# कोरोना महामारी: दशा आणि दिशा -डाॅ.प्रकाश सिगेदार.

मागच्या डिसेंबर महिन्यात चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोना महामारी (pandemic) ने आता सर्व जगाला ग्रासले आहे. प्रत्येक शतकामध्ये एक महामारी (pandemic) निश्चितपणे येते आणि अनेक लोकांचे प्राण घेते तसेच मनुष्यहानी सोबत वित्त हानी ही भरपूर प्रमाणात होते मागील तीन शतकांपासून स्पॅनिश फ्लू, कॉलरा, प्लेग इत्यादीसारख्या महामारीमुळे जगामध्ये अनेकांचे बळी घेतले आहेत तसेच वित्त हानी ही भरपूर प्रमाणात झालेली आहे. यावेळी कोरोना महामारीने जगाला त्रस्त करून सोडले आहे. करोडो लोक जगामध्ये या आजाराने ग्रस्त झाले असून, शेकडो लोकांचे प्राण आजपर्यंत कोरोनाने घेतले आहेत भारतामध्ये सुद्धा या महामारीमुळे प्राणहानी सोबतच आर्थिक हानी सुद्धा भरपूर प्रमाणात झाली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेतेचे जणू कंबरडेच या आजारामुळे मोडले आहे. या आजारामुळे सर्व क्षेत्रांना फटका बसला असून अपरिमित नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचे बळी तर गेलेच पण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे घरदार उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे शारीरिक आजारा सोबतच मानसिक आजार सुद्धा जडले आणि सर्व आघाडीवर खच्चीकरण पाहायला मिळाले. कोरोना आजाराबद्दल माहिती घेताना वैद्यकीयदृष्ट्या हा आजार नोव्हेल कोरोना व्हायरस या विषाणूमुळे होतो. तसेच त्याचा संसर्ग संपर्कात आलेल्या व्यक्तीला होऊन त्याचा प्रसार खूप जलद गतीने होतो. या आजाराचा संसर्ग हा श्वसनाद्वारे हवेत विषाणू पसरून तो दुसऱ्या व्यक्तीच्या श्वास नलिकेत प्रवेश करतो आणि नंतर फुफ्फुसांवर हल्ला करून त्याची कार्यशक्ती कमी करतो. या आजारांमध्ये श्वसनक्रिया वर मोठा आघात होऊन नंतर सर्व अवयव निकामी होतात आणि बर्‍याच वेळा रुग्ण दगावते. 80 टक्के लोकांमध्ये या आजाराची काहीही लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे यांना असिमटोमॅटिक कॅरियर असे म्हणतात. या लोकांमुळे हा आजार समाजामध्ये लवकर पसरतो या आजारांमध्ये दुरुस्त होण्याचे प्रमाण सुद्धा नव्वद टक्केच्या वर आहे फक्त एक ते पाच टक्के लोकांना श्वसन क्रियेचा जास्त त्रास होऊन मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे या आजारामुळे जीवित हानी जरी नियंत्रित असली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

या आजारावर आजपर्यंत कुठलाही शाश्वत असा उपचार नाही तसेच यावरील लसही (vaccine) आजपर्यंत उपलब्ध नाही त्यामुळे प्रतिबंध हाच खरा उपाय असून आजार झाल्यावर लक्षणाप्रमाणे उपचार केले जातात. त्यामुळे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, sanitizer चा योग्य वापर करणे तसेच सामाजिक आंतर (social distance) ठेवणे, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, परिसर स्वच्छता राखणे. तसेच वृद्ध आणि लहान मुलांना या आजाराची बाधा जास्त होत असल्यामुळे त्यांचा यापासून बचाव करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मागील दहा महिन्यांपासून जगामध्ये या आजारामुळे दैनंदिन जीवन ठप्प झाले आहे लॉकडाऊन मुळे लोकांना घरातच बसून राहावे लागले. तसेच कारखाने आणि दळणवळण बंद असल्यामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडून गेली आहे. याचा परिणाम विविध क्षेत्रांवर झालेला असून यामधून उभारी घेण्यासाठी पुढचा बराच कालावधी लागणार आहे. आपला GDP प्रथमच उणे 23 झाला असून तो पूर्वपदावर येण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. तसेच आर्थिक शिस्त ही पाळावी लागणार आहे. तसेच या आजारामुळे बऱ्याच गोष्टी आपणाला नवीन शिकायला मिळाल्या. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यानंतर होणारे नुकसान किती मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचे परिणाम सर्वांना कसे भोगावे लागतात हे आपल्याला कोरोनामुळे शिकायला मिळाले. तसेच वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढती रहदारी, वाहनांचे वाढते प्रमाण, स्वच्छतेच्या बाबतीत केलेली दिरंगाई आणि कंटाळा, वाढती लोकसंख्या, यामुळे आपणाला बरेच नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच कुठलीही गोष्ट अतिरेकी प्रमाणात केल्यास त्याचा त्रास सहन करावा लागतो हेही अधोरेखित झाले आहे.

