण पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाल्ली आणि बघता बघता संपूर्ण देशाला त्याने आपल्या विळख्यात घेतले. मागच्या काही दिवसात बहुतेकांनी आपल्या नात्यातील किंवा परिचयाच्या व्यक्तींना गमावले आहे. माणसं खिन्न आणि विमनस्क झाली आहेत.
अनेक राजकीय नेते, अभिनेते, लेखक, कवी, कलावंत, पत्रकार, शेतकरी, नोकरदारांचा या काळात मृत्यू झाला आहे. गोरगरिबांची/ सर्वसामान्यांची परवड सुरू आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता आहे. हे चित्र दुःखद आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान, बांग्लादेश किंवा श्रीलंकेसारख्या तुलनेने दुबळे असणाऱ्या देशांनी कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. मग आपल्याला ते का जमले नाही? आपण गाफील का राहिलो? आपल्या वैज्ञानिकांना या गोष्टीचा काहीच अंदाज कसा आला नाही. दररोज लाखो लोक बाधित होत आहेत. हजारोंचा मृत्यू झाला आहे. आणि रोज ही संख्या वाढतच आहे. स्मशानभूमीत प्रेतांची रांग लागली आहे. जागा मिळेल तिथे प्रेतावर अंत्यसंस्कार नव्हे; तर प्रेतांना नष्ट केले जात आहे.
कोणतेही एक निर्णायक धोरण सरकारला राबवता आले आहे असे सध्या तरी दिसत नाहीय. काही राज्यांना लसींचा पुरवठा होतोय, तर काहींना नाही. रेमडेसिविर या इंजेक्शनची कमतरता आणि त्यामुळे सुरू झालेले राजकारण ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. अमानवीय आहे. काही वर्षापूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती, तेव्हा या घटनेची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली गेली. रेल्वेने पाणी? ही घटनाच आश्चर्यजनक होती. पण आता ऑक्सिजनसाठी रेल्वे धावत आहे. ज्या गोष्टीची आपण स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशा घटनांचे आपण साक्षीदार होत आहोत. आश्चर्य म्हणजे देशभरात अशी आरोग्य आणीबाणी निर्माण झालेली असताना निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालसह काही राज्यात निवडणुका जाहीर केल्या. शेकडो प्रचारसभा आणि लाखोंचा जनसमुदाय. हे एवढे कमी की काय म्हणून हरिद्वार येथे ‘कुंभमेळा’ भरला. आणि या सगळ्या घटनांचा परिणाम व्हायचा तोच झाला. इथे उपस्थित असलेले लोक आता सुपर स्प्रेडरची भूमिका निभावत आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.
लसीकरणाचे नीट नियोजन नाही की, संभाव्य परिस्थितीचा अंदाज नाही. ऑक्सिजनच्या आणि योग्य उपचारांच्या अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयाबाहेर मरणासन्न अवस्थेत पेशंट पडून आहेत. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर युद्ध पातळीवर शासन कामाला लागले असले, तरी ग्रामीण भागातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दिवस-रात्र कोरोनाच्या बातम्यांचा धसका घेऊन मरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जगण्या- मरण्याची कोणतीच शाश्वती भोवतालात नसतानाही काही विकृत, संधीसाधू लोक औषधांचा काळाबाजार करत आहेत. खोट्या पेशंटने बेड अडवून ठेवले आहेत. ब्लॅकने बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. लाखो रुपये उकळले जात आहेत. रेमडेसिवीरची पळवापळवी हे चित्रही अत्यंत खेदजनक आहे.
म्हणजे मरणभयाच्या अशा संवेदनशील काळातही माणसे आपली भ्रष्ट व्यावहारिकता जपतातच कशी? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मृत्यूच्या ‘त्यागकथां’चे राजकीय मार्केटिंगही या काळात आपण अनुभवले. त्याविषयीची असंवेदनशील टिंगल-टवाळीही आपण पाहिली. हे सगळं खूप वेदनादायी आणि निषेधार्थ आहे. आरोप- प्रत्यारोपांचे खेळ खेळून ही आणीबाणी संपुष्टात येणार नाही. तर यासाठी अत्यंत विचारपूर्वक अशा नियोजनाची गरज आहे. हे नियोजन दीर्घकालीन करावे लागेल. राजकीय भूमिका, पक्षीय धोरणे आणि व्यक्तिगत मतभेदाच्या पलीकडे जाऊन, राष्ट्रहित लक्षात घेऊन हे करण्याची गरज आहे. जगभरातल्या अनेक देशांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. इस्रायल सध्या ‘मास्कमुक्त’ झाला आहे. इतर ठिकाणीही परिस्थिती फार घातक असल्याचे चित्र नाही. कोरोनाचा ‘जनकदेश’ असलेल्या चीननेही पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. मग आपल्याकडेच असे चित्र का? निर्णयक्षमतेचा, नियोजनाचा अभाव तर आहेच, पण आपल्या राजकीय नेत्यांचे प्राधान्यक्रमही वेगळे आहेत. त्यांना निवडणुका हव्या आहेत. त्यांना आयपीएल हवे आहे.
दोन:
सोशल मीडियातून सध्या सर्वात जास्त ट्रोल होणारे व्यक्ती आहेत, आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह. देशभरात त्यांच्याविषयी एक संतप्त प्रतिक्रिया उमटलेली पाहायला मिळते आहे. आणि तशी प्रतिक्रिया उमटणे अस्वाभाविक नाही. पंतप्रधान म्हणून, राष्ट्रप्रमुख म्हणून मोदींना ही जबाबदारी झटकता येणार नाही. केवळ ‘मन की बात’ करून प्रश्न सुटणार नाहीत, तर काहीतरी कृतिशील पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. अमुक राज्यात आपले सरकार नाही म्हणून त्यांच्याशी वैरभावाने वागून चालणार नाही. विरोधकांनाही समजून घेण्याची गरज आहे. सध्या समाजमाध्यमात मोदीविरोध खूप टोकाला पोहोचला आहे. हे आपोआप घडलेले नाही. याला केंद्र सरकारची विविध धोरणे आणि त्यांची संकुचित विचारधारा कारणीभूत आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही.
भारतीय जनतेने २०१४ साली काँग्रेसला दूर करून भाजप आणि मित्र पक्षांच्या हाती सत्ता सोपवली. त्यावेळी मोदी नावाच्या एका जादुई नेतृत्वावर लोकांनी विश्वास टाकला होता. मोदींनी ही निवडणूक एकहाती लढवली आणि जिंकली देखील. हा विजय केवळ आणि केवळ अभूतपूर्व होता. पाचदहा वर्षानंतर अशी सत्तांतरे जनतेला हवीच असतात. म्हणून लोकांनी भरभरून मोदींना प्रतिसाद दिला. सोशल मीडियाचा प्रथमच अत्यंत प्रभावी वापर या निवडणुकीत करण्यात आला. मोदींच्या विजयाचा जल्लोष सर्वत्र झाला होता. ‘आता आपल्या देशात काहीतरी अविश्वसनीय क्रांती होणार किंवा प्रचंड भौतिक प्रगती होणार किंवा गरिबी आणि बेरोजगारीचे निर्मूलन होणार’ अशी कितीतरी स्वप्ने भारतीयांना दाखवली गेली होती. पण त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी एकही पाऊल टाकले गेले नाही. तरीही दोन अडीच वर्ष भारतीय जनतेने विशेष विरोध केल्याचे दिसून आले नाही. मात्र, नोटबंदीच्या निरर्थक निर्णयाने सर्वसामान्यांच्या मनातला राग उफाळून आला आणि त्यानंतर मोदीविरोध तीव्र होत गेला. त्यामुळे सोशल मीडिया आणि माध्यमातही असे चित्र निर्माण झाले होते की, २०१९ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत किंवा मागच्या निवडणुकीत जे यश मिळाले तेवढे मिळणार नाही. पण यावेळी सगळ्या एक्झिटपोलचे आणि तर्कवितर्कांचे अंदाज खोटे ठरवत मोदी आणि भाजपने पुन्हा एकदा भरघोस वगैरे यश मिळवले. ते लोकशाही मार्गाने निवडून आले. पंतप्रधान झाले. पुढे काय काय झाले हा सगळा इतिहास इथे उगाळत बसण्याची ही वेळ नाही आणि त्याची आवश्यकताही नाही. देव, धर्म आणि द्वेषाच्या राजकारणाला या काळात मोठी प्रतिष्ठा मिळत गेली. आणि मूलभूत प्रश्न अडगळीत पडत गेले.
…पण आता देशभरातला एकूण आक्रोश पाहता मोदींनी हे प्रकरण नीटपणे हाताळले आहे असे दिसत नाहीये. लोकांचा भ्रमनिरास होत आहे. लोकांना काहीतरी बदल हवाय. पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आणि प्रचंड बहुमत असलेल्या या पक्षाला दूर करणे किंवा ‘सत्ताबदल’ करणे सध्या तरी शक्य नाही. पण किमान ‘नेतृत्वबदल’ तरी करण्यास काहीच हरकत नाही. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना याची जाणीव करून द्यायला हवी. आणि तरीही काहीच होत नसेल तर बंड करायला हवे. नाना पटोले यांनी हा प्रयोग यापूर्वी केला होताच.
तीन:
मला वाटतं सध्या भाजपकडे आणि देशाकडेही पंतप्रधान पदासाठी एकमेव उत्तम पर्याय आहे तो नितीन गडकरी यांचा. एकतर ते मोदी, शाह यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. ते यापूर्वी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. शिवाय केंद्रातले ते अत्यंत अनुभवी मंत्रीदेखील आहेत. तसेच त्यांचे सर्व पक्षांशी सलोख्याचे संबंध आहेत आणि ते सुसंस्कृतही आहेत. सध्याच्या या भीषण काळात समजा ते पंतप्रधान झालेच तर त्यांच्या नेतृत्वाचा फायदा देशाला कदाचित होईल; पण तो त्यांच्या पक्षाला-भाजपला अधिक होईल. १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर शरद पवार केंद्रातून महाराष्ट्रात आले होते. याचा अर्थ सुधाकरराव नाईकांना परिस्थिती नीट सांभाळता आली नव्हती, असा होत नाही. तर पवारांचे तिथे येणे ही त्यांच्या पक्षाची राजकीय गरज होती. भाजपलासुद्धा सध्या अशा राजकीय नेतृत्वबदलाची गरज आहे. (अर्थात हे असे काही घडेल याची सुतराम शक्यता नाही पण तरीही जनमत लक्षात घ्यायला काय हरकत आहे.?)
मोदींच्या फोटोमुळे लस घ्यायला नकार
पंजाब मध्ये एका प्राध्यापकाने लस घ्यायला नकार दिला. कारण काय तर लस घेतल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो आहे. पंतप्रधानांचा फोटो लोक का नाकारत आहेत? याचा विचार भाजपच्या ‘थिंकटॅंक’ ने करायला हरकत नाही. अर्थात अशी हजारो उदाहरणे आहेत. पंतप्रधानांच्या भाषणांची खिल्ली उडवली जात आहे. हे या थिंकटॅंकला दिसत नाहीय का? पंतप्रधानांविषयी खरं तर सर्वांना आदर वाटायला हवा. पण तसे घडताना दिसत नाही. त्यांच्या कार्यशैलीविषयी त्यांच्या पक्षातले कुणीही बोलण्याची हिंमत करू शकत नाहीत. अशी अदृश्य दहशत खचितच योग्य नाही. वैरभावाचे, सूडाचे राजकारण दूर ठेवून सध्या लोकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे. निवडणुका, प्रचार, परीक्षा आणि तत्सम गोष्टी महत्त्वाच्या नक्कीच आहेत. पण सध्या ‘जगण्याला’ प्राधान्य देणे गरजेचे आहे. कोरोनाशी झुंजणाऱ्यांना वाचविण्याची गरज आहे.
जर भविष्यातही कोरोनाच्या एकामागून एक अशा लाटा येत राहिल्या तर सर्वांचेच मरण अटळ आहे. आणि आपले मरण ‘नाकर्त्या’ शासनव्यवस्थेमुळे होत आहे, याची जाणीव जर लोकांना झाली तर कोणत्याही शक्तिशाली व्यवस्थेला उलथून टाकण्याची क्षमता लोकात असते हे यापूर्वी इतिहासाने अनेकदा सिद्ध केले आहे. तशी वेळ येऊ नये, एवढीच अपेक्षा..!
-डॉ. पी. विठ्ठल, नांदेड
इमेल: p_vitthal@rediffmail.com>
संपर्क: ९८५०२४१३३२