कोरोनामुळे विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म श्रेष्ठ हा विषय सुद्धा चर्चिला गेला आणि त्यामधून असे आढळले विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं तर दोन्ही एकमेकास पूरक आहेत भारतामध्ये अध्यात्माचा पगडा जास्त असल्यामुळे आणि विविध धर्मांच्या शिकवणीमुळे कोरोनाचा सामना करताना आपल्याला फायदा झाला पण आपण वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत खूप मागे आहोत आणि यामध्ये खूप सुधारणा कराव्या लागणार आहेत हे ही अधोरेखित झाले.

या आजारात उपचारासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीच्या तुटवड्यालाही आपल्याला सामोरे जावे लागले जसे ventilators, oxygen plants, सुरुवातीला PPE kits आणि testing kits etc.  शाकाहार तसेच आयुर्वेदाचे महत्वही आपणास या काळात कळाले. तसेच ध्यान, योगा, प्राणायाम, व्यसनमुक्ती, आदर्श दिनचर्या याचे महत्वही यामुळे कळले. वैद्यकीय संशोधन हा आपल्याकडे खूप दुर्लक्षित विषय आहे हे समोर आले. यामध्ये खूप प्रगती होणे गरजेचे आहे. वैद्यकीय सेवेसाठी आणखी खूप आर्थिक तरतूद करावी लागणार हेही लक्षात आले.

या महामारीमध्ये सर्वात जास्त हानी वैद्यकीय सेवा देणाऱ्यांची आणि त्यांच्या सहयोगी म्हणून काम करणाऱ्यांची झाली (कोविड योद्धा). तसेच उपचार करताना घ्याव्या लागणाऱ्या विशेष खबरदारी (PPE Kits, etc) मुळे त्यांचे अतोनात हाल झाले. सर्व कोविड योध्याना सलाम. कोरोनामुळे आपली बलस्थाने कोणती आणि कमजोरी कोणत्या हेही आपल्याला माहिती झाले. आपण जगात सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहोत तसेच आपल्या देशात गुणवतेला कमी नाही पण त्यामानाने संधी उपलब्ध नाहीत तसेच आपले गुणवंत लोक इतर देशात जाऊन आपली गुणवत्ता सिद्ध करतात हेही खरे आहे. स्वदेशी ला महत्व देने गरजेचे आहे. “Vocal for local ही संकल्पना सुद्धा कोरोनामुळे अस्तित्वात आली. लग्न समारंभ, हॉटेलिंग, तसेच इतर बाबींवर होणारा अनाठायी खर्च आपोआपच कमी झाला. रहदारी आणि वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी होऊन त्याचा परिणाम चांगले पर्जन्यमान होण्यात झाला
मुलांचे शिक्षण आणि बहुतांश कामे घरी राहून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात हेही लक्षात आले.

कोरोनाला हरवू या म्हणत म्हणत कोरोनासोबत जगायलाही आपण शिकलो. नेहमी सकारात्मक विचार करायला हवा हे ही कोरोनामुळे आपण शिकलो. महत्त्वाचे म्हणजे जीवनावश्यक असे काहीच नाही तर जीवनच आवश्यक आहे हे ही आपण या कोरोना कालखंडात शिकलो. त्यामुळे कोरोनामुळे लोकांची दशा झाली हे नक्की पण दिशा ही मिळाली हेही तितकेच खरे आहे. बऱ्याच जणांनी आपले आप्त स्वकीय गमावले याचे दुख: नक्कीच आहे पण खूप काही कोरोनामुळे नवीन शिकायला मिळाले हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
शेवटी एवढेच म्हणावे लागेल की कोरोनामुळे आपल्या जीवनाची दशा झाली असली तरी भविष्यात जगण्याची उमेद आणि नवी दिशा मात्र मिळाली. त्यालाच new begining (normal) किंवा पुनःश्च हरी ओम.. असेही म्हटले जाते.
-डॉ.प्रकाश सिगेदार, जालना
अस्थिरोग तज्ज्ञ तथा माजी सचिव
महाराष्ट्र अस्थिरोग संघटना.
मोबाईल: ९४२३४५७०१०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *